पणजी: नदी परिवहन खात्यातील (Goa River Transport Department) गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ लिपिक असलेल्या पूर्णिमा ए. सिनाई भरणे (Purnima A. Sinai Bharne) यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातचा आदेश बंदर कप्तान खात्याचे कॅ. जेम्स ब्रागांझा यांनी काढला आहे. निलंबनाच्या काळात त्यांनी बोलावले जाईल तेव्हा खात्याच्या लेखा विभागात हजेरी लावावी. खात्याच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नदी परिवहनची आजची परीक्षा रद्द : नदी परिवहन विभागामध्ये सेलर, एमटीएस वॉचमन, शिपाई पदासाठी आज शनिवारी होणारी परीक्षा रद्द केल्याची माहिती कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांनी दिली आहे. त्यामुळे ही नोकर भरती प्रक्रिया रद्द झाल्यात जमा आहे.
17 डिसेंबर 2019 ते 12 नोव्हेंबर 2021 या काळात नदी परिवहन खात्यात कामाला असताना पूर्णिमा सिनाई भरणे हे त्यांच्याकडे जमा होणाऱ्या रक्कमेसंदर्भातचा कॅश बुक ठेवला नाही. त्यामुळे खात्याचा ऑडिट अहवाल तयार करण्यात आला आहे त्यामध्ये गैरव्यवहार तसेच सुमारे 3 लाख 62 हजार 480 रुपयांची अफरातफर दिसून येत आहे. या गैरव्यवहारात पूर्णिमा भरणे यांच्यासह इतर कर्मचारीही गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खात्याच्या फेरीबोटीमध्ये देण्यात येणाऱ्या तिकिट शुल्काची नोंद ही रकमेच्या नोंदणी वहीत नमूद ठेवण्यात आली नाही. तसेच वरील रकमेचा हिशोबच केलेल्या चौकशीत दिसून येत नाही. त्यामुळे ही सरकारी तिजोरीच्या महसुलाची चोरी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नियम 1965 खाली कारवाई
खात्याच्या ऑडिट अहवालाची प्रत बंदर कप्तान जेम्स ब्रागांझा यांना पाठवण्यात आली होती. सरकारी महसुलाचा गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण व अपिल) नियम 1965 खाली ही कारवाई करण्यात आली आहे असे आदेशात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.