मोरजी: गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोव्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे अशी मागणी गोवा राज्य शिवसेनेच्या वतीने मोपा विमानतळ पठारावर आयोजित केलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कार्यक्रमात मोपा विमानतळ पठारावर केली. (Goa Shiv Sena demanded that the Mopa airport be named after the late Bhausaheb Bandodkar)
गोवा शिवसेनेच्या वतीने प्रथमच विमानतळ पठारावर स्वर्गीय आणि गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य शिवसेनेच्या वतीने गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव विमानतळ देऊन समस्त गोमंतकीय जनतेचा आदर सरकारने ठेवावा अशी मागणी करण्यात आली. तसेच याप्रसंगी गोवा राज्य शिवसेनेच्यावतीने मोपा विमानतळ पठाराच्या प्रवेशद्वारावर स्व. भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ असा फलक लावला आणि जर सरकारने मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव दिले नाहीतर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि संपूर्ण जनता सरकारला माफ करणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीने सरकारला देण्यात आला.
मोपा पठारावर आयोजित केलेल्या या पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदिप ताम्हणकर, खास निमंत्रित म्हणून गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीचे समन्वयक दीपेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे, गोवा राज्य शिवसेनेचे उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, ओमकार प्रभुदेसाई, संजय साळगावकर, सुरेश साळगावकर, रामा साळगावकर, संजय पवार, दिवाकर जाधव, समीर पवार, रामदास मोरे, गुरुदास, कृष्णा पवार आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
भाऊसाहेब बांदोडकर हे दुरदृष्टी असलेले नेतेः सुदिप ताम्हणकर
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे या नात्याने सुदीप ताम्हणकर म्हणाले की गोवा मुक्तीनंतर गोव्याचे भाग्यविधाते म्हणून गोव्याला पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या रूपाने लाभले. या काळात मुख्यमंत्री असताना गोव्यात पायाभूत सुविधा तसेच मोठ्या प्रमाणे साधन सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या. दूरदृष्टी असलेल्या या नेत्याने शिक्षण क्षेत्रात तसेच वैद्यकीय क्षेञासाठी अनेक प्रकल्प आणले.
अन्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याने आज राज्यात जी चौफेर प्रगती होताना दिसत आहे याचे श्रेय हे भाऊसाहेब बांदोडकरांना जाते. गोव्यात त्याने विविध क्षेत्रात काम करत असताना शेतकरी आणि कष्टकरी जो समाज आहे त्यासाठी कुळ आणि मुंडकार कायदा आणून ज्या घरात गरीब आणि बहुजन समाज जे लोक राहतात ते घर यांच्या नावावर व्हावे यासाठी त्यांना कायदा करत कसेल त्यांची जमिन आणि राहील त्याचे घर हा कायदा अस्तित्वात आणला. भाऊसाहेबानी गोव्यातील पायलट आहेत त्यांना पायलटचा दर्जा दिला. देशातील पहिला पायलटसाठी कायदा जे दुचाकी वाहन चालक आहे त्यासाठी आणणारे देशातील पहिले मुख्यमंत्री म्हणून भाऊसाहेबांचा उल्लेख करणे गरजेचे आहे.
भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज सर्वच क्षेत्रात गोवा पुढे गेला आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना भाऊसाहेबांच्या दूरदृष्टी असलेले सरकाराची आज गरज असून त्या दृष्टीने भाऊसाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आज सरकारने त्या दृष्टीने वाटचाल करण्याची गरज आहे. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय असे असून त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ प्रकल्प ला द्यावे अशी मागणी आज शिवासेनेने केली असून आमचा या मागणीसाठी पूर्ण पाठिंबा असेल असे यावेळी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विचारांची आज गोव्याला गरज
यावेळी बोलताना कुळ मुंडकार संघर्ष समितीचे समन्वयक दीपेश नाईक म्हणाले की कष्टकरी आणि बहुजन समाजाचे आधारस्तंभ असलेले गोव्याचे भाग्यविधाते आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांची आज मोपा पठारावर पुण्यतिथीचा कार्यक्रम गोवा राज्य शिवसेनेच्या वतीने आयोजित केला आहे ही अत्यंत चांगली बाब असून या पठारावरील कष्टकरी समाजाने राखून ठेवलेल्या शेतकर्यांच्या जमिनी सरकारने कवडीमोल किंमतीला घेऊन आज त्यांना बेघर केले आहे . या जमिनीसाठी अजूनही सरकारने योग्य तो भाव दिला नाही.
गोवा भूमीत पूर्वी कष्टकरी हा राजा होता आता मात्र तो भाजप सरकारात भिकाऱ्या झाला आहे. या पठारावरील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून त्यांच्या पोटावर पाय सरकारने ठेवला आहे. सरकार आज भूमिपुत्र विधायक आणून गरीब शेतकऱ्यांना आणि गोव्याची अस्मिता नष्ट करण्याचा काम करत असून भूमिपुत्र बिलाच्या नावाने बाहेरील लोकांना इथे शिरकाव देण्याचे काम सरकार करत आहे. आपली वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी हे भूमिपुत्र बिल आणत असून त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने आज स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राज्य चालवावे असे आवाहन यावेळी दिपेश नाईक यांनी केले.
भाऊसाहेबानी शिक्षणाची गंगा आणलीः संजय बर्डे
यावेळी बोलताना संजय बर्डे म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी पोचवली. राज्याचे पहिले मुख्य स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा मुक्तीनंतर गोव्यात आमूलाग्र बदल घडून विविध क्षेत्रात काम करत असताना शिक्षण क्षेत्रात , जो कष्टकरी बहुजन समाज आहे तो शिकावा , साक्षर व्हावा यासाठी खेडोपाडी मराठी शाळा सुरू केल्या. आणि शिक्षणाची गंगा पोचवली. गोव्याचे रक्षण करण्यासाठी अनेक योजना त्या वेळी आखल्या आणि आजही त्या योजना अंमलात आहेत. कुळ मुंडकार कायदा आणून त्यांनी समस्त गोमंतकीय जनतेला न्याय दिला. मात्र त्यानंतर या कायद्याला बगल देण्याचे काम भाजप सरकारने केले.
आज भूमिपुत्र नावाचं बिल आणुन गोव्यात भाजप सरकार गोव्याची अस्मिता नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असून गोमंतकीय जनतेने आता जागृत राहून याला कडाडून विरोध करावा. आज भाऊसाहेबांच्या विचारांची गोवा राज्याला गरज असून याबाबत लोकांनी आवाज करून जनजागृती करणे गरजेचे आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता भाजपला योग्य ती जागा दाखवणार आहे असे यावेळी संजय बर्डे म्हणाले.
सरकारने गोव्याचे भाग्य विधाते स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळला नाव द्यावेः सुभाष केरकर
यावेळी बोलताना गोवा शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर म्हणाले की, आज पासून मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर विमानतळ असे नामकरण होणार असून सर्व गोमंतकीय जनतेने हा विमानतळ स्व.भाऊसाहेब विमानतळ म्हणूनच ओळखावा असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले गोवा मुक्तीनंतर स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोठे योगदान असून त्याने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य आणि दूरदृष्टी ठेवून केलेल्या कार्यामुळे आज बहुजन समाज विविध स्तरावर चमकत आहे.
गोव्याची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांनी अथक परिश्रम घेतले .त्यांच्या दूरदृष्टीने आज विविध क्षेत्रात प्रगती झाली. आज विविध क्षेत्रात लोक उद्योग व्यवसाय करत आहेत. कष्टकरी समाज आजही ताठ मानेने जगतो तो भाऊसाहेबामुळे. मात्र त्यांची ओळख पुसण्याचे काम भाजप सरकार करत असून त्याला आमचा नेहमीच विरोध असणार आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी केलेल्या कार्याचा आणि दूरदृष्टीचा भावी पिढीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोव्याचे भाग्यविधाते असलेले भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला आज पासून आम्ही शिवसेनेच्यावतीने नामकरण करत असून सरकारने याबाबत लवकरात लवकर नामकरणाचे सोपस्कार पूर्ण करून तशा प्रकारचा फलक लावावा. आज या ठिकाणी आम्हाला तसा फलक लावला.
सरकारने जर भाऊसाहेबांचे नाव या प्रकल्पाला देण्याचे डावलं तर याबाबत गोव्यातील जनता पेटून उठेल त्यासाठी शिवसेना या लढ्यात सहभागी होणार असून गोव्याची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी भाऊसाहेबांच्या या योग्य व्यक्तीचे नाव या विमानतळ प्रकल्पाला उचित असल्याचे यावेळी सुभाष केळकर म्हणाले. यावेळी राष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर भाऊ साहेब बांदोडकर विमानतळ असे नामकरण करण्यात आलेला फलक शिवसेनेच्या वतीने लावण्यात आला .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.