Goa Politics: खरी कुजबुज; आता पुन्हा पावले चुलीकडे

Goa Latest Political News: पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि आम आदमी पक्षाचे जॅक सुखिजा यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला.
Goa Latest Political News
Goa Latest Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आता पुन्हा पावले चुलीकडे !

सध्या कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल चालकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. कित्येकांनी यावर उपाय म्हणून केरोसिनवर चालणारे स्टो आणले. पण ज्यांना तेही परवडत नाही आता चक्क चुलीवर पदार्थ रांधायचा पर्याय पत्करला आहे. फातोर्डा येथील एका हॉटेलमध्ये चक्क चुलीवर बटाटे उकडायला ठेवल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला. आखाती युद्धामुळे सर्व जगाला पुन्हा चुलीकडे वळविले असे म्हणायचे का? ∙∙∙

‘आप’च्या विजयात काँग्रेस!

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि आम आदमी पक्षाचे जॅक सुखिजा यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला. त्यांच्या या विजयानंतर ‘आप''च्या गोवा प्रभारी अतिषी मार्लेना यांनी त्यांचे अभिनंदन करताना आम आदमी पक्षाने पणजी महानगरपालिकेत खाते उघडले, असा आवर्जून उल्लेख केला. आता अतिषींचा हा पोस्ट पाहून कॉंग्रेस भवनात काही दिवस चर्चा चालू राहणार हे नक्की. जॅक सुखिजांच्या प्रचाराला काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी पणजीतील त्यांचा प्रभाग पिंजून काढला. त्यामुळे सुखिजा यांच्या विजयाची खात्री अधिकच वाढली होती. या नेत्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच कदाचित मतमोजणीवेळी सुरुवातीला तीन मतांनी जाहीर झालेला पराभव फेरमतमोजणीत दोन मतांनी मिळविलेल्या निसटत्या विजयात रूपांतरित झाला, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

...कसलेला खिलाडी!

पणजीत काय होणार याकडे अख्ख्या राजकीय वर्तुळाचे डोळे लागले होते. आपण राजकारणातील किती कसलेला खिलाडी आहे, हे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दाखवून दिले आहे. विरोधकांच्या प्रचाराला उत्तर न देता, ते मतदारांशी संवाद साधत राहिले. ३० पैकी २७ नगरसेवक निवडून आणत त्यांनी मतदारांशी किती प्रभावी संपर्क आहे, यावर शिक्कामोर्तब करवून घेतले आहे. माध्यमांतील चर्चा काहीही असो, विचारवंत काय म्हणतात, त्याकडेही दुर्लक्ष करत त्यांनी खेचून आणलेले यश राजकारणाची दिशा बदलणारे असे ठरणार आहे. पणजीत बाबूश यांना पर्याय नाही, असे चित्र आजच्या घडीला निर्माण करण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येते. ∙∙∙

विश्वजीत यांचे प्रसंगावधान

सध्या नगरनियोजन खात्याविरोधात जनआक्रोश असल्याचे चित्र तयार करण्यात आले आहे. त्या खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवेळी मंत्री विश्वजीत राणे यांना विरोधक पुरते घेरणार असे त्याचमुळे अनेकांना वाटत होते. मात्र संयम आणि हजरजबाबीपणा याच्या जोरावर विरोधकांचे आव्हान विधानसभेत राणे यांनी पेलले. विधानसभेच्या पहिल्या रांगेतील ज्येष्ठ मंत्री अर्थसंकल्पीय चर्चेवेळी उपस्थित नसतानाही सर्वांच्या शंकांचे निरसन करत राणे यांनी केले. आपण कायदा व नियम याच्याबाहेर काहीही केले नाही हे सर्वांच्या मनावर ठासवण्यात ते यशस्वी झाले. खुबीने कोणता विषय चर्चेला आणायचा नाही हे अनुभवी राणे यांना ठाऊक असल्याने त्यांच्या मागण्या सभापतींनी मतदानास टाकेपर्यंत राणे यांनी आपले बोलणे संपवले आहे, हे कोणाला समजलेच नव्हते. ∙∙∙

अभ्यासू लोकप्रतिनिधी!

पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे या पहिल्यांदाच आमदार झाल्यासारख्या वाटत नाहीत. त्यांनी विधानसभेचे कामकाज तर आत्मसात केले आहेच पण आपला मुद्दा ठाशीव पद्धतीने कसा मांडावा याची हातोटीही त्यांनी शिकून घेतली आहे. मतदारसंघाची कामे विधानसभेत मंत्र्यांना सांगण्यासही त्या विसरत नाहीत. विधानसभेत काही वेळ बसून नंतर निघून जाणाऱ्या आमदारांपैकी त्या नाहीत. त्या पूर्णवेळ कामकाजात सहभागी होतात. आपला मुद्दा कोणी नजरेआड करत असेल तर उठून आठवण करून देतात. सत्तरीतील लोकांविषयी असलेला कळवळा त्यांच्या बोलण्यातून दडून राहत नाही. त्यांच्यात भावी मंत्री दडल्याचे दिसते. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; फोंडा पोटनिवडणूक अजूनही ‘वेटिंग’वर

सायबाची ऑर्डर...

दक्षिण गोव्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने म्हणे एक फतवाच काढला आहे. काहीही करा, मात्र आपल्याला पैसे आणून द्या, अशी ही ऑर्डर आहे. या सायबाला पूर्वीपासूनच ही वाईट सवय जडली आहे. अनेकदा ते या आपल्या गुणाने संकटातही सापडले होते. त्यांचे प्रमोशनही अडकले होते. आता वरच्या हुद्द्यावर पोहोचले आहेत, खरे! मात्र त्यांच्या स्वाभावात काडीचाही फरक पडलेला नाही. बिचारे खालचे अधिकारी या बड्या सायबाची मर्जी ठेवण्यासाठी महिन्याच्या शेवटी व्हिटामीन ‘सी’ आणून त्यांच्या हाती टेकवतात. खाजगीत हे पोलिस कुजबुजतात आमच्या सायबाची हाव काही जात नाही हो! ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांची धावाधाव

बाबूशचा ‘ट्रेंडसेटर’ फॉर्म्युला!

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे ‘घवघवीत यश’ मिळवून दाखवले, त्यानंतर राजकीय वर्तुळात एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. म्हणे, बाबूशने फक्त विजय मिळवला नाही, तर एक नवा ‘ट्रेंड’च सेट केला! आता भाजपमधील इतर आमदारांपुढे जरा वेगळेच गणित उभे राहिले आहे. कारण बाबूशने दाखवले की, मैदानात उतरले की निकालही तसाच दमदार आणायचा! त्यामुळे आता पक्षात काही जण हळूच विचारत आहेत, ‘आपल्यालाही असा ट्रेंड गाठता येईल का?’ भाजपची २०२७ साठी ‘२७ प्लस’ ही घोषणा आधीपासूनच आहे. पण आता बाबूशच्या विजयामुळे त्या घोषणेला एक वेगळाच मापदंड मिळाल्याची चर्चा आहे. म्हणजेच, प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात असा काहीतरी ‘ट्रेंडसेटर’ पराक्रम करून दाखवला, तरच २७ प्लसचा आकडा सहज गाठता येईल, असे काहींचे मत. आता खरी गंमत पुढेच आहे. कारण बाबूशने तर ट्रेंड सेट करून ठेवला, पण तो ट्रेंड इतर किती आमदार पकडतात, हे पाहणेच आता राजकीय रसिकांसाठी एक वेगळेच मनोरंजन ठरणार आहे! राजकारणात म्हणतात ना काहीजण फक्त निवडणूक लढतात आणि काहीजण ट्रेंड सेट करतात! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com