Goa Politics: खरी कुजबुज; रस्‍त्‍याला डांबर कधी फासणार?

Khari Kujbuj Political Satire: १ मे हा कामगार दिवस. या दिवसानिमित्त कामगार आयुक्त कार्यालय आणि खासगी संस्थेच्या वतीने श्रमशक्ती भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

रस्‍त्‍याला डांबर कधी फासणार?

‘मोठ्या घराला पोकळ वाशे’ असा एक वाक्‍प्रचार आहे. कुंकळ्‍ळी मतदारसंघात पालिका क्षेत्राचे हेड क्वार्टर म्हणजे कुळवाडा हा ऐतिहासिक गाव. या पालिका क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेवकाला मंत्र्याएवढाच मान व सन्मान. याच प्रभागातून पालिकेला तीन नगराध्यक्ष मिळाले. या प्रभागातील अंतर्गत रस्त्याला गेल्या अठरा वर्षांपासून डांबर फासलेलेच नाही. ज्योकिम आलेमाव, राजन नाईक, क्लाफासिओ व आता युरी आलेमाव आमदार आहेत. मात्र कोणीच डांबरीकरणाची मागणी पूर्ण केली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असली तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कानावर हात ठेवतात. मुख्यमंत्री साहेब, यंदा तरी या रस्त्याला डांबर फासणार का? ∙∙∙

कामगारमंत्री गेले तरी कुठे?

१ मे हा कामगार दिवस. या दिवसानिमित्त कामगार आयुक्त कार्यालय आणि खासगी संस्थेच्या वतीने श्रमशक्ती भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगारमंत्री म्हणून बाबूश मोन्सेरात हे उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. कदाचित खासगी संस्थेने त्यांना निमंत्रित केले नसेल, त्यामुळे ते आले नसावेत अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती. परंतु मंत्री म्हणून आपल्या फेसबुक पेजवर प्रत्येक दिनानिमित्त, नेत्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बाबूश १ मे रोजी कामगारदिनाच्या शुभेच्छा देण्यास कसे काय विसरले? हा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे. पणजीतील भाजपच्या मेळाव्यामुळे कदाचित त्यांचा उत्साह वाढला असेल आणि मेळाव्‍याला झालेली गर्दी पाहून आपला विजय निश्‍चित झाल्याचा साक्षात्कारही झाला असेल, अशीही चर्चा या कार्यक्रमावेळी सुरू होती. पण ही चर्चा करणारी मंडळी कालच्या पणजीतील भाजपच्या मेळाव्यात कुठे होती, हे माहीत नाही. त्यांच्या चर्चेतून ते बाबूश यांचे समर्थक असावेत असेच मात्र वाटत होते. ∙∙∙

त्यांचे निलंबन कधी होणार?

मुख्य नगररचनाकार राजेश नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ती उशिराने का केली गेली हा प्रश्न चर्चेला आला असतानाच अशी कारवाई इतरांवर का नाही, अशीही विचारणा होऊ लागली आहे. सार्वजनिक खात्यातील कर्मचारी भरती गाजली, कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या घोळातून नवनवीन प्रकरणे समोर येत असताना अशी कारवाई सरकारने कोणावरही का केली नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकारने एकाच मापात सर्वांना तोलावे अशी अपेक्षा जनमानसातून यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ∙∙∙

सर्व काही जुळून आले तरच!

भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सध्या पक्षाच्‍या दुर्लक्षित व जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. सर्वांना सामावून घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न दामूबाबनी चालवला असल्याचे आता भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्तेच म्हणताहेत. तसे पाहिले तर भाजपमध्‍ये अनेक गट पडले आहेत. नव्यांना पक्षात सामावून घेताना जुन्यांकडे बरेचसे दुर्लक्ष भाजप नेतृत्वांकडून झाले असल्याने कित्‍येकजण नाराज आहेत. या नाराज लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणण्याचा प्रयत्न दामूबाबनी चालवला आहे. मात्र त्‍यासाठी त्‍यांना कठोर मेहनत घ्‍यावी लागणार आहे. तसेच पक्षातील सर्वांची तेवढीच तोलामोलाची साथ असावी लागेल. हे सर्व जुळून आले तरच दामूबाब आपल्‍या कार्यात यशस्‍वी होतील, असे भाजपचे कार्यकर्तेच बोलू लागले आहेत ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, एकीची खरी गरज काँग्रेसलाच

एकजुटीसाठी काहीतरी निमित्त हवेच

भंडारी समाजातील एकजूट टिकवण्यासाठी सध्या साधे निमित्तही कारण ठरत आहे. समाजाच्या समितीचे खजिनदार दिलीप नाईक यांची कन्‍या दिविता नाईक हिने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले होते. तिचे अभिनंदन करण्यासाठी भंडारी समितीचे अध्यक्ष उपेंद्र गावकर हे प्रवक्ते संजीव नाईक, तारक आरोलकर, अविनाश शिरोडकर, ॲड रामकृष्ण नाईक, हनुमान नाईक व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या निवासस्थानी पोचले. आहे की नाही एकजुटीसाठी निमित्त! ∙∙∙

CM Pramod Sawant | Goa Politics
CM Pramod Sawant | Goa Politics Dainik Gomantak

इकडे एक, तिकडे एक

मुख्यमंत्री स्वतः मंचावर येऊन कामगारांचा सन्मान करतात, सहकार्याचे बोलतात. पण दुसरीकडे ‘आयटक’सारख्या संघटना कामगारांच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करत नाहीत, असे खुलेआम सांगतात. मग प्रश्‍‍न असा निर्माण होतो की मुख्यमंत्री खरेच मागण्या मान्य करतात की नाही? की फक्त भाषणातच मान्य करतात आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीला बगल देतात? कामगारांच्या मागण्या मान्य करत असल्याचा दावा सरकार करत असेल तर मग त्या मागण्या प्रत्यक्षात कधी अमलात आणल्या जाणार? की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांना खूष करण्याचे खेळ आहेत? सन्मान करायचा असेल तर तो कृतीतून दिसू द्या, शब्दांतून नव्हे, असे आता आम्‍ही नव्‍हे कामगारच बोलू लागले आहेत. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

अन्‌ सुदिनरावांची कळी खुलली

परवा श्री महालक्ष्मी देवस्थानात झालेल्या स्वातंत्र्यसैनिक रघुपती भांडारी यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला वीजमंत्री सुदिन ढवळीकर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. यावेळी एका वक्त्याने बांदोडा काशी मठ येथील बांदोडकर मैदानाचा उल्लेख केला. एवढेच नव्हे तर वॉकिंगसाठी या मैदानावर एक परिपूर्ण ट्रॅक उपलब्ध करून दिल्याबद्दल सुदिनरावांचे आभार मानून त्यांना पुष्पगुच्छही प्रदान केला. यामुळे सुदिन यांची कळी अशी काही खुलली म्हणतात की शेवटपर्यंत ते त्या ‘हँगओव्हर’खालीच राहिले. आपल्या भाषणातही त्यांनी हे मैदान आपण का अस्तित्वात आणले ते त्या आभार मानलेल्या वक्त्याला अगदी तपशीलवारपणे सांगितले. आहे की नाही मजा? तिथे उपस्थित असलेल्यांमध्‍ये नंतर बराच वेळ याच गोष्टीची चर्चा सुरू होती. नाही तरी हे मैदान म्हणजे सुदिनरावांची मर्मबंधातील ठेव बनली आहे यात शंकाच नाही. त्यामुळे या ठेवीला कोणी जागृत केले की ते खुलायला लागतातच. त्याचा प्रत्यय परत एकदा आला...नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com