डिचोली: येत्या १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदारसंघ आरक्षण जाहीर झाल्याने आता निवडणुकीची रंगत वाढणार आहे. डिचोली तालुक्यात उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असून, काही इच्छुकांनी आपले घोडे जोरात पुढे दामटायला सुरवात केली आहे.
दरम्यान, डिचोली तालुक्यातील चारपैकी दोन विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांची आरक्षणामुळे संधी हुकली आहे. एका जिल्हा पंचायत सदस्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राहिलेल्या अन्य एका झेडपीचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यावेळी डिचोलीतील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांतून नवीन चेहऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. डिचोली तालुक्यात मयेसह कारापूर-सर्वण, लाटंबार्से आणि पाळी हे जिल्हा पंचायत मतदारसंघ येतात.
गत जिल्हा पंचायत निवडणुकीत डिचोली तालुक्यात भाजप पुरस्कृत उमेदवारांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. तीन मतदारसंघातून भाजप उमेदवार निवडून आले होते. तर लाटंबार्सेमधून निवडून आलेल्या प्रदीप रेवोडकर हे नंतर भाजपच्या बाजूने राहिले.
लाटंबार्से मतदारसंघाचे विद्यमान ‘झेडपी’ प्रदीप रेवोडकर यावेळी जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेत तसे जाहीरही केले आहे. गत झेडपी निवडणुकीवेळी लाटंबार्से मतदारसंघ ‘ओबीसी’साठी राखीव ठेवण्यात आला होता.
यावेळी हा मतदारसंघ सर्वसाधारण ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघाचे विद्यमान झेडपी गोपाळ सुर्लकर यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय गोपाळ सुर्लकर यांनी यापूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
गत जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी पाळी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एसटी) राखीव ठेवण्यात आला होता. यावेळी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव ठेवण्यात आला आहे.
मये : महिलांसाठी राखीव
गत जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी मये जिल्हा पंचायत मतदारसंघ ‘ओबीसी’साठी राखीव ठेवण्यात आला होता. त्या निवडणुकीत शंकर चोडणकर यांनी बाजी मारली होती. यावेळी हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद भूषविलेले विद्यमान ‘झेडपी’ शंकर चोडणकर यांना या आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. यावेळी झेडपी निवडणूक लढविण्याची त्यांची संधी हुकली आहे.
कारापूर-सर्वण : बदल शक्य
कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघात मयेतील ३ आणि साखळी मतदारसंघातील एक पंचायतीचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान झेडपी महेश सावंत यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मात्र, यावेळी भाजप त्यांना संधी देण्याची शक्यता कमीच आहे. यावेळी या मतदारसंघातून उमेदवार म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
नगरगाव-सत्तरीत उमेदवारीबाबत रस्सीखेच!
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बिगूल वाजले असून सत्तरी तालुक्यात नगरगाव मतदारसंघ हा सामान्य वर्गात समाविष्ट केला आहे. त्यामुळे नगरगाव मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
त्यामुळे आता रस्सीखेच होणार आहे. भाजप, काँग्रेस समर्थकांबरोबरच अपक्षही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जवळजवळ साडेसोळा हजार मतदारांची संख्या असलेला नगरगाव जिल्हा पंचायत मतदारसंघ हा नगरगाव, सावर्डे, भिरोंडा, खोतोडा, गुळेली या पंचायत प्रभागामधून बनलेला आहे.
राजश्री काळे या विद्यमान नगरगाव मतदारसंघांमधून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. मागच्या वेळेला महिलांसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामधून त्यांनी बाजी मारलेली होती. आता पुन्हा त्यांना पक्ष तिकीट देतो का? हे पाहणे मोठे रंजक ठरेल.
दुसरे इच्छुक म्हणजे प्रेमनाथ हजारे हे गुळेली पंचायत क्षेत्रामध्ये वास्तव्य करतात. ते एकवेळ २०१५ मध्ये जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सहकार्याने बरीच विकासकामे केलेली आहेत. त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे सहकार्य लाभल्यास ते विजयश्री निश्चितच मोठ्या फरकाने खेचू शकतात.
करंझोळ, कुमठोळ या ग्रामीण भागातून असलेले व राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले नारायण गावकर यांचा पूर्वीपासून राणे कुटुंबीयांशी निकटचा संबंध आहे. जर कुणा नवीन चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास नारायण गावकर यांना उमेदवारी मिळू शकते.
तूर्त तरी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्याकडचा पत्ता उघड केलेला नाही. त्यांनी आपल्या मनातील उमेदवार निश्चित केल्यावर सर्वजण त्यांना पाठिंबा देतील यात दुमत नाही. तिसरे इच्छुक उमेदवार म्हणजे धुळू शेळके.
सतरी धनगर समाजाचे ते नेते आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासूनच घरोघरी जाऊन आपण अपक्ष लढणार असल्याचे लोकांना सांगितले आहे. तेही जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक आहेत. आता पाहावे लागेल त्यांना कुठला पक्ष उमेदवारी देतो ते?
कुठल्याही पक्षाने अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्यांना कुठला पक्ष पाठिंबा देतो, की ते स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरतात, हे पाहणे मोठे रंजक ठरेल.
डिसेंबर महिन्यात होणारी जिल्हा पंचायत निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा लाटंबार्से मतदारसंघाचे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि भाजप समर्थक सरपंच, पंचसदस्यांच्या उपस्थितीत केली. तर जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी लाटंबार्सेमधून भाजप पक्ष देईल, तो उमेदवार मान्य असणार, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले.
शनिवारी (ता.८) मुळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदारांसह भाजप मंडळाचे अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विश्वास गावकर, संजय शेट्ये, मानसी कवठणकर, विश्वंभर नाईक यांच्यासह लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघातील पाचही पंचायतींचे आजी-माजी सरपंच, पंचसदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थलांतरितांना पाठिंबा दर्शविणारे उमेदवार आगामी झेडपी व २०२७ ची विधानसभा निवडणूक जिंकू शकतील. अन्यथा विजय अशक्य आहे. तसेच कन्नड समाज व लोकआग्रहामुळे आगामी जिल्हा पंचायत निवडणूक लढण्यास आपण इच्छुक आहे, असे प्रतिपादन म्हापसा कन्नड संघाचे अध्यक्ष शंभू शेट्टर यांनी केले. शनिवारी एका सोशल मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
शंभू शेट्टर म्हणाले की, ‘आरजीपी’चे मनोज परब हे केवळ स्थलांतरितांना लक्ष्य करतात. बाहेरच्यांना ‘घाटी’ म्हणून संबोधणे चुकीचे आहे. गोमंतकीयदेखील इतर राज्यांत कामासाठी जातात. अलीकडेच, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे कन्नड बांधवांच्या कार्यक्रमाला गेले म्हणून मनोज परब यांनी दामू नाईक यांच्यावर टीका केली. परब यांनी मोठा वाद केला. मुळात दामू नाईक हे सर्व धर्म तसेच संस्कृतीच्या लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. त्यात गैर काहीच नाही. ते एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा ‘सबका साथ, सबका विकास’ हाच नारा देतात.
गोव्यात अनेक कामे स्थलांतरितांमुळे होतात. ते नसल्यास फूटपाथ व इतरत्र कामे कोण करणार? नगरपालिका असो किंवा रस्त्यांवरील लहान-मोठी कामे याच बिगर गोमंतकीयांमुळे शक्य आहेत. परंतु, मनोज परब हे बिगर गोमंतकीयांना हिणवतात.
हे वागणे उचित नव्हे. आम्ही समाजकार्यात सक्रिय आहोत. झेडपी निवडणूक लढविण्यासाठी मला आमच्या समाजाकडून आग्रह धरला जातोय. मला आशा नाही; पण लोक आग्रहास्तव माझी निवडणूक लढण्याची तयारी आहे. राज्यात अनेक राजकीय पक्ष सक्रिय आहेत; परंतु कधीच कोणीही मला हिणवले नाही. मात्र, ‘आरजीपी’ आम्हाला कमी लेखते. त्यामुळे आमचा हा इशारा ‘आरजीपी’ला आहे, असे शंभू शेट्टर म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्ष सध्या काँग्रेससोबत युतीत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे येत्या १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झालेली नाही.
परंतु, या निवडणुकीत आमच्यात युती होईल, असा विश्वास आपल्याला आहे, असे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपला पराभूत करायचे असेल तर काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणुकीतील युतीबाबत निवडणूक जाहीर होण्याआधी चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत तुम्हीच नोंदवलेले होते. अशा स्थितीत जिल्हा पंचायत निवडणूक अवघ्या ३५ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये युतीबाबत चर्चा झालेली नाही.
त्यामुळे गोवा फॉरवर्ड या निवडणुकीत ‘वेगळी चूल’ थाटण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, गोवा फॉरवर्ड पक्षाची अजूनही काँग्रेससोबत युती आहे. परंतु, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सध्या बिहार निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतील युतीबाबत चर्चा सुरू केली नसावी. परंतु, काँग्रेस युतीबाबत विरोधी पक्षांशी निश्चित युतीबाबत चर्चा करेल. आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाजपला पराभूत करू, असा विश्वासही सरदेसाई यांनी व्यक्त केला.
पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका १३ डिसेंबर होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने आणि सरकारच्या माध्यमातून पेडणे तालुक्यातील मोरजी मतदारसंघात ओबीसी महिला, धारगळ हा सर्वसाधारण मतदारसंघ, तोरसेत ओबीसी व हरमल मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी असे आरक्षण केल्यामुळे अनेकांचा पत्ता कट झाला आहे.
त्यात मोरजीचे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांना यंदा निवडणूक लढवण्यास मिळणार नाही.
या दोन्ही जिल्हा पंचायत सदस्यांनी आपापल्या मतदारसंघांत जिल्हा निधीतून वेगवेगळे प्रकल्प, विकासात्मक कामे केली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी मतदार इच्छुक होते. परंतु आरक्षणामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.
शिवाय तोरसे मतदारसंघ सर्वसाधारण ओबीसीसाठी आरक्षित केल्याने त्या ठिकाणी इच्छुक असलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि चांदेल-हसापूरचे माजी सरपंच तुळशीदास गावस, मोपाचे सरपंच सुबोध महाले, वारखंडचे उपसरपंच वसंत नाईक, वझरीच्या माजी सरपंच संगीता गावकर, भारती सावळ, मंदार परब यांचे पत्ते थेट कट झाले आहेत.
धारगळ मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव होता, तो आता सर्वसाधारण केल्यामुळे अनेकांना या मतदारसंघात नवनवीन चेहऱ्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यात गोवा फॉरवर्डतर्फे माजी सरपंच अनिकेत साळगावकर, उद्योजक प्रमोद साळगावकर, धारगळचे माजी सरपंच प्रदीप ऊर्फ भूषण नाईक, पार्सेचे माजी सरपंच रामा नाईक हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित ठेवल्यामुळे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांचा पत्ता कट झाला आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून पूर्वीपासून जे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते ते मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत, हरमलचे कलाकार दत्ताराम ठाकूर, प्रवीण वायंगणकर, नारायण रेडकर, प्रमेश मयेकर, देवानंद गावडे, महादेव गवंडी यांचाही हिरमोड झाला आहे. महिलासाठी आरक्षण ठेवल्यामुळे आमदार जीत आरोलकर यांच्या पत्नी ॲड. सिद्धी आरोलकर, सुरेखा सावंत, कोरगावच्या माजी सरपंच स्वाती गवंडी, माजी सरपंच नीता नरसे या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
मोरजी मतदारसंघातून जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर हे पुढील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी आरक्षित केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदारसंघातून सतीश शेटगावकर, मोरजीच्या माजी सरपंच वैशाली शेटगावकर, माजी उपसरपंच अमित शेटगावकर, उद्योजक उमेश लिंगुडकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु त्यांचे पत्ते कट झाले. आता या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मांद्रेच्या माजी उपसरपंच तारा हडफडकर इच्छुक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.