पणजी : युवक काँग्रेस हा काँग्रेसचा कणा आहे. केवळ सदस्य नोंदणीसाठी व पक्षीय निवडणुकीपुरते रस्त्यावर उतरून चालणार नाही, तर विविध विषय हाती घ्यावे लागतील. महिला काँग्रेसलाही रस्त्यावर उतरावे लागेल, अशी अपेक्षा राज्य प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केली.
येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या शपथविधी सोहळ्यात त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी व्यासपीठावर गोवा युवक काँग्रेस प्रभारी सचिव मनीष शर्मा, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू, युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल पाटील,
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर, ए. के. शेख, गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अर्चीत नाईक, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
डॉ. निंबाळकर म्हणाल्या की, अर्चीत नाईक यांना रस्त्यावर उतरणे सांगणे योग्य वाटणार नाही. कारण माजी खासदार शांताराम नाईक आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या बिना नाईक यांचे ते चिरंजीव असल्याने काँग्रेस पक्षाचे बाळकडू घेतले आहे,
त्यांना आंदोलनाविषयी सांगायला नको. शपथ घेतल्यानंतर तात्काळ अर्चीत यांनी मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.
युरी आलेमाव म्हणाले की, आगामी विधानसभेची निवडणूक युवकांसाठी महत्त्वाची आहे. राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरली आहे. राज्यातील जमीन संरक्षण करण्याचे आव्हान जनतेसमोर येऊन ठेपले असल्याचे सांगत त्यांनी युवक काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
अमित पाटकर म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी भाजप सरकारने राज्याची काय स्थिती करून ठेवली आहे, हे दाखवून दिले आहे, नमूद केले. चोडणकर यांनी राज्यभर पदयात्रा काढावी, असे आवाहन केले.
शर्मा, भानू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मनीष शर्मा आणि उदय भानू यांनी अर्चीत नाईक यांना युवक काँग्रेसचा झेंडा हाती दिला आणि अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. शर्मा यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.
अर्चीत नाईक म्हणाले की, राज्यासमोर जे मुख्य विषय आहेत, त्याविरोधात युवक काँग्रेस आवाज उठवत राहील. अमलीपदार्थ, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता असेही मुद्दे समोर आहेत. आम्ही प्रदेश काँग्रेसबरोबर युवक काँग्रेसही रस्त्यात उतरेल. आगामी २०२७ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यावेळी युवक काँग्रेसला २० टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी केली. अध्यक्षपद हे पदासाठी नाही, तर सेवेसाठी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.