Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घुसखोर सापडले; मात्र आश्रयदात्यांची प्रशासनाने चौकशी केली का?

Goa Crime News: बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गोव्यासह देशभरात गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: देशभरात विविध तपास यंत्रणांनी सुरु केलेल्या छापेमारीनंतर गोवा राज्यातही घुसखोरांनी दहा वर्षांपासून अधिक काळ बस्तान मांडल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. छापेमारी झाली नसती तर आणखी काही वर्षे हे दुष्टचक्र असेच सुरू राहिले असते. यातील गंभीर बाब म्हणजे, स्थानिकांनीच त्यांना खोल्या उभारून आश्रय दिला आहे आणि प्रशासनानेही राज्यात कोण, कुठून येऊन राहतो, व्यवसाय करतो, याची चौकशी केलेली नाही.

सध्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गोव्यासह देशभरात गाजत आहे. आतापर्यंत सत्तरी तालुक्यातून जवळपास दहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात वाळपई, भुईपाल, नागवे या भागातून बांगलादेशी घुसखोरांना अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाळपई पालिका क्षेत्रात असे दोन प्रभाग आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय लोक मोठ्या संख्येने राहतात. बेकायदेशीररित्या खोल्या उभारून त्यांना आश्रय दिला जात आहे. त्यात बांगलादेशी नागरिकसुद्धा असू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात येते.

दरम्यान, अशा पध्दतीने वास्तव्य करून राहाणाऱ्या घुसखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे 50 हून अधिक घरांच्या पाठीमागे बेकायदेशीररित्या खोल्या उभारून भाडेपट्टीवर देण्यात आल्या आहेत. तसेच याची नोंद पोलिस स्थानक किंवा पालिकेकडे नसल्याचे सांगण्यात येते.

सध्या सुरू असलेल्या छापेमारीमुळे वाळपई शहरासह सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काम छुप्या पद्धतीने करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या हे कार्यकर्ते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले असून कोणत्याही क्षणी त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या काळात या संघटनेचे अनेक कार्यकर्ते गजाआड होण्याची भीती असून यामुळे खळबळ उडाली आहे.

बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून केलेली कारवाई आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची होणारी धरपकड यामुळे सत्तरी तालुक्यामध्ये सध्या तरी मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे.

‘पॉप्युलर फ्रंट’चे वाळपईतही धागेदोरे

1. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर देशभरासह राज्यातही कारवाई केल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होत आहे.

2. वाळपई भागातही ही संघटना कार्यरत असून तिचे छुप्या पध्दतीने काम सुरू असल्याचे समजते.

3. एक लोकप्रतिनिधीही त्या संघटनेचा कार्यकर्ता आहे. या संघटनेला राजकीय वरदहस्तही असल्याचे समजते.

4. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आझाद मैदानावर पाॅप्युलर फ्रंटची महासभा झाली, त्यावेळी वाळपईतून जवळपास चार बसेस भरून लोक त्या सभेत सहभागी झाले होते.

5. वाळपईतील एका नामांकित शाळेत वारंवार या संघटनेच्या बैठका होत असल्याचे सांगण्यात येते.

5. त्यामुळे अशा संघटना देशविघातक कारवायांमध्ये तर गुंतलेल्या नाहीत ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घुसखोरांची सराईत गुन्हेगारांना साथ: नागवे येथे पकडलेला एक बांगलादेशी गेल्या १२ वर्षांपासून वाळपई भागात राहात होता. तो भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. तोही बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बिलाल नामक इसमाची पार्श्वभूमीही दहशतवादी स्वरूपाची आहे.

गोव्यात अनेक ठिकाणी एटीएम फोडल्याच्या प्रकरणात हात असलेल्या संशयितांना तो न्यायालयात जामीन राहायचा. त्यांची सुटका झाल्यावर त्यांना नागवे येथे आणून ठेवत असे. त्यामुळे अशा घुसखोरांना आश्रय देणाऱ्या घरमालकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवास

विशेष म्हणजे, आणखी काही बांगलादेशी घुसखोर वाळपई भागात वास्तव्य करून असल्याचे सांगण्यात येते. अनेक बिगर गोमंतकीय रोजगाराच्या निमित्ताने गोव्यात येतात आणि नंतर येथेच स्थायिक होतात. त्यानंतर बनावट कागदपत्रे बनवून सरकारी सुविधा आणि योजनांचाही लाभ घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT