Goa Politics: खरी कुजबुज; पालेकरांकडे भाजपचाही पर्याय?

Khari Kujbuj: ‘कायदा गाढव असतो’, ही म्हण आपल्या पोलिस खात्याला नेमकी लागते. राज्यात कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्या विकण्यात बंदी आहे.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

शंभर भरा अन् कायदा तोडा!

‘कायदा गाढव असतो’, ही म्हण आपल्या पोलिस खात्याला नेमकी लागते. राज्यात कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्या विकण्यात बंदी आहे. सरकारने तसा कायदाही केला आहे.आता कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थानी व पोलिस खात्याने करायला हवे.मात्र तसे होताना दिसत नाही. प्लास्टिक बंदीचा कायदा केवळ कागदावरच राहिला आहे.बाजारांत कमी मायक्रोन प्लास्टिक पिशव्याचा वापर बिनधास्तपणे सुरू आहे. कुंकळळी बाजारांत रविवारचा बाजार भरतो.या बाजारात विक्रेते कमी मायक्रोनच्या पिशव्या बिनधास्त वापरतात.या आठवड्याच्या बाजारात पोलिस येतात आणि प्लास्टिक पिशव्या वापरल्या म्हणून प्रत्येक विक्रेत्याला शंभर रुपयांचा दंड ठोठावतात व पिशव्या वापरण्याचा हंगामी परवाना देतात. असे केल्याने पोलिसांना आपला रेकॉर्ड दाखवायला मिळतो, विक्रेत्यांना स्वस्त पिशवीतून सामान विकायला मिळते. आयती ग्राहकांना ही मोफत पिशवी मिळते. मात्र यात नुकसान होते ते आपल्या निसर्गाचे. आता बाजारकर म्हणायला लागलेत, शंभर भरा अन् कायदा मोडा. ∙∙∙

काशिनाथ शेट्येंनी साधली संधी!

वीज खात्याचे कार्यकारी अभियंता व नोडल अधिकारी काशिनाथ शेट्ये हे आज मडगावात अवतरले व त्यांनी वीज खांबांवरील सर्व इंटरनेट केबल कापून टाकल्या. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून व स्वतःही या केबल कापल्या हे विशेष. काही दिवस त्यांची मडगावात बदली झाली होती. तेव्हा त्यांनी बेकायदेशीर गाडे हटविण्याच्या कामाला जणू हातच घातला. पण स्थानिक राजकारण्यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली. आज त्यांना पुन्हा एकदा मडगावात येऊन जिल्हाधिकारी व न्यायालयाच्या आदेशावरून वीज खांबांवरील इंटरनेट केबल कापण्याची नामी संधी मिळाली. अजून तरी राजकारण्यांकडून याबद्दल काहीही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. जर हे इंटरनेट केबलवाले राजकारण्यांचे हस्तक असतील, तर उद्या हे केबल एकदा खांबांवर लटकवलेही जातील. पण या क्षणाला शेट्ये बाबांनी संधी साधली, अशी चर्चा मडगावात रंगतेय! ∙∙∙

‘चौरस मीटर’चे युद्ध

आमदार जीत आरोलकर सांगतात, पेडणे तालुक्यात तब्बल ६० लाख चौरस मीटर जमीन रूपांतरित झाली, तर नगर नियोजन मंत्री म्हणतात अहो, सुमारे दोन लाखच झाली. एवढ्या फरकावर आता लोक आकडेमोडीत नव्हे तर राजकारणातच गोंधळलेत. चर्चा रंगू लागली आणि लगेच मंत्र्यांनी एक पत्रक काढले, दोन लाखच योग्य! आता प्रश्न असा की उरलेले ५८ लाख चौरस मीटर कुठे गेले? कागदात हरवले, की राजकारणात मिसळले? ही आकड्यांची चूक आहे, की मुद्दाम केलेली खेळी, की लोकांच्या डोळ्यात धूळफेक? बुधवारी तर या ‘चौरस मीटर युद्धा’ची चर्चा पेडणे तालुक्यात गावोगावी, फर्निचर दुकानांपासून थेट किनारी पट्ट्यापर्यंत जोरात रंगू लागली आहे. आकडेही मोठे अन् चर्चाही मोठी! ∙∙∙

पोलिसांचे नाटक संपले

गेल्यावर्षी राज्यात दरोडा पडल्यावर पोलिसांनी सुरक्षेचा भव्य प्रयोग सुरू केला होता. रात्रीची गस्त, चौकाचौकात नाकाबंदी, जणू सगळं राज्यच ‘हाय अलर्ट’वर! वर्षअखेरीपर्यंत हे नाटक रंगत राहिलं, टाळ्याही पडल्या. पण नवीन वर्ष सुरू होताच, या नाटकाचा तिसरा भाग संपला आणि पडदा अलगद खाली पडला. आता रात्री गस्त कुठेच दिसत नाही, नाकाबंदी तर शोधूनही सापडत नाही. पोलिस सांगतात, संख्या पुरेशी आहे, सुरक्षा आमच्याच हातात आहे. मग लोक विचारतात जर सगळं सुरळीत आहे, तर ती नाकाबंदी गेली कुठे? गस्त गायब कशी झाली? त्यामुळे सध्या एकच चर्चा रंगतेय ती, म्हणजे पुन्हा दरोडा पडेपर्यंत पोलिसांचा ‘पुनर्प्रवेश’ होणार नाही! ∙∙∙

पालेकरांकडे भाजपचाही पर्याय?

गत जिल्‍हा पंचायत निवडणुकीत पक्षाला आलेल्‍या अपयशाचा ठपका ठेवत आम आदमी पक्षाने (आप) राज्‍य संयोजक अमित पालेकर यांना तडकाफडकी पदावरून हटवले आणि श्रीकृष्‍ण परब यांच्‍याकडे या पदाचा अतिरिक्त ताबा दिला. त्‍यानंतर काहीच दिवसांत पालेकर, परब यांच्‍यासह पाच जणांनी आपला रामराम केला. त्‍यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत पक्षाच्‍याच धोरणांसंदर्भात संभ्रम निर्माण झाला. पालेकरांनी राजीनामा दिल्‍यानंतर ते नेमके कोणत्‍या पक्षात जाणार? याकडे सांताक्रूजवासीयांचे लक्ष आहे. पालेकर काँग्रेसमध्‍येच जाणार, अशा चर्चा सुरू असतानाच आपल्‍याकडे अनेक पर्याय आहेत. परंतु, सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊनच आपण योग्‍य पर्याय निवडणार असल्‍याचे त्‍यांनी एका स्‍थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्‍यामुळे पालेकरांकडे ‘भाजप’चाही पर्याय नसेल ना? अशा चर्चा सुरू झाल्‍या आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; खरेच युती की नुसता ‘दिखावा’?

नेमके जबाबदार कोण?

सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत यांनी काहीच दिवसांपूर्वी दिल्‍लीत जाऊन केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्‍यांना सुमारे ७ हजार कोटींच्‍या रस्‍ते प्रकल्‍पांचे प्रस्‍ताव सादर केले. त्‍यामुळे आगामी काळात गोव्‍यात नवे रस्‍ते, रस्‍त्‍यांचे रुंदीकरण मार्गी लागेल, याचा गोमंतकीय जनतेला ठाम विश्‍‍वास आहे. परंतु, आहेत त्‍याच रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे आणि हॉटमिक्‍स डांबरीकरणाचे दिलेले

आश्‍‍वासन कामत अजूनही का पूर्ण करू शकत नाहीत? याला ते स्‍वत: जबाबदार आहेत की कंत्राटदार? या प्रश्‍‍नांची उत्तरे जनता शोधत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

‘त्या’ चारचाकींवर कारवाई व्हावी!

चारचाकीच्या मागे सायकल नेण्यासाठी खास स्टॅण्ड असावा, ही कल्पना चांगलीच. पण सायकल नसेल तेव्हा तोच स्टॅण्ड मऊ कव्हर घालून सुस्थितीत ठेवायचा, हा नियम बहुतेकांना माहीतच नसावा! काही कारवाले तर मागे सरळ टोकदार शस्त्र घेऊनच फिरताहेत. मागून येणाऱ्या वाहनाने जर चुकून धडक दिली, तर अपघातात जीव जाईल, अशी भीती असून तशी चर्चा राज्यात रंगते आहे. अपघात झाला आणि जीव गेला तर जबाबदारी कुणाची? असा प्रश्नही आता चर्चेत आहे. विशेष म्हणजे अशा ‘धोकादायक फॅशन’ कार बुधवारी पणजीत मोकाट फिरताना दिसल्या. पोलिसांनी सायकलपेक्षा आधी या टोकदार स्टॅण्डवर लक्ष घालावं, अशी गंभीर मागणी आता चर्चेतून होत आहे! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com