

पणजी: सत्ताधारी भाजपचा पराभव करायचा असेल, तर विरोधी पक्षांची युती होणे गरजेचे आहे हेच आपले मत होते. गोव्यातील मतदारांनाही विरोधी पक्षांची युती हवी होती. त्यामुळे दसऱ्याआधी तसे प्रयत्न सुरू करून त्याची माहिती आपण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिलेली होती. परंतु, पक्षाने आपले ऐकले नाही. त्याचाच फटका ‘आप’ला जिल्हा पंचायत निवडणुकीत बसला, असा दावा ‘आप’चे माजी राज्य संयोजक अमित पालेकर यांनी केला.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आम आदमी पक्षाने (आप) आपल्याला तसेच आमदारांनाही विश्वासात न घेता, आमच्याशी चर्चा न करता आपल्याला राज्य संयोजक पदावरून काढून टाकल्याचे दु:ख झाल्याचे म्हणत, सांताक्रूजमधील मतदारांशी चर्चा करूनच इतर पक्षात प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.
२०२१ मध्ये आपण ‘आप’मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपल्याकडे राज्य संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. सांताक्रूजमधील मेरशी, चिंबल, कालापूर भागात आपले मतदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तसेच कुटुंबाशी चर्चा करूनच कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे आपण पुढील दोन ते तीन महिन्यांत ठरवणार असल्याचे पालेकर म्हणाले.
‘आप’मध्ये राहून आपण पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याच पदवीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी इतर पक्षात जाण्यास पक्षानेच सांगितले आहे. त्यामुळे आपण लवकरच इतर पक्षात प्रवेश करणार असल्याचेही अमित पालेकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.