

पणजी: कला अकादमीच्या ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल तयार होताना आपले नाटक स्पर्धेत पहिले येण्यासाठी संबंधित परीक्षकांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची ‘लाच’ देऊ करण्याचे आमिष दाखवण्यासोबत कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षकांना मद्याची बाटली भेट द्यायचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परीक्षकांनी अशा प्रकारांना भीक घातली नाही. परिणामी संबंधितांनी परीक्षकांसोबत हुज्जतही घातली. या घटनेची वाच्यता थेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या सांस्कृतिक कार्य कला संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या पदाधिकाऱ्यांसमोर झाली असून, गांभीर्य ओळखून तेथील अधिकारीणीने तत्काळ कला अकादमीच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आहे. घडलेल्या प्रकारांची शहानिशा करण्यासाठी यंदाच्या ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धेचे एक परीक्षक नंदू सावंत यांच्याशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्पर्धेच्या अंतिम रात्री नाटक संपल्यानंतर घडलेल्या घटनांची जंत्रीच सादर केली.
परीक्षकांच्या म्हणण्यानुसार - त्या रात्री स्पर्धेचे अखेरचे नाटक संपल्यानंतर ज्यावेळी परीक्षक निकाल तयार करण्यासाठी बसले, त्यावेळी कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर हे त्यांच्यासाठी मद्याची बाटली भेट म्हणून घेऊन आले. अर्थात, ही बाटली परीक्षकांनी नाकारली. तरीदेखील प्रदीप गावकर यांनी या स्पर्धेत कला अकादमीत नाट्यगृह व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या सुशांत नायक यांनी स्पर्धेत सादर केलेल्या ‘कार्मेलीन’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळावे हा परीक्षकांसमोर हट्ट धरायला सुरुवात केली.
परीक्षकांच्या मते, हे नाटक पहिले येण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्यांनी गावकर यांच्या हट्टाला भीक घातली नाही. मात्र, गावकर यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. औपचारिकरित्या निकाल जाहीर करण्याआधी तपासण्यासाठी आपल्याकडे द्यावा, असेही त्यांनी सुचवले. कला अकादमीत निकालाची प्रक्रिया अशीच होते, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, परीक्षकांनी त्यालाही नकार दिला.
पण तितक्यावर न थांबता गावकर यांनी चक्क सुशांत नायक यांच्याशी आपल्या फोनद्वारे संपर्क साधून, त्यांच्याशी परीक्षकांची बातचीत स्पीकरवर फोन टाकून घडवली. आपल्या नाटकाला पहिले पारितोषिक दिल्यास प्रत्येकी ५० हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्याची हमी सुशांत नायक यांनी परीक्षकांना दिली. पण, यापैकी कशालाही परीक्षक बधले नाहीत.
परंतु गावकर हे त्यांच्याशी हुज्जत घालणे थांबवत नसल्यामुळे शेवटी कंटाळून, ‘आपण सकाळी पुन्हा काम सुरू करू’, असे सांगून रात्री २.३० च्या सुमारास निकाल तयार करण्याची प्रक्रिया त्यांनी थांबवली व ते झोपायला गेले. हद्द म्हणजे, गावकर हे देखील त्या रात्री कला अकादमीतच झोपले. परीक्षकांपैकी एकाने पहाटे पाच वाजता उठून निकालाची अंतिम प्रत तयार केली व शेवटी सकाळी सर्व परीक्षकांच्या त्यावर सह्या झाल्या.
या स्पर्धेसाठी परीक्षक असलेली तीनही व्यक्तिमत्त्वे नाट्य क्षेत्रात अत्यंत अनुभवी आहेत. त्यांच्यापैकी विद्यासागर अध्यापक हे प्रसिद्ध नाट्य लेखक व दिग्दर्शक आहेत. त्यांच्या काही नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. सध्या ते प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या सिनेमासाठी पटकथा-संवाद लिहीत आहेत. दुसरे परीक्षक नंदू सावंत हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्य संस्था ‘अविष्कार’शी संबंधित असून नट-दिग्दर्शक म्हणून त्यांना नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये चार रौप्य पदके प्राप्त झाली आहेत. मानसी राणे तिसऱ्या परीक्षक प्रसिद्ध नाट्य समीक्षिका आहेत.
बॉल कला अकादमीच्या कोर्टात : जेव्हा या परीक्षकांनी आपला अंतिम निकाल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य कला संचालनालयात सादर केला, तेव्हा त्यांनी गोव्यामध्ये घडलेल्या वरील साऱ्या गोष्टी संचालनालयाचे अधिकारी विभीषण चावरे यांच्या कानावर घातल्या. या विपरीत गोष्टींमुळे चावरे यांना धक्का पोहोचला व त्यांनी कला अकादमीच्या अध्यक्षांशी संपर्क साधून कारवाई करण्याचे त्यांना सुचवले. या प्रकरणात आता बॉल कला अकादमीच्या कोर्टमध्ये आहे.
उपरोक्त विषयी दोन परीक्षकांशी आपले बोलणे झाले आहे. तिसऱ्या परीक्षकांसोबत बोलणे झाल्यानंतर लागलीच कारवाईला सुरुवात होईल.
- प्रवीण गावकर, कला अकादमीचे उपाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.