

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला धडा शिकवल्याचा पराक्रम आपल्याला माहित आहे. यानंतर महाराजांनी विश्रांती घेतली नाही. त्यांनी स्वतःचे सरदार अनेक प्रांतात पिटाळले. खुद्द महाराज स्वतः रणांगणावर उतरले आणि आदिलशाही मुलुखात धुमाकूळ घालू लागले.
वाईपासून कऱ्हाडपर्यंत महाराजांच्या मावळ्यांनी मोहीम चालवली. मायणी, वाळवे, अष्टे असे आसपासचे अनेक प्रदेश स्वराज्यात दाखल झाले. इकडे विजापुरात गोंधळ आणि रडारड सुरु होती. त्यात महाराज कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची बातमी आली. दरबारचे धाबेच दणाणले. महाराजांचे लक्ष एक प्राचीन किल्ल्याकडे होते तो म्हणजे पन्हाळगड.
मावळ्यांनी पन्हाळगडाला वेढा घातला. इकडे नेताजी पालकर आदिलशाही मुलुखातून भयानक पराक्रम गाजवून कोल्हापुरात दाखल झाले. चिवट मावळ्यांनी गडावर तिखट मारा सुरु केला आणि गड हस्तगत केला. महाराजांच्या यशाचा वेग इतका होता की अफजलखानचा कोथळा काढून झाल्यावर अवघ्या अठरा दिवसात महाराजांनी वाई ते कोल्हापूरपर्यंतचा परिसर आपल्या ताब्यात घेतला होता.
हा मुलुख आणि बाप गमावल्यामुळे अफजलखानाचा मुलगा फाजलखान आणि कोल्हापूरची जहागिरी सांभाळणारा रुस्तुमेजमान प्रचंड संतापले. त्यांनी दरबारची परवानगी घेऊन दहा हजार फौज, हत्ती-घोडे- तोफा सगळा लवाजमा एकत्र केला आणि महाराजांवर चालून निघाले. पन्हाळगडावर ही खबर पोचली. दहा हजार सैन्याशी लढत द्यायला महाराजानी पाच हजार मावळे निवडले.
रुस्तुमेजमान, फाजलखान कोल्हापूरची वेश पार करणार इतक्यात त्यांना बातमी आली की खुद्द महाराज पाच हजार मावळ्यांनिशी युद्धाच्या तयारीत आहेत आणि त्त्यांच्यासोबत नेताजी पालकरपण आहेत. मराठी सैन्याच्या वाद्यांचा दणदणाट सुरु झाला. मराठे आदिलशाही फौजेवर तुटून पडले.
नेताजी आणि इतर सरदारांनी मोठा पराक्रम गाजवला. स्वतः महाराज जातीनिशी सर्वत्र लक्ष देत होते. अखेर विजापुरी सैन्याचा बांध फुटला. सगळे वीर पळून जाऊ लागले. मराठ्यांनी त्यांना पळताभुई थोडीच केली. या युद्धात महाराजांच्या हाती बरीच लूट मिळाली. विजापुरी सैन्याची मात्र भलतीच वाताहात झाली. फाजलखानाने पुन्हा एकदा मोठा पराभव पाहिला.
(संदर्भ: केळुसकर बखर)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.