Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

Khari Kujbuj Political Satire: न्या. रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सृष्टीचक्रात निसर्गचक्रात अधेमधे पालट होतो. पडझड, नवनिर्मिती होते.

गोमन्तक डिजिटल टीम

अबब; ५० कोटींचा खर्च वायफळ !

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी सरकारनेच नेमलेल्या ‘टास्क फोर्स’ने आयआयटी मद्रासचा अहवाल मिळविला आहे. त्यातून जे निष्कर्ष निघाले आहेत, ते पाहता फोर्सच्या सदस्यही आश्चर्यचकीत झालेले असावेत. सार्वजनिक बांधकाम खात्याला नूतनीकरणासाठी सरकारकडून मिळालेल्या ६० कोटी रुपयांपैकी ५० कोटींचा खर्च हा केलेले काम पाहता वायफळ झाला आहे, असे दिसून आले आहे. त्या तुलनेत मडगावच्या रवींद्र भवनाचे जे नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे, ते कितीतरी पटीने कमी खर्चात झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष बाब म्हणजे रवींद्र भवनात खुर्च्या बदलल्या, फॉल सिलिंग बदलले, विद्युतीकरण नव्याने करण्यात आले, याशिवाय इतर काही कामे करण्यात आली पण तो खर्च काहीच कोटींत झाला आहे. विशेष बाब म्हणजे सरकारच्या कला व संस्कृती खात्याच्या लक्षात ही तफावत नक्कीच आली असणार आहे. त्यामुळे अकादमीच्या कामात जे झाले, त्याची जबाबदारी कोणावर टाकणार आहेत आणि कोणाला दोषी ठरवणार आहेत, हे पहावे लागेल. ∙∙∙

सुदिनरावांचे एक स्वप्न पूर्ण...!

बांदोडा अंडरपासचे उद्‍घाटन झाले आणि स्थानिक आमदाराचे आणखी एक स्वप्न साकार झाले. खांडेपार - कुर्टीतील चौपदरी रस्त्याच्या कामावेळी येथील अंडरपासचे काम पुरातत्व खात्याने हरकत घेतल्याने बंद पडले होते, पण स्थानिकांची जोरदार मागणी आल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनी हे काम नियोजित स्थळापासून थोड्याशा अंतरावर हाती घेतले आणि पूर्णही केले. शेवटी लोकांची मागणी महत्त्वाची असे सांगताना सुदिनरावांनी हे काम पूर्ण केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुदिन ढवळीकरांचे एक असते, ते एखादे आश्‍वासन देतात, ते पूर्ण करण्यासाठी शंंभर टक्के काम करतात, बरोबर ना...! ∙∙∙

आयत्या पिठावर रेघा

न्या. रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सृष्टीचक्रात निसर्गचक्रात अधेमधे पालट होतो. पडझड, नवनिर्मिती होते. गोव्याच्या राजकीय, सामाजिक पटलावर सध्या पत्त्यांची पाने पिसतात तशी घुसळण चालू आहे. विधानसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण पाहूनच नेमका किती प्रभाव बिंबित झाला याचा पडताळा मिळेल. रिबेलो हे चारित्र्यवान, विद्वान, हुशार, दणकेबाज वक्ते, दूरदृष्टी असलेले द्रष्टे गोंयकार. सूर्यासारखे चकचकणारे, तलवारीसारखे चमकणारे. गंमत अशी की या सूर्याच्या तेजाने प्रस्थापित झालेल्या आयत्या मंचावर येऊ पाहणारे काही काजवे पाहिल्यावर हसू येते. सूर्य कुठे, काजवे कुठे. शारीरीक वय वाढलं म्हणून बौध्दिक, वर्तनशील वय वाढतंच असं नाही. होऊ घातलेल्या या परिवर्तनशील संक्रमण अवस्थेत लोकांचे औट घटका का होईना, या विस्कटलेल्या, भरकटलेल्या काजव्यांच्या बेताल तालगडीचं मनोरंजन होत आहे, हे देमायज (खूप) झाले.

माटवाखालचे नेते

चिंबल येथील युनिटी मॉलला विरोध करण्यासाठी लोक एकवटले आणि त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा जाहीर केला. रविवारी ४ जानेवारी रोजी चिंबलवासीयांनी कदंबा पठारावर जाहीर सभेचे आयोजन करून गोमंतकीयांना उपस्थित राहण्याची हाक दिली होती. या हाकेला ओ देत महिला, वयोवृद्ध तसेच तरुण कदंबा पठारावर जमले व त्यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता जमिनीवर बसून भाषणे ऐकली व घोषणाही दिल्या. परंतु सभेस हजर असलेले दोन आमदार युरीबाब व कार्लुसबाब तसेच ‘आप’चे तत्कालीन अध्यक्ष अमित पालेकर मात्र व्यासपीठाशेजारी उभारलेल्या मंडपाखाली सावलीत बसले होते. सामान्य जनतेला उन्हाचे चटके सोसायला लावत आपण मात्र सावलीत बसणारे हे ‘माटवाखालचे नेते’, असा खोचक टोला एका राजकीय निरीक्षकाने आपल्या समाजमाध्यमांवरील खुल्या व्यासपीठावरून लगावला आहे व त्यास अनेकांचा दुजोराही मिळत आहे. ∙∙∙

जेनिटोचे देव बोडगेश्वर दर्शन

म्हापशात नुकतेच झालेले एक व्हीआयपी देवदर्शन चर्चेचा विषय ठरलाय. जेनिटो कार्दोज याने थेट श्री बोडकेश्वर मंदिर गाठलं आणि दर्शन घेतलं. नेहमी सामान्य जनता फंड पेटीच्या बाहेर उभी राहून “आपला नंबर कधी?” याची वाट पाहते; पण जेनिटोला मात्र थेट चरणी नेण्यात आलं. वेगळं लक्ष, आणि गाऱ्हाणेसुद्धा खास! हा व्हिडिओ व्हायरल होताच ऑनलाईन पंडितांनी लगेच कमेंट्सची आरती सुरू केली. जेनिटो स्वतःसाठी संरक्षण मागायला गेला की कुणाला संरक्षण देण्यासाठी? असा सवाल राज्यभर फिरू लागला. काहींनी तर म्हटलं देवाकडेही व्हीआयपी कोटा सुरू झाला वाटतं! खरं तर देव सर्वांना सारखाच असं म्हणतात. पण इथे दर्शनाची रांग मात्र वेगळीच दिसली. आता प्रश्न एवढाच फिरतोय आणि तो म्हणजे बोडकेश्वराच्या चरणी जेनिटोने काय मागितलं, राजकीय संरक्षण की लोकांचा विश्वास?∙∙∙

मोपा विमानतळाचा फायदा कोणाला?

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी मोपा विमानतळाचा पेडणेवासीयांना फायदाच झालेला नाही, असे जाहीर केले आहे. यामुळे अनेकांना मोपाच्या पठारावर विमानतळाला पर्यावरण दाखला देण्यासंदर्भात झालेली जनसुनावणी आठवू लागली आहे. पोट तिडकीने अनेकांनी तेथे विमानतळाचे समर्थन केले होते. हेच फळ काय मम तपाला असे विचारण्याची वेळ अशांवर आली आहे. कोरगावकर यांनी ते बोलून दाखवले तरी बहुसंख्य पेडणेवासीयांच्या मनात ती भावना असल्याचे बोलले जात आहे.∙∙∙

भूरुपांतरणाची पोळी...

राज्यात भूरुपांतरणाचा विषय पेटतोय, तसा राजकीय तवा चांगलाच तापलाय. आंदोलन उभं राहतंय हे कळताच अनेक आमदारांना अचानक जमिनीची आठवण झाली. कालपर्यंत ‘भूरुपांतरण म्हणजे विकास’ म्हणणारे आज ‘भूरुपांतरण म्हणजे विनाश’ अशी भूमिका घेताना दिसतायत. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, निवेदनं सरकारकडे पोहोचली आणि राजकारण्यांच्या डोळ्यांसमोर लगेच एकच चित्र उभं राहिलं ते म्हणजे ‘क्रेडिट’. सरकारने जर उद्या भूरुपांतरणात बदल केला, तर ‘हे आमच्यामुळेच झालं’ असं सांगायला सगळे आधीच रांगेत उभे आहेत. आंदोलन लोकांचं, घाम कार्यकर्त्यांचा, पण फोटो आणि मथळे मात्र नेत्यांचे! काही आमदार तर आंदोलनात थेट दिसतही नाहीत, पण सोशल मीडियावर मात्र पहिल्या रांगेत उभे असतात. ‘जनतेच्या भावनांचा विजय’. भावना जनतेच्या, विजय मात्र स्वतःचा! ∙∙∙

महानिरीक्षक कोलवाळला कधी?

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह नेहमीच वाईट कारणांसाठी चर्चेत असते. तेथे बंद असलेले संशयित तक्रारदार व साक्षीदारांना फोनवरून धमकावत असल्याच्या तक्रारी आता सर्रास झाल्या आहेत. आता न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. एका संशयितांने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना तो फोनवर तक्रारदाराला धमकावतो असे न्यायालयासमोर सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने प्रशासनाची कडक शब्दांत कान उघडणी केली आहे. कारागृह महानिरीक्षक आणि अतिरीक्त कारागृह निरीक्षक पणजीत बसतात. त्यांच्या पणजीतूनच कारभार चालतो. त्यामुळे कोलवाळ कारागृहातील कारभार सुधारण्यासाठी या दोन्ही बड्या अधिकाऱ्यांना कोलवाळ येथे सरकार कार्यालयासह पाठवणार अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT