पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा स्वतंत्र भारतातील काँग्रेसविरहित सरकार स्थापन करणारा पहिला प्रादेशिक पक्ष होता. बहुजन समाजाचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मगोला आज ढवळीकर बंधूंनी राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधून केवळ मंत्रिपद टिकविण्यावर भर दिला आहे, अशी टीका राजकीय विश्लेषक प्रा. युगांक नाईक यांनी केली.
गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात नाईक बोलत होते. या चर्चेत मडकईतील ‘आरजी’ पक्षाचे नेते प्रेमानंद गावडे यांनीही सहभाग घेतला होता. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.युगांक नाईक म्हणाले की, मगो पक्षात ढवळीकर बंधूंचा प्रभाव वाढल्यानंतर या पक्षाची अधोगती सुरू झाली. पक्ष वाढविण्यासाठी ना विद्यार्थी संघटना उभारली गेली, ना युवा संघटना. प्रादेशिक प्रश्नांवर आंदोलनही झाले नाही.
मगोची अवस्था आता मडकईपुरत्या मर्यादित पक्षासारखी झाली आहे. मगोचे संस्थापक भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा यासाठीही कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. ज्या पक्षाने गावोगावी शाळा उभारल्या, त्याच पक्षाशी संबंधित शैक्षणिक संस्थांची आज दुरवस्था झाली आहे, असेही नाईक यांनी नमूद केले. प्रेमानंद गावडे यांनीही मगोच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे ‘आरजी’ आणि ‘आप’ या पक्षांवर राष्ट्रीय पक्षांचे आरोप करतात; मात्र राष्ट्रीय पक्षांशी जवळीक वाढविण्याचे काम स्वतः ढवळीकरांनीच केले आहे, असेही ते म्हणाले. मडकई मतदारसंघात आजही बेरोजगारी, गरिबी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत गावडे म्हणाले की, बहुजन समाजातील युवक रोजगाराअभावी व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. निवडणुकीच्या काळात पैसे वाटणे आणि मतदारांना लाचार करणे एवढेच राजकारण सुरू आहे.
प्रा. नाईक यांनी २०२७ च्या निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले. मगो पक्ष आता पुरोगामी नसून प्रतिगामी विचारांचा झाला आहे. ग्रामीण आणि मागासवर्गीय समाजाचे नुकसान होत ,असल्याने मतदारांनी बदल घडवावा, असे ते म्हणाले. मडकईतील पारंपरिक मतदारांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, आजही काही मतदार मगोच्या सिंह चिन्हावर विश्वास ठेवून मतदान करतात. भाऊसाहेब बांदोडकरांमुळे बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली, याची जाणीव त्यांना आहे.
ढवळीकर बंधूंच्या प्रभावानंतर मगो पक्षाची प्रादेशिक ओळख कमकुवत झाली. विद्यार्थी व युवा संघटना उभारण्यात अपयश आले. प्रादेशिक प्रश्नांवर आंदोलनही झाले नाही, अशी टीका प्रा. युगांक नाईक यांनी केली.
मडकई मतदारसंघात बेरोजगारी, गरिबी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप प्रेमानंद गावडे यांनी केला. रोजगाराअभावी युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांनी विचारपूर्वक मतदान करत बदल घडविणे गरजेचे आहे. आज रस्त्यावर मोठे अपघात होतात त्याला जबाबदार कोण? लोक कुणाला शाप देत असतील याचा विचार ढवळीकरांनी करावा, असेही गावडे यांनी सांगितले. असेही ते म्हणाले.
भाऊसाहेब बांदोडकरांमुळे बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे आजही अनेक मतदार मगोच्या ‘सिंह’ चिन्हावर विश्वास ठेवून मतदान करतात. अशा प्रामाणिक मतदारांची संख्या मडकईत सुमारे अडीच हजारांच्या आसपास आहे. असे प्रा. युगांक नाईक यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.