

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यात कुठले मतदारसंघ राखीव असणार आणि कुठले खुले असणार याबद्दलची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती ती संपली. आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या समर्थकांना जबरदस्त धक्का बसल्याचे दिसून आले. तर जवळच्या मतदारसंघातील आमदार नीलेश काब्राल यांच्या समर्थकाला दिलासा मिळाला.
रिवण मतदारसंघ एसटी महिलासाठी राखीव झाल्याने मंत्री सुभाष फळदेसाई यांचे समर्थक उमेदवार असलेल्या विद्यमान उमेदवाराचीही विकेट गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
बार्से आणि खोल या दोन्ही मतदारसंघात सध्या कवळेकर यांचे अगदी जवळचे मानले गेलेले कुशाली वेळीप व शाणू वेळीप हे दोघे प्रतिनिधीत्व करत होते. मात्र, आताच्या आरक्षणाप्रमाणे बार्से मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलांसाठी तर खोल मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवल्याने या दोघांनाही यावेळी निवडणूक लढविता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे, बार्सेतून केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे जवळचे समर्थक असलेले मालू वेळीप यांनी निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली होती. मात्र, हा मतदारसंघ महिलासाठी राखीव असल्याने त्यांचीही संधी गेली आहे.
सासष्टी तालुक्यात समाविष्ट असलेल्या गिरदोलीतूनही कवळेकर यांच्या समर्थक रानीया कार्दोज यांनी दावेदारी सादर केली हाेती. पण हा मतदारसंघ एसटीसाठी राखीव असल्याने त्यांचीही संधी हुकली आहे. दुसऱ्याबाजूने भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर यांच्यासाठी हा मतदारसंघ खुला झाला आहे.
कुडचडे मतदारसंघातील शेल्डे याहीवेळी सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी खुला ठेवल्याने दक्षिण गोवा जि.पं.चे उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. गावस देसाई काब्राल समर्थक मानले जातात. दुसऱ्या बाजूने रिवण ‘एसटी’ महिलांसाठी राखीव झाल्याने मंत्री फळदेसाईंचे समर्थक केपेकर यांना निवडणुकीचे दरवाजे बंद झाले आहेत.
सावर्डे मतदारसंघातील सावर्डे जि.पं. मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाल्याने भाजपच्या विद्यमान सदस्य सुवर्णा तेंडुलकर यांना निवडणुकीची दारे बंद झाली. या मतदारसंघातून आमदार गणेश गावकर यांचे समर्थक मोहन गावकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी ॲड. आधिष गावकर हे उभे राहणार असून आमदारविरोधी गटाकडून त्यांना भक्कम पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
फोंडा तालुक्यात समाविष्ट असलेल्या सात मतदारसंघांपैकी उसगाव-गांजे, वेलींग-प्रियोळ, बोरी व शिरोडा हे चार मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. कुर्टी मतदारसंघ एसटीसाठी, कवळे मतदारसंघ इतर मागासवर्गियांसाठी तर बेतकी-खांडोळा हा मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारासाठी खुला ठेवण्यात आला आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी मतदारसंघ महिलासाठी राखीव असून यावेळी सांकवाळ मतदारसंघ खुला झाला आहे. काणकोण तालुक्यातील पैंगीण हा मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारासाठी खुला ठेवण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.