सासष्टी: एसआयआर प्रक्रियेत देशभरात १४ कोटी मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. एका फातोर्डा मतदारसंघात साडेचार हजार मते रद्द झाली आहेत. काही जणांची घरे आहेत, जमिनी आहेत, शेती आहे; तरी त्यांची नावे स्थानांतरित असे कारण देऊन मतदारयादीतून गाळण्यात आली आहेत. हे प्रकार हळूहळू उघड होऊ लागले आहेत.
दरम्यान, मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान असल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. विरोधी पक्षयुतीतील पक्षांनी एकमेकांना दोष न देता रद्द झालेल्या मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करणे हितावह ठरेल, असे सरदेसाई यांनी सांगितले. जर पक्षाला मते देणाऱ्यांची नावेच रद्द झाली, तर निवडणुकीत विजयी कसे व्हाल, असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला.
आपण फातोर्डातील रद्द झालेली सर्व साडेचार हजार मते पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करून घेणार आहोत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे बीएलए बीएसओशी संपर्क साधून त्यांच्याकडून यादी मागून घेणार आहेत. शिबिरे घेऊन या सर्वांना एकत्र आणले जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले. दवंडे येथील क्रास्तो कुटुंबातील सहा नावे केवळ स्थानांतरित म्हणून मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत.
आज या कुटुंबातील तेरेझीना क्रास्तो व इतरांनी सरदेसाई यांची भेट घेतली व ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण नवीन वाहनाची नोंद करण्यासाठी गेले असताना आपल्या लक्षात आमची नावे नसल्याचे आले, असे तेरेझीन क्रास्तो यांनी पत्रकारांना सांगितले. केवळ आम्ही दोघांनी नवीन फ्लॅट घेतला आहे व आम्ही तिथे राहायला गेलो आहोत. पण बाकीचे चार जण दवंडे येथेच राहतात, असे क्रास्तो यांनी सांगितले.
नेपाळींची नावे मतदारयादीत
भाजप निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. फातोर्डात जी नावे रद्द झाली आहेत, ती १०० टक्के मुद्दाम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फातोर्डात काही नेपाळींची नावे मतदारयादीत घालण्यात आली आहेत. हे नेपाळी भारतीय कधी झाले, असा प्रश्न त्यांनी केला. यात फातोर्डाच्या माजी आमदाराचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. ही एकदम गंभीर बाब आहे व आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गत निवडणुकीत ज्यांनी भाजपला मतदान केले नाही व आगामी निवडणुकीतही ते करणार नाहीत, अशी शक्यता असल्याने त्यांची नावे रद्द करण्यात आली असावीत, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.