

Adult Content Ban In India: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' चे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी भारतात एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक निर्णय घेतला. ताज्या वृत्तानुसार, मस्क यांनी भारतात 'X' वर 18+ व्हिडिओ आणि अश्लील मजकूर दाखवण्यास पूर्णपणे बंदी घातली. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून यामुळे भारतीय युजर्समध्ये आता दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युजर्सनी या निर्णयाचे स्वागत केले असून काहींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्लॅटफॉर्मवरील या मोठ्या बदलाची चर्चा होताच एका प्रसिद्ध 'OTT' संबंधित अकाउंटने मस्क यांचे कौतुक केले. ''मस्क यांनी भारतात 18+ व्हिडिओंवर बंदी घातली. मस्क यांचा आदर वाटतो," अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली, ज्याला हजारो लोकांनी लाईक करुन पाठिंबा दर्शवला. तसेच, अनेक पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे सोशल मीडियावरील वातावरण अधिक सुरक्षित आणि कौटुंबिक होईल, अशी आशा व्यक्त केली.
दुसरीकडे, इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या या निर्णयामुळे अनेक युजर्स संतापलेले दिसत आहेत. काही युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली की, त्यांनी सेव्ह केलेले किंवा बुकमार्क केलेले जुने व्हिडिओ आता दिसत नाहीत. "मस्क अश्लील मजकुरावर बंदी कशी काय घालू शकतात? माझे सर्व बुकमार्क आता रिकामे दिसत आहेत," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अनेकजण या निर्णयामुळे 'X' च्या वापरात घट होईल, असा अंदाजही वर्तवत आहेत.
मात्र, तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ मस्क यांचा नसून भारतीय नियामक मंडळाच्या (Indian Regulations) कडक नियमांमुळे आणि वाढत्या दबावामुळे घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली. अश्लील मजकुराबाबत भारतात असलेले कठोर कायदे पाहता 'X' ला आपला व्यवसाय वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले असावे.
दरम्यान, काही युजर्सनी ही बंदी झुगारण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले. जागतिक स्तरावर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकुराचे नियमन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. यामुळे आगामी काळात 'X' च्या धोरणांमध्ये आणखी काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.