"व्हॅलेंटाइनवेळी गोव्याचे किनारे असे काही गजबजतात की, पाऊल ठेवायला जागा उरत नाही; प्रेमाचा बाजार आणि साहित्याचा ठणठण गोपाळ

Valentine Day Analysis: वसंत ऋतूच्या आगमनापूर्वीच बाजारात ‘व्हॅलेंटाइन’चा जो मोसम येतो, तो पाहिला की प्रश्न पडतो - हे प्रेम आहे की निव्वळ कॉर्पोरेट कंपन्यांनी मांडलेला एक जागतिक बाजार?
Valentine Day Analysis
Valentine Day AnalysisDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

नेहमीप्रमाणे ह्यावर्षीही व्हॅलेंटाइन डे साजरा झाला. फेब्रुवारी महिना उजाडला की, कॅलेंडरवरच्या तारखांना गुलाबी रंग चढू लागतो. हवेतल्या थंडीसोबतच मध्यमवर्गीय तरुणांच्या काळजाची धडधड आणि खिशाची चणचण एकाच वेळी वाढू लागते.

वसंत ऋतूच्या आगमनापूर्वीच बाजारात ‘व्हॅलेंटाइन’चा जो मोसम येतो, तो पाहिला की प्रश्न पडतो - हे प्रेम आहे की निव्वळ कॉर्पोरेट कंपन्यांनी मांडलेला एक जागतिक बाजार? आजच्या डिजिटल युगात प्रेमाचा हा सोहळा जेवढा ‘ग्लोबल’ झाला आहे, तेवढाच तो ‘पोकळ’ही होत चालला आहे.

आता प्रेम ‘स्टेटस’वर असतं आणि ब्रेकअप ‘ब्लॉक’ लिस्टमध्ये. व्हॅलेंटाइनच्या या सात दिवसांच्या ‘सापशिडी’त मराठी तरुण जेव्हा उतरतो, तेव्हा त्याचे अर्थशास्त्र कोलमडून पडते. ‘रोज डे’ला चाळीस रुपयांचं फूल घेताना स्वतःलाच समजावून तो गुलाबाचा काटा टोचून घेतो.

व्हॅलेंटाइन डे आणि गोवा यांचे एक उपरोधिक नाते आहे. या काळात गोव्याचे किनारे प्रेमी युगुलांनी असे काही गजबजतात की, वाळूवर पाऊल ठेवायला जागा उरत नाही. कळंगुटपासून पाळोळेपर्यंत सगळीकडे केवळ ‘रेड आणि व्हाइट’ ड्रेसकोडचा सुकाळ असतो.

शॅकमध्ये बसून समुद्राच्या लाटांकडे बघण्यापेक्षा, सूर्यास्ताच्या पार्श्‍वभूमीवर ‘परफेक्ट इन्स्टाग्राम रील’ बनवण्यातच तरुणाई धन्यता मानते. गोव्याची निसर्गदत्त शांतता आता शॅकमधल्या धांगडधिंग्यात हरवली आहे. प्रेमाचा हा सोहळा आता ‘सबस्क्राइब’ आणि ‘फॉलो’च्या चढाओढीत अडकला आहे.

आजच्या प्रेमात शब्दांपेक्षा ‘इमोजीं’ना अतोनात महत्त्व आले आहे. प्रियकराने रक्ताचं पाणी करून लिहिलेल्या प्रेमपत्राची जागा व्हॉट्सॲपवरच्या ‘लाल हृदया’च्या ठिपक्याने घेतली आहे. हा केवळ संवादाचा अभाव नाही, तर हा ‘इमोजींचा व्यापार’ आहे.

बाजारात पाच रुपयाचे गुलाब पन्नास रुपयांना विकले जातात, भावनांचा हा लिलाव पाहून असं वाटतं की, प्रेम आता हृदयातून स्थलांतरित होऊन मॉलच्या शोरूममध्ये कायमचं स्थायिक झालं आहे. हे सगळं पाहिलं की प्रकर्षाने वाटतं, मॅकॉलेने भारताला बदलण्याचे आणि भारतीय पिढ्यांना स्वतःच्याच साहित्याविरुद्ध उभे करण्याचे जे स्वप्न पाहिले होते, त्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

मॅकॉलेच्या शिक्षणपद्धतीने आपल्याला पदव्या तर दिल्या, पण आपल्या भाषेची आणि साहित्याची नाळ तोडून टाकली. ज्या मराठी मातीत ज्ञानेश्वरांनी विरहिणी लिहिल्या, जिथे कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ अजरामर केले आणि बा. भ. बोरकरांनी गोव्याच्या निसर्गातून शृंगाराचे लेणे विणले, तिथे आज साहित्याचा ‘ठणठण गोपाळ’ झाला आहे. मॅकॉलेच्या मानसपुत्रांना आपल्या अभिजात साहित्यापेक्षा पाश्‍चात्त्य कंपन्यांनी लादलेले हे ‘डे’ अधिक जवळचे वाटू लागले आहेत.

साहित्याचा व्हॅलेंटाइन कधी जन्मणार? पुस्तकावर शंभर रुपये खर्च करताना विचार करणारा हात, व्हॅलेंटाइनच्या पब पार्टीत हजारो रुपये उडवताना थरथरत नाही. बोरकरांची कविता वाचण्यापेक्षा क्रूझवर नाचणं हे तरुणाईला प्रेमाचं लक्षण वाटतं.

Valentine Day Analysis
Valentines Day 2026: मैत्रीच्या बळावर उभं राहिलेलं प्रेम! विजय सरदेसाई यांच्या आयुष्याची सुरेल धाग्याने विणलेली कहाणी..

साहित्याची ही उपेक्षा म्हणजे आपण आपल्या संस्कृतीचा आरसा बाजारात गहाण ठेवला आहे. खरे तर प्रेमाच्या या मोसमात आपण एका नव्या परंपरेचा विचार करायला हवा.

गुलाबाच्या फुलाचे आयुष्य दोन दिवसांचे असते, पण एका चांगल्या पुस्तकाचे आयुष्य पिढ्यान्पिढ्यांचे असते. जर या व्हॅलेंटाइन डेला तरुणाईने गुलाबाऐजी मराठी साहित्यातील एखादे पुस्तक भेट दिले, तर साहित्याला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळेल. मॅकॉलेने पेरलेली आपल्याच साहित्याबद्दलची अनास्था आपण या पुस्तकांच्या भेटीतूनच संपवू शकतो.

Valentine Day Analysis
Valentine Day 2026: 'हमने तो जब कलियाँ माँगी, काँटों का हार मिला'! व्हॅलेंटाईन डेचा उत्साह, गुलाबांवर मात्र संक्रांत

शेवटी, प्रेम ही विकत घेण्याची वस्तू नसून ती अनुभवण्याची जाणीव आहे. महागड्या प्लास्टिकच्या टेडीपेक्षा एकमेकांना दिलेला मनाचा वेळ आणि कृत्रिम इमोजीपेक्षा दिलेली सकस साहित्याची साथ जास्त मोलाची असते.

ज्या दिवशी आपण मोबाइलच्या निळ्या प्रकाशातून बाहेर पडून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघून मनमोकळा संवाद साधू आणि पुस्तकांच्या रूपाने प्रेमाची नवी पाने उघडू, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा होईल. अन्यथा बाजारातली गर्दी वाढतच जाईल आणि साहित्याचा कोपरा मात्र ‘ठणठण गोपाळ’च राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com