Sanjana Velip joins Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजप शिस्तीला आव्हान! संजना वेळीप काँग्रेसमध्ये; आजगावकर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत

Sanjana Velip joins Congress: जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष संजना वेळीप यांनी भाजपची साथ सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष संजना वेळीप यांनी भाजपची साथ सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीही पेडण्यात आपले उमेदवार जाहीर करण्याचे ठरवले आहे. या कृतीतून भाजपच्या शिस्तीला आव्हान देणे सुरु झाल्याचे दिसून येते.

ही केवळ दोन प्रकरणे नव्हे, तर उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ येईल तशी भाजपमधील बंडखोरी ठळक होत जाईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. संजना वेळीप यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव म्हणाले, की भाजपा कार्यकर्त्यांनाही सरकारच्या कामकाजाचा कंटाळा आला आहे.

हे सरकार मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात अपयशी ठरले आणि महिलांना हक्क देण्यातही ते अयशस्वी झाले आहे. त्यांना महिला आरक्षणाबाबतही गांभिर्य नाही. मला खात्री आहे की, आत्मसन्मान असलेले आणि गोव्यासाठी प्रेम असलेले लोक भाजपमध्ये राहणार नाहीत. काणकोण तालुक्यातील पैंगीण मतदारसंघात भाजपने अजय लोलयेकर यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे नाराज होऊन शैलेश पागी व विपीन पागी हे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते अपक्ष लढू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. खोला मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. तेथे रुपाली पागी यांनी भाजपची उमेदवारी मिळताच बंडखोरीची भाषा स्थानिक पातळीवर ऐकू येऊ लागली आहे. रुपा पागी व तेजल पागी या रिंगणात उतरल्या तर ती भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

गिर्दोली मतदारसंघात बाळ्ळी ही ११ सदस्यीय मोठी पंचायत येते. या मतदारसंघातील फातर्पा, मोरपिर्ला व बार्से या पंचायती केपे विधानसभा मतदारसंघात तर मळकर्णे व कावरेपिर्ला या दोन पंचायती सांगे विधानसभा मतदारसंघात येतात. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे किती सख्य ‘आहे’ याची राजकीय वर्तुळात कल्पना आहे.

त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचे श्रेय कोणाला यावरून येथे दोघांत जुंपू नये, असे कार्यकर्त्यांना वाटते. दुसरीकडे, कारापूर सर्वण मतदारसंघात महेश सावंत या विद्यमान सदस्यालाच भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांचे आमदारांशी पटत नाही हे डिचोलीत सर्वांना ठाऊक आहे.

तेथे उमेदवारी मिळावी असे वाटणारे सुभाष मळीक यांची भूमिका भाजपला किती त्रास देईल, यावरच बरेच काही अवलंबून आहे. या मतदारसंघात कुडणे ही साखळी विधानसभा मतदारसंघातील एकमेव पंचायत असून पिळगाव, वन मावळिंगे, कारापूर सर्वण या पंचायती येतात. कारापूर सर्वणचे पंचायत मंडळ आमदार विरोधी असल्याची धगही या निवडणुकीत जाणवेल.

दरम्यान, तोरसेतून राघोबा कांबळी यांना धारगळमधून श्रीकृष्ण हरमलकर यांना भाजपने उमेदवारी दिली. ते दोघेही पक्ष संघटनेत कधी सक्रीय होते असा पक्ष कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. त्यातच वारखंड नागझरचे माजी सरपंच प्रदीप कांबळी यांच्यामागे तोरसेत माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर ताकद उभी करू शकतात. यामुळे भाजपला येथे निवडणूक सोपी नसेल असे चित्र आहे.

लाटंबार्सेतही आव्हान

लाटंबार्से मतदारसंघात भाजपचे पद्माकर मळीक विरोधात इतर सर्व पक्षांचे मेघश्याम राऊत असा सामना आहे. या मतदारसंघातून आमदार चंद्रकांत शेटये यांचे बंधू संजय ऊर्फ शरद हे निवडणूक लढवण्यास इच्छूक होते.

कासारपाल येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेतही दिले होते. संजय यांनी याआधी भाजपच्या शिल्पा नाईक यांचा पराभव केला होता. भाजपच्या ऋती घाटवळ यांनाही तसाच अनुभव आला होता. त्यामुळे आता भाजपला सर्वांना एकत्र आणण्याचे या मतदारसंघात आव्हान आहे. विशेषतः तुळशीदास गावकर यांची भूमिका काय असेल यावर बरेच काही अवलंबून असेल.

जिल्हा पंचायत निवडणूक

पाळी मतदारसंघात सुंदर नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याआधी सध्याचे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी आपण निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर का केले की त्यांना तसे करण्यासाठी स्वकीयांनीच परिस्थिती निर्माण केली याची दबकी का होईना चर्चा सुरू आहे.

सुर्लकर हे भाजप मंडळ अध्यक्ष होते, हे विशेष. सावर्डे मतदारसंघात भाजपने मोहन गावकर यांना उमेदवारी दिल्यानंतर ॲड. आतीश गावकर यांनी अपक्ष वाटचाल करण्याचा पवित्रा घेतला आहे. ते रमाकांत गावकर यांचे पुतणे आहे. त्यांचे घराणे भाजपचे कार्यकर्ते म्हणून स्थानिक पातळीवर ओळखले जात असल्याने त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

धारबांदोडा मतदारसंघात भाजपने रुपेश देसाई यांना उमेदवारी दिल्यानंतर सध्याचे भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर यांनी अपक्ष लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. खोर्ली मतदारसंघात सूरज फातर्फेकर हे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या समर्थनाने निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.

मयेत मतदारसंघात गुंतागुत

मये मतदारसंघात चोडण माडेल, शिरगाव, मये वायंगणी व नार्वे हे पंचायत क्षेत्र येते. मयेच्या माजी सरपंच कुंदा मांद्रेकर यांना भाजपने तेथे उमेदवारी दिली आहे. तेथे दोन वेळा निवडून आलेले शंकर चोडणकर आरक्षणामुळे स्‍पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. सध्याचे आमदार प्रेमेंद्र शेट हे २०२० मध्ये चोडणकर यांच्याकडून जिल्हा पंचायत निवडणूक अपक्ष म्हणून पराभूत झाले होते. या मतदारसंघात भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर यांना उमेदवारी मिळेल, असे भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते. त्यामुळे ही सारी गुंतागुंत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते अशी चर्चा आहे.

मी माझे समर्थक, कार्यकर्ते, यांची खास सभा उद्या, (ता.४) दुपारी ४ वाजता वझरी येथे बोलावली आहे. सभेत जिल्हा पंचायत उमेदवार व रूपरेषा ठरवण्यात येणार असून सभेस चांदेल हसापूरचे माजी सरपंच तुळशीदास गवस, धारगळ सरपंच अर्जुन कानोळकर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आम्ही पुढची दिशा ठरवू,

- बाबू आजगावकर, माजी उपमुख्यमंत्री

नवे चेहरे देताना काही नाराज होणे स्वाभाविक आहे. भाजपचा कार्यकर्ता हा विचारांशी बांधील असल्याने तो पक्षविरोधी कारवाया करणार नाही. काहींना सत्तेसाठीच पक्ष हवा असतो ते पक्षातून जातात, विरोधात कारवाया करतात. तरीही पक्ष शिस्तीची चौकट कोणी ओलांडणार नाही, ओलांडणारे भाजपच्या विचारांसोबत नव्हते.

-दामोदर नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar Advance Booking: रणवीर सिंहचा 'धुरंधर' रिलीजपूर्वीच हिट? एक दिवस आधीच कमावले 5 कोटी

Goa ZP Election: 'युती काबार'? काँग्रेसच्या 'फसवणुकी'ला आरजीपीचे प्रत्युत्तर; जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Goa Live News: भाजपकडून झेडपी निवडणुकीसाठी आणखी 2 उमेदवारांची नावे जाहीर!

Goa Politics: खरी कुजबुज; दक्षिणेची सून उत्तरेची 'झेडपी' उमेदवार!

Virat Kohli Dance Video: पराभवानंतर विराट कोहलीचा नागिन डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT