

New PUC Certificate Rules 2026 Notified: वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून, मोदी सरकारने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसीच्या (PUC) वैधतेबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 13 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मोटार वाहन (सोळावा सुधारणा) नियम, 2026 अधिसूचित केले असून, राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासूनच हे नियम लागू झाले आहेत. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नवीन वाहनावरील ताण कमी करण्यासाठी सरकारने वाहनांच्या उत्सर्जन मानकांनुसार आणि वयानुसार पीयूसीची मुदत निश्चित केली.
नव्या नियमांनुसार, बीएस-1, बीएस-2 आणि बीएस-3 मानकांतील सर्व वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र आता केवळ तीन महिन्यांसाठी वैध राहील. त्यामुळे अशा वाहनांच्या मालकांना वर्षातून चार वेळा तपासणी करावी लागेल. तसेच 2017 ते 2020 दरम्यान लागू असलेल्या बीएस-4 मानकांतील वाहनांसाठी पीयूसीची मुदत सहा महिने ठेवण्यात आली. याउलट, 1 एप्रिल 2020 पासून लागू झालेल्या बीएस-6 मानकांतील खासगी वाहनांना मोठा दिलासा मिळाला.
सहा वर्षांपर्यंतच्या नवीन खासगी वाहनांचे पीयूसी आता थेट तीन वर्षांसाठी वैध राहील, तर सहा ते दहा वर्षे जुन्या वाहनांसाठी दरवर्षी आणि दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करणे आवश्यक असेल. व्यावसायिक किंवा ट्रान्सपोर्टमधील बीएस-6 वाहनांसाठी (Vehicles) सहा वर्षांपर्यंत दोन वर्षे, सहा ते दहा वर्षांपर्यंत एक वर्ष आणि त्यापुढे सहा महिन्यांची मुदत असेल.
नवे नियम लागू होण्यापूर्वी दिलेले पीयूसी प्रमाणपत्र त्यांच्या आधीच्या मुदतीपर्यंतच ग्राह्य धरले जाईल आणि पुढील वेळी नूतनीकरण करताना नवे नियम लागू होतील. वैध पीयूसीशिवाय वाहन चालवल्यास पहिल्यांदा एक हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो तसेच वाहन जप्त करण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या आरसीवर वाहनाचे मानक आणि वय तपासून वेळेत अधिकृत केंद्रावर तपासणी करुन घ्यावी आणि डिजिटल प्रत डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अॅपवर सुरक्षित ठेवावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.