

Asim Munir ID Verification Video: जर्मनीमध्ये आयोजित म्युनिक सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना एका अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली. या परिषदेत प्रवेश करताना तेथील सुरक्षा रक्षकांनी थेट लष्करप्रमुखांनाच त्यांचे ओळखपत्र विचारल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर जगभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, असीम मुनीर जेव्हा परिषदेच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढे सरकतात, तेव्हा तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले. कोणाचीही पर्वा न करता रक्षकाने त्यांना त्यांचे आयडी कुठे आहे, अशी विचारणा केली. काही सेकंद ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतरच त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली. ही घटना पाहून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अनेकांनी याला पाकिस्तानची 'राजनैतिक नामुष्की' म्हटले असून एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाला अशा प्रकारे ओळखपत्रासाठी अडवले जाणे हे त्या देशाच्या प्रतिमेसाठी धक्कादायक असल्याचे मत मांडले आहे. तर दुसरीकडे, काही लोकांच्या मते म्युनिक सुरक्षा परिषदेसारख्या अत्यंत संवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी नियम सर्वांसाठी समान असतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
म्युनिक सुरक्षा परिषद ही जगातील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा मंचांपैकी एक मानली जाते, जिथे दरवर्षी जगभरातील बडे नेते, मंत्री आणि लष्करी अधिकारी जागतिक सुरक्षा आणि मुत्सद्देगिरीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. मात्र, यंदा या परिषदेच्या निमित्ताने असीम मुनीर यांना केवळ सुरक्षेच्या प्रश्नांचाच नव्हे, तर राजकीय विरोधाचाही सामना करावा लागला.
जर्मनीमध्ये सक्रिय असलेल्या 'जेये सिंध मुत्ताहिदा महाज' (JSMM) या सिंधी राजकीय संघटनेने परिषदेच्या ठिकाणाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यांनी मुनीर यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेत पाकिस्तानी लष्करावर मानवी हक्कांचे उल्लंघन आणि राजकारणातील हस्तक्षेपाचे गंभीर आरोप केले. जरी या निदर्शनांमुळे परिषदेच्या कामकाजात कोणताही अडथळा आला नसला, तरी असीम मुनीर यांच्या जर्मनी दौऱ्यात झालेली ही 'आयडी' चौकशी आणि बाहेर झालेला विरोध यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मात्र तडा गेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.