Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

Khari Kujbuj Political Satire: गोव्यातील सर्व खाणी येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होतील, असे मुख्यमंत्री वरचेवर सांगतात. त्यामुळे खाण अवलंबीत व अन्य संबंधित संतुष्ट होताना दिसतात.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी नावेलीत ३५व्या सिनियर राष्ट्रीय सेपाक टाक्रो स्पर्धेचे उद्‍घाटन केले. त्या नंतर त्यांनी हा खेळ थोडावेळ पाहिला व नंतर त्यांना स्वता या खेळात भाग घेण्याचा मोह झाला. त्यांनी या खेळात वापरण्यात येणारा चेंडू न्याहाळून पाहिला व नंतर स्वतः पायाने चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे या पूर्वीचे विधानसभेतील साथीदार व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी चेंडूवर फटका मारण्यासाठी पाय वर उडवला. मात्र मुख्यमंत्र्यांना काही जमले नाही. राजकारण वेगळे व चेंडूवर फटका मारणे, यात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे तेव्हा कदाचित मुख्यमंत्र्यांना जाणवले असेल. तसेच आता फटका मारण्यास मुख्यमंत्री चुकले की त्यांना चेंडू देणारे बाबू कवळेकर, त्यांना योग्य प्रकारे चेंडू देऊ शकले नाही, यावर लगेच उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाली. ∙∙∙

खाणी खरंच सुरू होणार?

गोव्यातील सर्व खाणी येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होतील, असे मुख्यमंत्री वरचेवर सांगतात. त्यामुळे खाण अवलंबीत व अन्य संबंधित संतुष्ट होताना दिसतात. पण खाणीचे परवाने मिळालेल्या विविध भागांतील रहिवासी जे अडथळे तयार करत आहेत, ते पाहता खरेच खाणी सुरू होणार का? असा प्रश्न इतरांना पडत आहेत. विशेषतः डिचोलीतील मुळगाव व अन्य भागांतील लोक खाणीसाठी ज्या अटी लादत आहेत, ते पाहता खाणीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असलेल्यांना कोणताच वाटत नाही. काही ठिकाणी तर ट्रकवाले अशी समस्या उभी करत आहेत, त्यामुळे खाणींना सर्व प्रकारचे परवाने मिळाले, तरी मानवनिर्मित समस्यांमुळे त्या खरेच सुरू होतील की काय? अशी स्थिती सध्या तरी आहे व त्यात राजकारणी हस्तक्षेप करताना दिसत नाहीत खरे. ∙∙∙

फोंड्याची उमेदवारी...

जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे निधन झाले, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पुत्राला पणजीत उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे आता रवी पुत्राला कशी काय उमेदवारी दिली जाणार? असा सवाल काहीजण उपस्थित करीत आहेत. मात्र रवी नाईक यांची गोष्ट वेगळी आहे. रवी नाईक हे बहुजन समाजाचे नेते म्हणून प्रचलित आहेत, त्यातच राज्यातील सर्वांत मोठा असलेल्या भंडारी समाजाचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. रवींच्या अंत्यसंस्कारावेळी या समाजाच्या प्रतिनिधींनी थेट रवी पुत्राला आमदारकी त्याचबरोबर मंत्रिपदही द्यावे, अशी जोरदार मागणी खुद्द मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर केली आहे. त्यामुळे साहजिकच भाजपसमोर पेच निर्माण होणारच. त्यातच भंडारी समाजाला दुखवणे भाजपला जड जाऊ शकते, म्हणून राज्यातील या सर्वांत मोठ्या समाजाला चुचकारण्यासाठी रवी पुत्राला उमेदवारी द्यावीच लागेल, असे बहुतांश जणांचे मत आहे. ∙∙∙

...तलवार म्यान!

सध्या ‘आरजीपी’ने आमदार लोबो दाम्पत्यांना लक्ष्य केले आहे. परिणामी आरजीपीचे मनोज परब व लोबो दाम्पत्यामध्ये राजकीय कलगीतुरा सुरू आहे. अशातच आरजीपीने मायकल लोबोंना आव्हान दिले होते, की दिल्ली बिल्डर लॉबीकडून आरजीपीने पैसे घेऊन सेटिंग केली असल्याचा एकतरी पुरावा लोबो यांनी द्यावा, आम्ही पक्ष बंद करू! पण हे आव्हान स्वीकारण्यास लोबो तयार नाहीत. असे लोबोंच्या प्रतिक्रियेवरून दिसते. आम्ही आव्हान घेत नाही, कारण मनोज परब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते मोठे व्यक्ती आहेत. असे म्हणत लोबो यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना शुक्रवारी वेळ मारून दिली. एरवी सरकार असो किंवा पक्षातील सहकारी असो, लोबो नेहमीच घरचे तसेच विरोधकांना शिंगावर घेतात! पण आरजीपीसमोर लोबो यांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसते. कारण २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्याला आरजीपीचा आणखीन त्रास होऊ नये, त्यामुळेच लोबो हे प्रकरण इथेच संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेही राजकारणात इगो पेक्षा, स्वतःचे राजकीय साम्राज्य टिकवून ठेवणे जास्त महत्वाचे असते. कदाचित त्यामुळे लोबो आरजीपीसोबत पंगा घेण्याचे टाळत असावे, अशी चर्चा आहे.∙∙∙

दिकरपाल पंचायतीचे नेमके गणित काय?

सरपंच निवडीवरून सध्या दवर्ली-दिकरपाल पंचायत चर्चेत आली आहे. या पंचायतीत एकूण ११ पंच आहेत. त्यातील चार पंच भाजपचे व बाकीचे ७ हे नेमके कोणत्या पक्षाचे हे स्वतः पंचानाच माहित नसावे. पण या सात मधील दोघांना आपल्या बाजूने आणून भाजप ही पंचायत चालवत आहे. विद्याधर आर्लेकर यांना सरपंचपदी निवडून आणण्यासाठी बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत आठ पंच उपस्थित होते. त्या सर्वांनी विद्याधर यांना निवडून आणण्याचा निर्धार केला, सर्व घरी गेले. मात्र दुसऱ्या दिवशी वेगळेच चित्र दिसले. या आठ मधील तिघांनी विद्याधरला मत मारण्याऐवजी मिनीन कुलासोला सरपंचपदी निवडून आणले. संध्याकाळी त्यातील दोघांनी भाजपशी हातमिळवणी करुन मिनीनवर अविश्वास ठराव आणला. आता हे दोघे कोण? या बद्दलची चर्चा रंगली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; राजकारण्‍यांना अचानक गोमातेचा कळवळा

म्हणे दोन वर्षांचा अभ्यास!

वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी अधिक वीज वापर केल्यास २० टक्के कर वाढ होणार असल्याचे जाहीर केले आणि राज्यातील जनतेला ऐन दिवाळीच्या उत्साहात शॉक दिला आहे. अधिक वापर केल्यास कर वाढ आणि कमी वापर केल्यास सवलत देण्याचा वीज खात्याचा हा नवा फंडा किती फायदेशीर ठरणार आहे, हे खात्याच्या अभियंत्यांनाच माहीत. विशेष बाब म्हणजे हा नवा फंडा लागू करण्यासाठी वीज खात्याने दोन वर्षे अभ्यास केला आहे. मंत्री महोयदयांनी वेळेचे जे नियम सांगितले आहेत, ते आणि अभियंत्यांकडून सांगितले आहेत, त्यात तफावत दिसून येते. असो मंत्र्यांच्या म्हणण्यावर विश्वासार्हता ठेवल्यानेच विरोधकांकडून तात्काळ प्रतिक्रियाही उमटल्या. खात्याच्या अभियंत्यांना दोन वर्षे अभ्यास करावा लागला, त्यामुळे हा नवा फंडा आल्याचे म्हणतात. म्हणूनच यावरून अभियंत्यांनी असा काय अभ्यास केला की एवढा मोठा कालावधी लागला, हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'विरोधकांनी आरशात बघा, नरकासुर दिसेल', कामतांचा टोला; पर्वरी उड्डाणपुलाबाबत संयम बाळगण्याचे आवाहन

आता नोव्हेंबरची प्रतीक्षा!

टॅक्सीवाल्यांसाठी डिजिटल उपाय सरकार काढणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा आहे. राज्यभरातील २० हजार टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा आमदार मायकल लोबो यांनी हाती घेतला आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहतूक सचिव व वाहतूक संचालकांची बैठक घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गावरील टॅक्सी भाडे किती हे मोबाईलवर समजावे, अशी व्यवस्था करा यासाठी लोबो आग्रही आहेत. टॅक्सीत बसल्यानंतर भाडे दरासाठी घासाघीस बंद करा असेही त्यांचे म्हणणे आहे. लोबोंचे म्हणणे सरकार किती ऐकते ते आता नोव्हेंबरमध्येच समजणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com