Goa Assembly Elections 2027: गोव्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कोळसा वाहतुकीच्या मुद्द्यावर गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मोठे आणि स्पष्ट विधान केले आहे. “जर मी मुख्यमंत्री झालो, तर गोव्यातील कोळसा वाहतूक पूर्णपणे थांबवेन,” असे ठामपणे सांगत त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2027) एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सरदेसाई यांनी पुढील सरकार हे कोळसाविरोधी असले पाहिजे आणि येणारी निवडणूक याच मुद्द्यावर लढली पाहिजे, असे आवाहनही गोमंतकीय जनतेला केले.
दरम्यान, पेडणे तालुक्यातील माजी सरपंच आणि पंच सदस्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते विजय सरदेसाई (Vijai Sardesai) विशेष उपस्थित होते. यादरम्यान, सरदेसाई यांनी हे वक्तव्य केले. सरदेसाई यांचे हे विधान अशा वेळी आले, जेव्हा राज्यातील अनेक भागातून मुरगाव पोर्ट ट्रस्ट (MPT) द्वारे होणाऱ्या कोळसा वाहतुकीला तीव्र विरोध होत आहे. कोळशाच्या धुरामुळे आणि धुळीमुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, पर्यावरणाची होणारी हानी आणि वाढणारे प्रदूषण हे या विरोधामागचे प्रमुख कारण आहे.
सरदेसाई यांनी म्हटले की, गोव्याला (Goa) प्रदूषित करण्याचे आणि येथील पर्यावरणाचा नाश करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. हे काम केवळ काही मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केले जात आहे, ज्यांना गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि लोकांच्या आरोग्याची पर्वा नाही. या सर्व गोष्टींना लगाम घालण्यासाठी आता ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, “गोव्याची जनता अनेक वर्षांपासून या प्रश्नावर आवाज उठवत आहे. आंदोलन करत आहे, पण सरकार याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता लोकांनाच निर्णय घ्यावा लागेल. पुढील सरकार निवडताना ते कोळसाविरोधी भूमिका घेणारे आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ आश्वासन देऊन चालणार नाही, तर कोळसा वाहतूक पूर्णपणे थांबवण्याची स्पष्ट भूमिका घेणाऱ्या सरकारची आपल्याला गरज आहे.”
राज्याच्या राजकारणात कोळसा वाहतुकीचा मुद्दा निवडणुकीचा केंद्रबिंदू बनवण्याचा विजय सरदेसाई यांचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, विकास हा पर्यावरणाचा बळी देऊन होऊ शकत नाही. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कोळसा वाहतूक हा एकमेव मार्ग नाही. पर्यटन, शेती आणि इतर उद्योगांवर लक्ष केंद्रित करुनही राज्याचा विकास साधता येतो.
सध्याच्या सरकारवर टीका करताना सरदेसाई यांनी सांगितले की, दुहेरी रेल्वे ट्रॅकिंग आणि महामार्गाच्या विस्तारीकरणाचे प्रकल्प कोळसा वाहतूक सुलभ करण्यासाठीच राबवले जात आहेत. यामुळे येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होत आहे आणि स्थानिक लोकांचे जीवनमान धोक्यात येत आहे. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सरदेसाई यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली की, गोवा फॉरवर्ड पार्टी गोमंतकीयांच्या हितासाठी आणि गोव्याच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर आमच्या जाहीरनाम्यात कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा मुद्दा समाविष्ट करु आणि त्या दिशेने काम करु.”
त्यांच्या या विधानामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता सत्ताधारी भाजप आणि इतर विरोधी पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोळसा वाहतुकीचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत किती प्रभावी ठरतो आणि मतदार यावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र, सरदेसाई यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडून गोमंतकीय जनतेच्या भावनांना वाचा फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, सरदेसाई यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, “भाजपला त्याची जागा दाखवायची असेल, तर एकीची गरज आहे. परंतु, काहीजण म्हणतात की ते सर्व 40 जागांवर निवडणूक लढवतील.” त्यांचे हे विधान कोणत्याही एका पक्षाचे नाव न घेता, सर्वच महत्त्वाकांक्षी विरोधी पक्षांवर टीका करणारे होते.
प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याची नैसर्गिक इच्छा असते आणि ते त्यांचे काम आहे, असे सरदेसाई म्हणाले. मात्र, गोव्याच्या राजकारणात असे मोठे बोल बोलणे योग्य नाही, कारण गोव्यातील जनता खूप सुज्ञ आहे. “गोव्यातील लोक राजकारण गणितासारखं समजून घेतात. गोमंतकीय मतदार सुसंस्कृत असून त्याला कशाची गरज आहे, हे त्याला चांगलेच माहीत आहे,” असेही ते शेवटी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.