Goa Politics: खरी कुजबुज; विजयचा दावा खरा ठरणार?

Khari Kujbuj Political Satire: कुडचडेतून नीलेश काब्राल मागची तीन टर्म जिंकून येत आहेत. कुडचडेच्‍या मतदारांची नसन्‌नस त्‍यांना माहीत असल्‍यामुळे ते हा पराक्रम करू शकले, असे सांगितले जाते.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

विजयचा दावा खरा ठरणार?

आमदार विजय सरदेसाई विरोधात असले, तरी सरकारात नेमके काय चाललेय? मुख्‍यमंत्री कोणते निर्णय रेटणार? कोणते मागे घेणार? याची संपूर्ण माहिती त्‍यांना असते. त्‍यासाठी त्‍यांची काही माणसे दिवसरात्र काम करीत असतात. गुरुवारी पत्रकारांशी युनिटी मॉलच्‍या विषयासंदर्भात बोलताना, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकल्‍पावरून निश्‍चित माघार घेतील, आम्‍हाला युनिटी मॉल नको, गोमंतकीयांची ‘युनिटी’ हवी, असेही ते म्‍हणतील. भाजपची ही पद्धतच आहे, असा दावा त्‍यांनी केला. त्‍यांचा हा दावा खरा ठरणार? की मुख्‍यमंत्री त्‍यांना खोटे ठरवणार? हे पुढील काहीच दिवसांत समजेल. ∙∙∙

काब्रालच्‍या शिर्डीवाऱ्या

कुडचडेतून नीलेश काब्राल मागची तीन टर्म जिंकून येत आहेत. कुडचडेच्‍या मतदारांची नसन्‌नस त्‍यांना माहीत असल्‍यामुळे ते हा पराक्रम करू शकले, असे सांगितले जाते. आपल्‍या मतदारांची बडदास्‍त कशी ठेवावी, हे काब्राल बाबांना चांगलेच माहीत आहे. त्‍यामुळे दर चतुर्थी आणि दिवाळीला मतदारांच्‍या घरी त्‍यांच्‍यावतीने सामानाच्‍या पिशव्‍या पोहोचतातच. आता काब्राल यांनी मतदारांसाठी स्‍वत:च्‍या खर्चाने शिर्डी वाऱ्यांही सुरू केल्‍या आहेत. दोन दिवसांपूर्वी या वारीसाठी कुडचडेच्‍या मतदारांना घेऊन बस शिर्डीला रवाना झाली. आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्‍याने कुडचडेत आता अशा वाऱ्या चालूच रहाणार, असे वाटते. आता काब्रालचे विरोधक मतदारांना खूष करण्‍यासाठी आणखी काय करतात, ते पहावे लागणार आहे. ∙∙∙

बाबूशचा आत्मविश्वास!

महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग फेररचना मसुदाही तयार झाला आहे आणि हा मसुदा सत्ताधाऱ्यांकडून हवा तसा तयार केला गेला असेलही. ३० जागांसाठी महानगरपालिकेची निवडणूक काही आठवड्यानंतर होईल. मंत्री बाबूश मोन्सेरात यांचीच महापालिकेत अधिक काळ सत्ता राहिली आहे. गतवर्षी भाजप पुरस्कृत त्यांच्या पॅनलने २७ जागा जिंकल्या होत्या. आता मंत्री बाबूश ३० च्या ३० जागा जिंकणार असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. स्मार्ट सिटीची कामे सुरू होती, तेव्हा पणजीतील नागरिकांना काय त्रास सोसावा लागत होता, तेव्हा बाबूश कधी नागरिकांना विचारायलाही आले नाहीत, हे नागरिक खरोखरच विसरलेत की काय? असा प्रश्न पडतो. परंतु या निवडणुका कशा जिंकायच्या हे त्यांच्याएवढ्या मत्सुद्दी राजकारण्याला बरेच उमगलेले आहे, हे त्यांनी वेळोवेळी सिद्धही केले आहे. गुरुवारीही मुख्यमंत्र्यांच्या निवासातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी यूट्यूब चॅनलवाल्याकडे ३० जण निवडून येणार असल्याचेच सांगितले, ते उगाच नाही. ∙∙∙

बाबांना तिळगूळ....

दिगंबर कामत यांनी बुधवारी मडगावच्या न्यू मार्केटला भेट दिली. या मार्केटच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी कामत आले होते. व्यापाऱ्यांना त्रास होता कामे नये, दिलेल्या मुदतीत नूतनीकरणाचे काम पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी कंत्राटदाराला बजावले. यावेळी एका व्यापाऱ्याने त्यांना तिळगूळ खायला दिला. बाबाने तो गोड मानून तोडांतही टाकला. यावेळी मागून कुणीतरी ‘तिळगूळ खा, गोडगोड बोला’ असं पुटपुटला. उपस्थितांना मात्र, त्यावेळी हसू आवरता आवरले नाही. ∙∙∙

...आणि अर्चितला पोलिसांनी उचलले?

जे करतात ते धडाक्यात करा तरच आपण लक्षात राहणार असे काही नेते समजतात. युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली व आपला दम दाखवायला सुरवात केली. युवक काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने अर्चित यांनी सरकार विरुद्ध आंदोलन छेडले. युवक आंदोलन आक्रमक पाहिजे वर्तमान पत्रात व वृत्तवाहिन्यांवर झळकायला हवे, या जिद्दीने आंदोलन यशस्वी केले. अर्चितना पोलिस उचलून नेतात, असा फोटो सोशल मीडियावर झळकला अन् अर्चित खुश झाले. काही का असेना अर्चितने आपली निवड सार्थ ठरविली. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

वेन्झीने गाठले तुये!

सध्‍या सासष्टीतील किनारपट्टी भागात रात्री १० वाजल्‍यानंतर लागू केला जाणारा ‘साऊंड बॅन’ आणि बेतुल येथे उभे रहाणारे नियोजित बंदर या दोन मुद्यांवरून घबराटीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी या संदर्भात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी सासष्‍टीच्‍या सरपंचांबरोबर बैठक घेऊन मुख्‍यमंत्र्यांकडे आपण हा प्रश्‍न मांडणार असे सांगितले होते. त्‍यामुळे कदाचित आपण मागे पडणार असे वाटल्‍यामुळे वेन्झी व्‍हिएगस यांनी काल सकाळी सकाळी मुख्‍यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन देण्‍यासाठी भेटायचे ठरविले. काल म्‍हणे मुख्‍यमंत्री पेडणे तालुक्‍यातील तुये गावात हाेते. पण वेंझीने मुख्‍यमंत्र्यांना निवेदन देताना त्‍यांच्‍याबराेबर फोटो येणे महत्‍वाचे असल्‍याने चक्‍क तुये गाठले. विजय सरदेसाई यांच्यापेक्षा आपण कुठल्‍याही बाबतीत कमी नाही, हे दाखविण्‍याचा तर त्‍यांचा प्रयत्‍न नव्‍हता ना? ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; आमदार असावा तर असा!

उत्‍पल यशस्‍वी होणार?

येत्या पणजी मनपा निवडणुकीत स्‍वत:चे पॅनेल उभे करण्‍याची घोषणा स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्‍पल पर्रीकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. शिवाय नगरसेवकांच्‍या बैठका होत नाहीत, त्‍यांना काही विचारण्‍यास गेले की यांची–त्‍यांची नावे सांगतात, यातून पणजीचा प्रशासकीय कारभार ढासळल्‍याचे दिसत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. पणजीवासीयांना न्‍याय मिळावा असे वाटत असेल, तर आपल्‍या पॅनेलला निवडून देण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्‍पलना नाकारत बाबूश मोन्‍सेरात यांना उमेदवारी दिल्‍यापासून बाबूश यांचे नाव जरी निघाले तरी उत्‍पल यांचा संताप वाढतो. दुसरीकडे मनपावर दरवेळी बाबूश पॅनेलचाच झेंडा फडकत असतो. यावेळी बाबूश यांचे पॅनेल हेच भाजपचे पॅनेल असेल. त्‍यामुळे बाबूश–भाजपच्‍या पॅनेलला रोखण्‍यात उत्‍पल यशस्‍वी ठरतात की, पणजीवासीयांना बाबूशच हवेत? या प्रश्‍‍नाचे उत्तर निकालानंतरच मिळेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com