Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Goa Politics: गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रत्‍येक तालुक्‍यात जाऊन ‘जनता दरबार’ घेण्‍यास सुरुवात केल्‍यापासून विरोधी पक्षांमध्‍ये चलबिचल सुरू झाली आहे.
Vijai Sardesai
Vijai Sardesai X
Published on
Updated on

पणजी: विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्‍या पार्श्‍वभूमीवर आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रत्‍येक तालुक्‍यात जाऊन ‘जनता दरबार’ घेण्‍यास सुरुवात केल्‍यापासून विरोधी पक्षांमध्‍ये चलबिचल सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ताळगावातील संविधान बचाव रॅलीत सरदेसाईंचे नाव न घेता केलेली टीका त्‍यातूनच असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू आहेत. या अधिवेशनात विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स हे पक्ष संघटितपणे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतील, अशी जनतेची आशा होती. परंतु, विजय सरदेसाई यांच्‍या जनता दरबारांमुळे काँग्रेस, ‘आप’मध्‍ये मात्र कमालीची अस्‍वस्‍थता निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

विजयचेही टीकाकारांना चोख प्रत्‍युत्तर

युरी आलेमाव यांनी माझे नाव घेतलेले नाही. त्‍यामुळे मी त्‍यांच्‍या आरोपांवर भाष्‍य करीत नाही. परंतु, त्‍या काळात राज्‍यात काँग्रेसचे सरकार होते. त्‍या सरकारात युरींचे वडील नगरविकास मंत्री होते. जमिनींसंदर्भातील नगरनियोजन खात्‍याशी नगरविकास खात्‍याचा संबंध येतो. त्‍यामुळे जबाबदार पदावर असलेल्‍या व्‍यक्तीने भान राखून बोलले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना स्‍वत:ची अपरिपक्वता दाखवून देऊ नये.

 राज्‍यभरातील जनतेचे प्रश्‍न मला विधानसभा अधिवेशनात मांडायचे आहेत. त्‍यासाठीच मी प्रत्‍येक तालुक्‍यात जाऊन लोकांना भेटत आहे. त्‍यांचे प्रश्‍न, समस्‍या जाणून घेत आहे. त्‍यामुळे कुणामध्‍ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल तर त्‍याला मी काहीच करू शकत नाही.

काय म्हणाले होते विरोधी पक्षनेते युरी?

१. ताळगाव, पणजी, सांताक्रूझ या मतदारसंघांत २००७ नंतरच्‍या काळात बेकायदेशीररित्‍या जमीन रूपांतर करण्‍याचे अनेक प्रकार घडले. तत्‍कालीन मंत्री एका सल्लागार, दलालाच्‍या साहाय्‍याने हे प्रकार करीत होता.

२. आजही काहीजण आमच्‍यासोबत असल्‍याचे सांगतात. परंतु, त्‍यांनी एकेकाळी गोव्‍यातील जमिनी परप्रांतीयांना विकून गोवा विक्रीस काढला होता.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: "गोव्याच्या शहाजहानने अनेक ताजमहाल बांधलेत" रवींद्र भवनाच्या गळतीनंतर सरदेसाईंचा बोचरा वार कोणावर?

सरदेसाईंच्‍या मनात चाललेय काय?

१. गेल्‍या दोन अधिवेशनांमध्‍ये मात्र सरदेसाईंनी विरोधकांना फारशी साथ न देता वैयक्तिकरित्‍या मंत्र्यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे सरदेसाई यांच्‍या भूमिकेबाबत विरोधी आमदारांसह जनतेकडून प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करण्‍यात येत होते.

२. काही दिवसांपूर्वी सरदेसाईंनी विरोधक एकत्र राहणे किती महत्त्‍वाचे आहे हे स्‍पष्‍ट करतानाच, विरोधकांना एका झेंड्याखाली आणण्‍यासाठी काहीही करण्‍यास तयार असल्‍याचे वक्तव्‍य केले होते. शिवाय गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबतची युती २०२७ च्‍या निवडणुकीपर्यंत कायम राहील, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

३. या भूमिकेमुळे सरदेसाई विरोधकांना एकत्र करून जनतेसमोर जातील अशी आशा इतर पक्षांच्‍या नेत्‍यांना होती. पण, त्‍यांनी वैयक्तिक पातळीवर जनतेशी संवाद साधण्‍यास सुरुवात केल्‍याने सरदेसाईंच्‍या मनात नेमके चाललेय काय? असा सवाल त्‍यांच्‍याकडून उपस्‍थित होत आहे.

विरोधकांनी संघटित होऊन २०२७ च्‍या निवडणुकीत भाजपचा पराभव करावा, हे जनतेचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले, म्‍हणूनच दक्षिण गोव्‍यात भाजपला पराभव पत्‍करावा लागला. सद्यस्‍थितीत आपल्‍यातच धुसफूस करणे मुर्खपणाचे ठरेल.

ॲड. अमित पालेकर, राज्‍य निमंत्रक, आप.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड यांनी याआधी गोव्‍याला लुटलेले आहे. आताही त्‍यांना जनतेचे देणे-घेणे नाही. मेळावे, जनता दरबारांचे आयोजन, ही धूळफेक आहे. जमिनी वाचवण्‍यासाठी आरजी लढा देत आहे. मात्र त्‍यासाठी युरी, विजय यांनी आम्‍हाला साथ दिली नाही. येत्‍या अधिवेशनातही जनतेच्‍या प्रश्‍नांवर आवाज उठवू.

वीरेश बोरकर, आमदार, रिव्हॉल्यूशनरी गोवन्स.

प्रत्‍येक पक्षाला विस्‍तार करण्‍याचा, मेळावे घेण्‍याचा अधिकार असतो. त्‍याच अधिकारातून विजय सरदेसाई हे मेळावे घेत असतील. अधिवेशन काळात विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला उघडे पाडावे, अशी जनतेची भावना असते. आगामी अधिवेशनात विरोधक त्‍याप्रमाणे भूमिका पार पाडतील.

माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com