

साकोर्डा हा माझा गाव. या माझ्या गावाला साकोर्डा नाव कसे पडले, याबद्दल मात्र मी अनभिज्ञ आहे. सरकार दप्तरीही या गावाचे नाव साकोर्डाच आहे. पावसाळ्यात अक्राळ विक्राळ रूप धारण करणाऱ्या व एरवी शांत वाहणाऱ्या रगाडा नदीच्या तीरी माझा साकोर्डा गाव वसला आहे.
तेथे माझे वडिलोपार्जित घर आहे. माझ्या कडू गोड आठवणी त्यात समावलेल्या आहेत.तेथे पाय ठेवताक्षणी एकेक करून त्या मनात रुंजी घालू लागतात. येथे खाण व्यवसाय बरीच वर्षे चालला म्हणून येथील लोकांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष केले.आता खाणी बंद पडल्यामुळे आपल्या मूळ व्यवसायांकडे गावातील लोकांनी आपले लक्ष पुन्हा केंद्रित केले आहे.
सुपारी, भाजीचे मळे आणि काही प्रमाणात दुधाचा व्यवसाय येथे चालतो. माझ्या गावांतील लोक कष्टकरी आहेत, मेहनती आहेत. पूर्वीच्या काळी माझ्या गावातील महादेव मंदिरांच्या मंडपात माझी शाळा भरत होती.
सखाराम मोरजकर नावाचे गुरूजी मला लाभलेले त्यांच्यामुळेंच मी लिहायला-वाचायला शिकलो.आज ते हयात नाहीत, त्यांना विनम्र अभिवादन. माझ्या गावापासून दूर हा सांगे तालुका माझ्या गावाला लाभलेला.
कष्टकरी गावकऱ्यांना सरकारी कामासाठी तेथे जाणे म्हणजे ती एक तारेवरची कसरत वाटायची. पण त्यांची हाक सरकारने ऐकली व आता माझ्या गावच्या वाट्याला धारबांदोडा तालुका आला.
आता त्यांना खूपसा दिलासा मिळतो आहे. कदंबकालीन तांबडी सुर्लाचे महादेवाचे मंदिर हे जरी तांबडीसुर्लाला असले तरी ते साकोर्डा पंचायतीच्या हद्दीत येते. हे मंदिर राष्ट्रीय नकाशावर तळपत आहे. शिवरात्रोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तेव्हा तेथील वातावरण भक्तीमय होऊन जाते. देशी विदेशी पर्यटक वारंवार या मंदिराला भेट देतात. माझ्या गावाचे तें भूषण आहे. आता माझ्या गावांतील रस्ते चकाचक आणि गुळगूळीत बनलेले आहेत, इतके की आज शहरांतील रस्त्यांनाही ते लाजवतात.
मला आठवतं, माझ्या लहानपणी कुळे ते कापो आंबो इथपर्यंत डांबरी रस्ता होता पुढे कापो आंबो ते धारबांदोडा पर्यंत खडबडीत रस्ता होता. मला सायकल शिकण्याचे जबरदस्त वेड होते, पण माझ्याकडे सायकल नव्हती. माझे एक वर्गमित्र विश्वनाथ जोग यांच्याकडे ती होती. मी माझी सायकल शिकण्याची इच्छा त्यांच्याकडे बोलून दाखवली, त्याने मला त्याकाळी माझ्या गावांतील खडबडीत रस्त्यावरून सायकल शिकवली.
माझ्या गावात गणपतीची मूर्ती बनवणारा मूर्तिकार माझ्या घरापासून जवळच आहे. त्यामुळें चतुर्थी येण्यापूर्वीच मला गणेशाचं दर्शन होत असतं. गावांत मला माहीत असलेली दोन महादेवाची मंदिरें आहेत.अशा मंदिरांनी नवा साज चढवलेला आहे, त्यांतील एक मळेंवाडा व दुसरं देऊळवाडा येथे आहे.
प्रत्येक सोमवारी तेथे भजन आरत्या होत असतात.दोन्ही मंदिराच्या पुढच्या भागांत वर्षपध्दतीप्रमाणे दोन नाटकाचं आयोजन पूर्वीपासून होत आहे. अशा नाटकांना गावांतील लोकांचे प्रचंड प्रमाणात सहकार्य लाभते. पावसाळ्यांत माझ्या गावात पाय ठेवला तर तो हिरवीगार शाल पांघरल्या सारखा वाटतो. माझ्या गावाने आजही आपली पूर्वीची ओळख जपून ठेवलेली आहे. ही माझ्या दृष्टीने एक अभिमानाची भूषणावह बाब वाटते.
गुरुदास नाडकर्णी,
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.