पूर्वी येरे येरे पावसा... सारखी गाणी म्हटली जायची, परंतु यंदा लोक पावसाला कंटाळले आहेत. यंदा मार्च महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे तो आता दिवाळी संपली तरी परतण्याचे काही नाव घेत नाही आहे. यावरून समाजमाध्यमावर देखील अनेक रिल्स व्हायरल होत असून आता बहुतेक पाऊस ३१ डिसेंबरची पार्टी करूनच परतणार असल्याचे बोलले जात आहे...मागील सहा महिन्यापासून सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोक आता पावसाला कंटाळले आहेत एवढे मात्र नक्की... सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? असे विचारण्या ऐवजी सांग...सांग भोलानाथ पाऊस जाईल का ? असे विचारण्याची वेळ आली आहे एवढे नक्की. ∙∙∙
मडगावात रस्त्याच्या कडेला भाजी व फळविक्रीच नव्हे तर अनेक वस्तूंची सर्रास विक्री चालते. मात्र मंत्री कामत यांच्या नगरपालिकेतील जनता दरबाराच्या वेळी बाजारवाल्यांनी केलेल्या तक्रारी नंतर स्टेशन रोडवर सायंकाळी चालणाऱ्या अशा विक्रीला पायबंद बसल्याचे दिसून येते. पण अन्य भागातील विक्री चालूच आहे. ती बंद करण्यासाठी यंत्रणा कधी पावले उचलते, त्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. दवर्ली जंक्शनवर मडगावच्या बाजूने म्हणे असाच एक फळविक्रेता ठाण मांडून आहे. त्याला हटविण्याचे धाडस नगरपालिका अधिकाऱ्यांना नाही, कारण त्यांचा गॅाड फादर जबरदस्त आहे, असे सांगितले जाते. वास्तविक हे जंक्शन अत्यंत रहदारीचे आहे. सदर फळविक्रीमुळे ते धोकादायकही ठरले आहे . पण तरीही त्यावर कारवाई होत नाही. मडगावात अशी अनेक राजकीय ठिकाणे म्हणे नगरपालिका दुर्लक्षित करते. ∙∙∙
नावेली मतदारसंघात सध्या पंचायती अस्थिर करण्याचे प्रकार सुरू आहेत. परवा दवर्ली पंचायतीत सकाळी निवडलेल्या सरपंचावर दुपारी अविश्वास दाखल झाला. त्यामुळे तेथे सध्या कोणीच वाली उरलेला नाही. त्या शेजारच्या रुमडामळ पंचायतीची तर गोष्टच वेगळी. तेथे गेल्या सहा-सात महिन्यापासून सरपंच-उपसरपंच नाही. कारण साधे आहे, अशी निवड करण्यासाठी अनेक तारखा ठरविल्या गेल्या तरी या ना त्या कारणास्तव तेथे निवड झालेली नाही. तेथील चार पंच अपात्र ठरलेले असून त्यावर सुनावणीच होत नाही. या सर्व घडामोडीत पंचायतीचा सर्व कारभार थंडावलेला आहे. दवर्ली पंचायतीची स्थितीही काही वेगळी नाही. मात्र तेथे भाजपप्रणीत उमेदवाराचा पराभव नेमका कसा झाला? याचे गणीत तेथील राजकीय धुरंधरांना सोडविता आलेले नाही खरे. ∙∙∙
विजय सरदेसाई यांच्या श्रीकृष्ण विजयोत्सव कार्यक्रमात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन एक सुरात भाजपविरोधात बोलल्याने येत्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांची युती होणार या चर्चेला ऊत आला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे मिडियासेलचे दिव्यकुमार यांनी याबाबत ट्वीट करताना, युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचलीत होऊ नये, असे म्हटले आहे. आता दिव्यकुमार यांनी हे ट्वीट काँग्रेस कार्यकर्त्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी केले आहे, की युरी आणि एल्टन, विजय सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढले तरी काँग्रेस अजुनतरी युती करण्याच्या मूडमध्ये नाही, हे त्यांना सांगायचे आहे. ∙∙∙
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘माझे घर योजना’ सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडायचे नाहीत, असे ठरवले आहे. यासाठी उपलब्ध असलेला रविवार हा दिवसही ते खर्ची घालणार आहेत. माझे घर योजनेचे अर्ज वितरणाचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहेत. आज रविवारी सकाळी १० वाजता साखळी येथील रवींद्र भवनात, ११.३० वाजता जुनेगोवे पंचायत सभागृह, दुपारी ४ वाजता मेरशीच्या अलुआ हॉटेलमध्ये तर सायंकाळी ५.३० वाजता कला व संस्कृती खात्याच्या पाटो येथील बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माझे घर योजनेचे अर्ज वितरण होईल. ∙∙∙
वागातोर येथील किनारी भागात डॅनियल लोबो यांच्या मालमत्तेच्या सखल भागात समुद्राचे पाणी घुसू नये, यासाठी बांधण्यात येणारी भिंत वादाचे कारण ठरली आहे. हा वाद संपता संपेना असा आहे. त्यावरून राजकीय भाषेत एकमेकांवर शिंतोडे उडवून झाले आहेत. स्थानिक पंचायतीने मात्र त्यापासून स्वतःला दूर ठेवत कारवाई सुरू ठेवली आहे. काम बंद करण्याचा आदेश बजावल्यानंतर आता शनिवारी त्या भागाची पाहणी करण्यात आली आहे. भिंत बांधण्यासाठी दगडात मारलेले चर, तेथे जाण्यासाठी करण्यात आलेली वाट या साऱ्याची नोंद घेण्यात आली आहे. जलसंपदा खाते हे काम करते तर मग खाते गप्प का? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. ∙∙∙
मोरजी हे गाव पर्यटनामुळे चर्चेत असते. मध्यंतरी रशियन फलकांमुळे देश पातळीवर गाजले होते. मोरजीत आधी अरुंद रस्ते होते. वाहतूक वाढली आणि रस्ते रुंद करावे लागले. शक्य तिथे रस्ता रुंदीकरणही झाले. पण त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत काही सुधारणा झाली नाही. या रुंद करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क करून ठेवण्यात येतात. त्यामुळे पूर्वी इतकाच अरुंद रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असतो. दोन्ही बाजूला दुकाने असल्याने कोणावर कारवाई करावी, हा स्थानिक पातळीवरचा प्रश्न आहे. याचा फटका तेथून ये जा करणारे आणि पर्यटक यांना बसत असतो. आपलेच दात आणि आपलेच ओठ या न्यायाने अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात, असा स्थानिकांचा अनुभव आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.