Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिस नेमके काय करीत होते?

Khari Kujbuj Political Satire: बिट्स पिलानी हे नावाजलेले शिक्षण क्षेत्रातील नाव. परंतु मागील सहा महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Sameer Panditrao

पोलिस नेमके काय करीत होते?

लईराई देवीच्या यात्रेला दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. लाखोंचा जमाव रात्री देवीच्या यात्रेनिमित्त रस्त्याच्या दुतर्फा उभा होता. अशातच गोंधळ उडतो आणि धावत येणारे धोंड खाली एकमेकांवर पडतात, त्यात चेंगराचेंगरी होते. सहाजणांचा मृत्यू होतो आणि शेकडो लोक जखमी होतात. या घटनेचे पडसाद सरकारी आणि राजकीय पातळीवर दिवसभर उमटतात. परंतु उपचार करण्यास आलेल्या एका धोंडने जी माहिती दिली, ती खरोखरच अचंबित करणारी आहे. त्याच्या मते हजाराच्यावर पोलिस तैनात केले होते, पण काही ठिकाणी थोडे-थोडे दिसत होते. परंतु रात्री एक पोलिस वर्दीत दिसत होता, तो तासाभराने साध्या पेहरावात कोणा महिलेबरोबर वावरत होता. त्याची ही माहिती पोलिस खात्याचे बिंग फोडणारी आहे. ती किती गांभीर्याने चौकशी करणारी समिती घेतेय हे पहावे लागेल. याशिवाय यात्रा समितीचे काम हे पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे का नाही, हे पाहणे गरजेचे होते, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या काखा दाखवण्याचा व एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न काही खाती करीत राहणार, पण मध्यरात्रीच्या घटनेमुळे प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसले आहे. ∙∙∙

सत्य बाहेर येणार काय?

बिट्स पिलानी हे नावाजलेले शिक्षण क्षेत्रातील नाव. परंतु मागील सहा महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृष्णा कसेरा या विद्यार्थ्याचा मृतदेह या संस्थेच्या परिसरात आढळला. कृष्णा याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कृष्णा याच्या कुटुंबाने संस्थेवर आरोप केले आहेत. आम्ही मुलाला आत्महत्या करण्यासाठी पाठविले काय, असा सवाल त्यांनी केला आहे. कृष्णाने जर खरोखरच आत्महत्या केली असेल किंवा त्याचा खून झाला असेल तर हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे, पण खरोखर पोलिस या प्रकरणाच्या खोलवर जातील काय? असा सवाल उपस्थित होत आहे. संस्थेत जे शिक्षण दिले जाते, तेथे त्या योग्यतेचे विद्यार्थीच असतात. त्यामुळे अभ्यासाचा ताण त्यांना नक्कीच माहीत असणार आहे. अशा घटनांचा तपास करणारा अधिकारीही तेवढ्याच धाटणीचा आणि सत्य काय ते बाहेर काढणारा असावा. अन्यथा आत्तापर्यंत जे घडत आले आहे, तसेच पुढे जाऊ द्या म्हटल्यास सर्वच उजेड नाही का? ∙∙∙

अन्न शिजवायला तरी पाणी द्या!

गोव्‍यात लोकांना दरमहा १६ हजार लीटर पाणी मोफत दिले जात होते. १ मे पासून ते बंद करण्‍यात आले आहे. एका बाजूने घरगुती गॅसच्‍या किंमती वाढलेल्‍या असताना आता पाणीपट्टीही वाढणार आहे. यावर समाज माध्‍यमांवरून तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत. एकाने सरकारलाच उपदेश देताना ‘माननीय गोवा सरकार, आम्ही भारतीय नागरिक आहोत, पाकिस्तानी नाही. आम्हा गरीब नागरिकांचे पाणी बंद करू नका. परवडत नसल्यास विकास थांबवा, मोदीजींनी धान्य आणि शौचालय दिले आहे, शिजविण्यास आणि धुण्यास, तुम्ही निदान पाणी तरी द्या,’ असे म्‍हटले आहे. ∙∙∙

निमित्त इफ्फीचे पुरेसे

गोव्यात कला व संस्कृतीच्या विकासासाठी उभी झालेली रवींद्र भवने, कला केंद्रे वा कला अकादमी यांची झालेली वा होऊ घातलेली नूतनीकरणे ही लोकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत. कला अकादमी तर बांधण्यासाठी जितका खर्च झाला त्याहून दीड ते दोनपट खर्च करूनही त्यात नवनवे दोष निघत आहेत व त्यामुळे त्याला ‘ताजमहाल’ म्हटले जात आहे. फोंडा व कुडचडे येथील कला मंदिराचीही तीच गत झालेली आहे, तर आता मडगावच्या रवींद्र भवनाचे नूतनीकरण चर्चेत आहे. उद्‍घाटनानंतर २०११ मध्ये तेथे इफ्फीचे आयोजन केले गेले, त्यासाठी तेथे कितीतरी खर्च केला गेला. तसेच स्टुडिओ उभारण्याची व अन्य अनेक कार्यक्रमांच्या घोषणा झाल्या, पण त्यातील काहीच साकारले नाही. उलट अनेक भागांत पावसात गळती होऊ लागली, ती दूर करण्यासाठी गतवर्षी दुरुस्ती केली गेली अन् आता यंदाच्या इफ्फीसाठी पूर्ण वास्तूचे म्हणे नूतनीकरण केले जाणार आहे. अशा या प्रकल्पांवर अशी निमित्ते करून कोट्यवधींची उधळपट्टी सतत केली जाणार का असे प्रश्न पडत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire

पोलिसांची भूमिका काय?

शिरगावच्या लईराई जत्रेत पोलिसांनी ‘परिस्थिती नियंत्रणात आणली’ असे जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात लोक विचार करताहेत, की ही परिस्थिती आधी बिघडलीच कशी? पोलिसांनी नियंत्रणात आणली की आणून ठेवली? एकीकडे पोलिसांवर आरोप होतात तर दुसरीकडे वाहवा करणारे लोक देखील समोर येतात. त्यामुळे पोलिसांची भूमिका काय होती हे देवीलाच ठाऊक! पोलिस होते, तर परिस्थिती नियंत्रणात आली असती असे टोमणे देखील शनिवारी पोलिसांना लोकांकडून मारण्यात आले. आता त्याचा फायदा काय हे टोमणे मारणाऱ्यांनाच ठाऊक. ∙∙∙

कळंगुट पंचायतीला दुखवटा नाही?

‘जेव्हा रोम जळत होते तेव्हा निरो बासरी वाजवत होता’ असे इंग्रजीत एक वाक्य आहे. दुःखाच्या वेळी आपण इतरांच्या दुःखात सहभागी होणे हा आपला शिष्टाचार. लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांना प्राण गमवावे लागले. राज्य सरकारने यासाठी तीन दिवस सरकारी पातळीवर कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे जाहीर केले आहे. असे असताना कळंगुट पंचायतीने लाकूड व इतर माडाच्या झावळ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून आणलेल्या यंत्राचे उद्‍घाटन केले. यावेळी सरपंच, उपसरपंच व पंच सदस्य उपस्थित होते. सरकारी पैशाने आणलेल्या यंत्राचे उद्‍घाटन करणे गैर आहे हे पंचायत सचिवांनी सरपंचांना सांगायला हवे होते ना? जोसेफ बाब आपल्याला दुखवटा लागत नाही का? असा प्रश्न आम जनता विचारीत आहे. ∙∙∙

चमकोगिरी भोवली

शिरगाव येथे चेंगराचेंगरी झाली. लाखावर भाविक एकत्र येतात तेथे किती पोलिस बंदोबस्त हवा याचे निकष पाळले गेले का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मदत कर, हरवलेली पर्स मोबाईल शोधून दे अशी सामाजिक कामे करतानाच बंदोबस्ताच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष नको अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. आपण आहे म्हणजे काही घडणार नाही असा काहींचा आत्मविश्वास नडला असेही बोलले जात आहे. चमकोगिरी नडली अशी कोपरखळी मारण्यासही काहींनी समाज माध्यमांवर कमी केलेले नाही. शिरगावातील दुर्घटनेला पोलिस जबाबदार असा सूर ऐकू येऊ लागला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT