मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्लू कॅब टॅक्सीसेवा आहे. सरकारने ‘गोंयचो पात्राव’ योजनेंतर्गत स्वयंरोजगार साधण्यासाठी टॅक्सी घेण्यासाठी अनेकांना मदत केली. या सेवेचा विमानतळावरील कक्ष ‘जीएमआर’ कंपनीने सुरक्षा पडताळणीचे कारण पुढे करून बंद केला आहे. सरकारने यात लक्ष घालून ही सुरक्षा पडताळणी करून घेणे आवश्यक होते. मात्र कोणाचेच लक्ष याकडे नसल्याने स्वयंरोजगार कमावणाऱ्या युवकांना रोजगार बुडत आहे. आता त्यांनी दोन दिवसांचा इशारा दिल्यानंतर तात्पुरता तोडगा काढण्यात येईल. याआधीही असेच झाले होते. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढून हा प्रश्न कोणी सोडवेल का, याची त्यांना प्रतीक्षा आहे. ∙∙∙
राज्यात विविध ठिकाणी भर पावसात हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश रस्ते वाहून गेले होते, त्यामुळे कंत्राटदारांवर मुख्यमंत्र्यांनी छडी उगारली होती. आताही नेमकी तीच गत होणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण हॉटमिक्स डांबरीकरणावेळी कडक ऊन असणे आवश्यक असते. पण हे काम सुरू असताना अचानक धो धो पाऊस पडला, आता काय करायचे, असा सवाल कंत्राटदार करताहेत. त्यामुळे नेमका दोष कुणाला द्यायचा. कामाला विलंब केला त्या सरकारच्या धोरणाला की, कंत्राटदाराच्या बेपर्वाईला? ∙∙∙
प्रियोळ मतदारसंघात सध्या सन्नाटा आहे. या भागाचे आमदार गोविंद गावडे यांच्यावर कारवाई होणार की नाही, या संभ्रमात गोविंदाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यामुळे गोविंदांवर कारवाई झाली तर मतदारसंघाचे काय, ही भीती त्यांना सतावत आहे. मंत्रिपद असल्यामुळे गोविंदरावांना निवडून येणे सहज शक्य झाले होते, मात्र ऐनवेळी मंत्रिपदाने दगा दिला तर पुढील निवडणुकीत जिंकून येणे तेवढे सोपे नाही, याचे भान गोविंदरावांच्या कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळेच हे चिंतेचे कारण असावे. ∙∙∙
म्हापसा शहारातील विकास कामाच्या गतीवर तसेच बेशिस्तपणावर मुख्यमंत्र्यांनी म्हणे आपली नाराजी बोलून दाखविली. पालिका कार्यालयातील या बैठकीत काही प्रशासकीय अधिकारी व पालिका अधिकार्यांची देखील मुख्यमंत्र्यांनी ‘क्लास’ घेतली. एका पालिका अधिकार्याला तर मुख्यमंत्र्यांनी चांगलीच तंबी दिली. आपण तुला चांगला अधिकारी मानत होतो, परंतु तुझ्या प्रगती पुस्तकावर खूप तक्रारी आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून कामे कर, अशा शब्दांत म्हणे मुख्यमंत्र्यांनी सदर पालिका अधिकाऱ्यांना सुनावले. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या तंबीनंतर हा अधिकारी शिस्तबद्ध काम करतो की, पुन्हा ‘पालथ्या घड्यावर पाणी’ हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. ∙∙∙
कुडचडे आणि आसपासच्या परिसरातील क्रिकेट रसिकांना आयपीएल स्पर्धेचा माहोल अनुभवता यावा यासाठी ‘बीसीसीआय’चे संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांनी पुढाकार घेऊन कुडचडेच्या ‘जी-सूडा’ मैदानावर दोन दिवस ‘आयपीएल फॅन पार्क’ घडवून आणला. रविवारी पहिल्या सामन्यात पाऊस पडल्याने प्रेक्षकांची उपस्थिती तशी कमीच होती. परंतु मंगळवारी आरसीबी आणि पंजाब किंग्स इलेव्हन यांच्यातील अंतिम सामना पहाण्यासाठी मात्र लोकांनी तुफान गर्दी केली. या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी पाहून लोकांचा महापूर तर उसळला नाही ना? असे वाटत होते. रात्री उशिरा काही वेळ पाऊस पडत असतानाही लोक त्या ग्राऊंडवरून हलले नाहीत. या ‘फॅन पार्क’ला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला तो पाहून रोहनचे राजकीय विरोधक नक्कीच हादरून गेले असतील, हे मात्र खरे. ∙∙∙
शाळेचा पहिला दिवस. नव्या वह्या, नवी पुस्तके, नवे दप्तर अशी नव्याची नवलाई विद्यार्थ्यांसाठी असते. अलिकडे शाळांतील पहिल्या दिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. वर्तमानपत्रेही छायाचित्रे छापतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ओवाळण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही मोजक्याच शाळा असे समारंभ करायच्या आणि त्याचे सार्वत्रिकरण झाले आहे. आज सकाळी विद्यार्थी अशी प्रथा नसलेल्या शाळांत आले. तेव्हा त्यांना शिक्षिका आरती घेऊन सज्ज दिसल्या. आपल्याला का ओवाळले जात आहे, हे विद्यार्थ्यांना न समजल्याने प्रश्नचिन्हांकीत चेहऱ्याने ते वर्गात दाखल झाले. छायाचित्रे कशी आली, हे पाहण्यास शिक्षिका मग्न असताना विद्यार्थी मात्र ओवाळणी का, या प्रश्नाचे उत्तर शोधत होते. ∙∙∙
दक्षिणेकडील एका सत्ताधारी पक्षाच्या राजकारण्याला सध्या चैन पडत नाही. आपल्याला कधी एकदा मंत्रिपद मिळते असे त्याला झाले आहे. त्यामुळे शक्य असेल त्याच्याकडून मंत्रिमंडळ बदल केव्हा, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न तो गेला आठवडाभर करत आहे. आपल्याला मंत्रिपद दिल्यास एकंदर समाजाचा काय फायदा होऊ शकतो. आपण आता संकुचित विचार कसा त्यागला आहे. सर्व सकल समाजाचा विचार घेऊन आपण कसा पुढे जात आहे, हे सांगण्यास तो विसरत नाही. आपल्याला मंत्रिपद नको, असे जाहीर सांगून खासगीत मंत्रिपदाविषयी विचारणा करणारा हा राजकारणी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.