फोंडा : उसगावात (Usgaon Goa) युवतीवर दोघाजणांनी बलात्कार (Rape Case) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दोन्हीही संशयितांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या कारगाडीच्या काचांवर काळी फिल्मिंग केली असल्याने गुन्ह्यासाठीच या गाडीचा वापर होत होता काय?, यापूर्वी अन्य गुन्हे या कारगाडीतून झाले आहेत काय?, याचा तपास फोंडा पोलिस करीत आहेत. उसगावातील या बलात्कार प्रकरणातील दोघाही संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
उसगावात गेल्या जूनमध्ये पेडणेतील एका युवतीवर दोघाजणांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. ही युवती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा उसगावात घडल्याने फोंडा पोलिसांनी काल (बुधवारी) मुख्य आरोपी पोस्तवाडा - होंडा येथील उस्मान आदम सय्यद व त्याचा मित्र साईजू वर्गीस यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. फेसबूकवर मैत्री करून उस्मान यानेच पीडित युवतीला उसगावात बोलावून नंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. उस्मान व साईजू या दोघांनाही फोंड्यातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली गुन्ह्यात वापरलेली कारगाडी पूर्णपणे काळ्या फिल्मिंगची असून, आतील माणूस बाहेरून दिसणेच शक्य नाही. ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या उस्मान आणि साईजू यांनी अन्य गुन्ह्यांसाठीही हीच कारगाडी वापरली असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
वास्तविक कारगाडीला पूर्णपणे काळी फिल्मिंग करणे बेकायदा आहे, मात्र हे दोघेही ही कारगाडी घेऊन बिनधास्त वावरत होते. पोलिसांनी या कारगाडीकडे कधी लक्षच दिले नाही काय, असा सवालही केला जात आहे. एखादा गुन्हा घडल्यावरच पोलिस जागे होणार काय, असा सवालही केला जात आहे. निदान आता तरी काळ्या काचांच्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.