
डिचोली : श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात शुक्रवारी उत्तररात्री ३.३० च्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांना प्राण गमवावे लागले. होमकुंडाकडून तळीकडे जाणाऱ्या मार्गावर चढणीच्या मध्यावर ही दुर्घटना घडली. यात ७५ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जण गंभीर आहेत. मरण पावलेले आणि जखमींमध्ये धोंडगणांचा मोठा समावेश आहे. अलीकडच्या काळातील राज्यातील ही मोठी दुर्घटना आहे.
१ चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी काही धोंड वेतकाठी नाचवत होते. त्या काठीचा स्पर्श रस्त्याच्या कडेच्या वीजवाहिन्यांना झाला. त्यावेळी ठिणग्यांमुळे पळापळ झाली, असे काहीजणांचे म्हणणे आहे.
२ काहींच्या म्हणण्यानुसार तळी ते होमकुंडदरम्यानच्या रस्त्यावर भाविक आणि धोंड यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर ढकलाढकलीत झाले आणि काहीजण धावू लागल्यावर अनेकजण चिरडले गेले.
३ तिसऱ्या माहितीनुसार, दोन गट समोरासमोर आले. चिंचोळ्या रस्त्यावरून कोणी आधी जायचे, यावरून वाद झाला. मग रेटारेटी झाली आणि ही दुर्घटना घडली.
४ चौथ्या म्हणण्यानुसार, तळीवर स्नान केल्यानंतर धोंडांचा एक गट होमकुंडाच्या दिशेने जात होता. काही धोंंड उतारावर पडले आणि मागून येणाऱ्या धोंडांच्या रेट्याखाली चिरडले.
या दुर्घटनेनंंतर जिल्हाधिकारी स्नेहा गीते, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जीवबा दळवी, डिचोलीचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांची बदली केली आहे. अक्षत कौशल यांच्या जागी राहुल गुप्ता, तर स्नेहा गीते यांच्या जागी आयएएस यशस्वीनी बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुड्डी मंदिराकडून श्री लईराई देवीच्या जयघोषात धोंड भक्तगण होमकुंडस्थळी मार्गक्रमण करताना वडाचावाडा येथे धोंड भक्तगणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. अचानक या वादाचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले. चेंगराचेंगरी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही कमी पडली. यावेळी काही धोंड भक्तगण चिरडले गेले, असे सांगण्यात आले.
डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी शिरगाव येथे जाऊन घटनेचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. वडाचावाडा येथील रस्ता अरूंद असून होमकुंड स्थळी जाताना एक उतार लागतो. दरवर्षी वडाचावाडा येथे या उतारावर गोंधळ आणि गडबड होते. गेल्यावर्षीही अशाच चेंगराचेंगरीत एक महिला दगावली होती. मात्र, त्यातून काहीच बोध घेतलेला नाही.
१३ हजार पोलिस सुरक्षेसाठी नेमल्याचे समजले; पण १३ हजार पोलिस होते कुठे?
जत्रेवेळी काही पोलिस मंदिरामागे झोपले होते, असे काही भाविकांचे म्हणणे.
आम्हीच लोकांना पोलिसांच्या गाडीत बसविले; पोलिस मदतीला आले नाहीत.
पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिला असता, तर दुर्घटना टाळता आली असती.
महिला पडण्याचे कारण म्हणजे दोऱ्यांचा चुकीचा वापर. पोलिसांनी दोरी वरून न धरता ती दोन्ही बाजूने पायाकडे ओढली. त्यामुळे अडखळून महिला व लोक पडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.