
मिलिंद म्हाडगुत
सर्व विरोधी पक्षांची मोट एकत्र बांधून २०२७च्या निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देण्याची गरज आहे. हे कार्य विजय सरदेसाई करू शकतात; पण तितकीच इतरांची साथ त्यांना मिळणे गरजेचे आहे. परवा ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत गोवा फॉरवड चे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्ष कमी पडत असल्याची कबुलीच देऊन टाकली. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत विरोधी पक्ष बाजी मारू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात विरोधी पक्ष कमी पडत आहे, हे कोणीच नाकारू शकणार नाही. पण तो का कमी पडत आहे, हे मात्र बघायला हवे. खरे तर आज विरोधी पक्षांना चांगला वाव आहे. अनेक समस्या आज त्यांना आव्हान द्यायला तयार आहेत. पण या विरुद्ध आवाज उठवणारा मात्र कोणी दिसत नाही. २०२७ची निवडणूक अजून दीड वर्षे दूर असली तरी सत्ताधारी असूनसुद्धा भाजप तयारीला लागला आहे हे नजरेआड करता कामा नये.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष - प्रामुख्याने काँग्रेस - मात्र सुस्त पडला आहे. मडगाव, कुंभारजुव्यासारख्या मतदारसंघात काँग्रेसने पुनर्बांधणी सुरू केली असली तरी तवा गरम असताना पोळी भाजून घेण्याची संधी मात्र ते गमावताना दिसत आहेत. इतर विरोधी पक्षांतही तशीच परिस्थिती दिसत आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षात असलेला एकीचा अभाव. मागच्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळेच काँग्रेसला दक्षिण गोव्याची जागा मिळू शकली. पण ते ऐक्य आता दिसत नाही. विजय सरदेसाई खिंड लढविताहेत खरी पण ती लढत एकाकी वाटत आहे. या लढतीला सर्व विरोधी पक्षांच्या एकतेची किनार लाभली असती तर ती लढत जास्त परिणामकारक ठरू शकली असती.
पण विरोधी पक्षांत ती मानसिकता राहिली आहे, असे दिसतच नाही. तसे पाहायला गेल्यास आजही काँग्रेस पक्षाचे अनेक मतदार आहेत. सासष्टी तालुक्यातील मतदारसंघाचे सोडा; फोंडा, कुडचडे, मुरगाव, सांताक्रुज, साळगाव, कुंभारजुवे, सांतआंद्रे यांसारख्या मतदारसंघात आजही काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. आम आदमी पक्षाची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी खचितच नाही. गोवा फॉरवर्ड, तृणमूलसारखे पक्षही या मोहिमेत खारीचा का असेना, पण वाटा नक्कीच उचलू शकतात.
दुसरा एक मुद्दा या मुलाखतीत उचलला गेला, तो म्हणजे लोप पावत चाललेल्या त्यांच्या विश्वासार्हतेचा. विरोधी पक्ष खास करून काँग्रेस म्हणजे भाजपला आमदार पुरवण्याचा कारखाना बनला आहे असा संदेश जो मतदारापर्यंत पोहोचला आहे, त्याचे खंडन कसे करायचे हा विरोधी पक्षांपुढे यावेळी मोठा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाने तर भाजपला वेळोवेळी कुमक पुरवून हे काम इमानेइतबारे केले आहेच. खरे तर सध्या राज्यात भाजपला अनुकूल असे वातावरण दिसत नाही. गेल्या निवडणुकीवेळीही अशीच स्थिती होती.
पण त्यावेळी अति आत्मविश्वासापोटी काँग्रेसने इतर विरोधी पक्षांशी युती न केल्यामुळे ही संधी हातची गेली. आताही तसेच होण्याची शक्यता दिसत आहे. भाजपला हे चांगले ठाऊक आहे. विरोधी पक्षांना कसे खेळवायचे, त्यांना दाणे कसे टाकायचे याचे त्यांना चांगले ज्ञान आहे. म्हणूनच विरोधी पक्षांची आघाडी झाली तरी ती निवडणुकीनंतर टिकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. काहींनी तर त्याची आतापासूनच तयारी केल्याचे दिसत आहे.
परवा फोंड्यातील एक इच्छुक उमेदवार हेच सांगत होता. काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर घ्यायची व निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जायचे, असे त्यांचे धोरण असल्याचे त्याच्या बोलण्यावरून दिसून येत होते. जर उमेदवाराची आतापासूनच अशी मानसिकता दिसून आली तर मग मतदारांनी विश्वास तरी कोणावर आणि कसा ठेवायचा? तरीही आमदार सरदेसाई २०२७बाबत ज्याप्रकारे आशावादी आहेत त्याचे स्वागत करायलाच हवे. ते म्हणतात त्याप्रमाणे स्थिती कधीही बदलू शकते. पण इथे प्रश्न स्थितीचा नाही, प्रश्न आहे तो मानसिकतेचा!
याबाबतीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे उदाहरण घ्यावे लागेल. २००५साली काही आमदारांनी विश्वासघात केल्यामुळे भाजप सत्तेपासून दूर गेला होता. त्यामुळे भाजप २००५ ते २०१२पर्यंत विरोधात राहिला. पण तरीही पर्रीकरांनी आपल्या पक्षाचा समतोल ढळू दिला नाही. त्याचे फळ त्यांना २०१२साली लोकांनी बहुमत देऊन दिले. आता हेच काम आमदार सरदेसाईंना करावे लागणार आहे.
सध्या विरोधी पक्षात विजय सरदेसाईंसारखा दुसरा अनुभवी व अभ्यासू नेता नाही. तेव्हा त्यांनाच काहीशा ढेपाळल्यासारख्या वाटणाऱ्या विरोधी पक्षाची मोट बांधून त्यांच्या मानसिकतेला ऊर्जा द्यावी लागणार आहे. असे झाले तरच विरोधी पक्ष सरकारशी भिडू शकतील आणि त्याचे फळ २०२७सालच्या निवडणुकीत त्यांना मिळू शकेल. पण त्याकरता आमदार सरदेसाईंनी ‘रोड मॉडेल’ची भूमिका बजवायला हवी. अन्यथा २०२२ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.