Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची फोंड्यातही ‘क्रेझ’?

Khari Kujbuj Political Satire: परवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस साखळीत थाटात साजरा झाला. वाढदिवस सोहळ्याला गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

विक्रमसाहेब इन फॉर्म!

कोलवा पोलिस ठाण्याचे पीआय विक्रम नाईक यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. ऑनलाइन जुगार तसेच आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश त्यांनी केला आहे. कोलवा येथील चर्चमधे घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे मध्यंतरी ते गोत्यात आले होते. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक राखीव पोलिस दलात त्यांना पाठवून देण्यात आले होते. मात्र मागाहून या घटनेशी त्यांचा संबंध नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना पुन्हा एकदा कोलवा पोलिस ठाण्यात पाठवून देण्यात आले होते. त्यावेळी काहीजणांनी त्यास आक्षेपही घेतला होता. आता या विरोधकांची बोलती बंद झाली आहे. कारण विक्रम सायबाने कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा लावलेला सोक्षमोक्ष. त्यांच्या हाताखाली काम करणारे पोलिस आपल्या सायबांचे गुणगाण करताना थकत नाही बरं का? ∙∙∙

‘गोंयचो सायब’ प्रकरणात आरजी गप्‍प का?

आम्‍ही गोवेकरांचा खरा पक्ष, असा दावा आरजी पक्षाने नेहमीच केला आहे. गोव्‍याचे भवितव्‍य आम्‍हीच घडवू शकतो, अशी हाक दिल्‍याने गोव्‍यातील मतदारांनी मागच्‍या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला बऱ्यापैकी पाठिंबा दिला होता एवढेच नव्‍हे तर युके आणि स्‍विंडनमध्‍ये असलेल्‍या गोवेकरांनीही या पक्षाला उचलून डाेक्‍यावर घेतले होते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सध्‍या ‘गोंयच्या सायबा’चा अपमान केल्‍याबद्दल वेगवेगळे पक्ष निषेधासाठी रस्‍त्‍यावर उतरले असताना आरजी पक्षाने यावर कुठलीही भूमिका घेतलेली दिसत नाही. राजकीय विश्‍लेषक राधाराव ग्रासियस यांनीही यावर बोट ठेवत आरजी याबद्दल गप्‍प का? हे आता गोवेकरांना कुणी सांगू शकतील का? असा प्रश्‍न केला आहे. यावर आरजीचे उत्तर काय येणार ते पहावे लागेल. ∙∙∙

रामभरोसे पोलिस ठाणे...

सध्या पोलिस स्टेशनचा कारभार म्हणजे ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ असा झालाय. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सगळा भार स्थानकातील मूठभर बिचाऱ्या हवालदारांच्या खांद्यावर येऊन पडलाय, पण कौतुक मात्र दूरच! रात्रीच्या वेळी तर वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक महाशय एसएचओ रूमची पायरी चढायलाही घाबरतात, जणू काही तिथे गेल्यावर त्यांची शान कमी होईल; ही मंडळी बरॅक मध्ये गाढ झोपी जातात किंवा इतरत्र गायब असतात. त्यामुळे हवालदारांनाच बिचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून अख्खं स्टेशन निस्तरावे लागते. दुसरीकडे, काही पोलिस निरीक्षकांना तर जगाचे सोयरसुतकच नाही. विशेषतः उत्तर गोवा भागातले हे निरीक्षक साहेब मंडळी म्हणजे केवळ राजकीय वरदहस्ताचे पुतळे आहेत, ज्यांना खालच्या कर्मचाऱ्यांशी बोलणेही कमीपणाचे वाटते. खरे तर, यातील काही जणांना पोलिस स्टेशन कसे चालवायचे, याचा ‘श्रीगणेशा’ शिकवण्याचीच वेळ आली आहे! आज जर ही यंत्रणा कशीबशी श्वास घेत असेल, तर ती फक्त त्या काही मूठभर प्रामाणिक आणि समर्पित पोलिसांमुळेच; बाकी सगळा कारभार तर केवळ रामभरोसे सुरू आहे! याकडे पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का, हेच मोठे कोडे बनले आहे.. ∙∙∙

असाही त्यांचा पवित्र धंदा

प्रवेशावेळी माहितीपत्रकासाठी काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी वारेमाप शुल्क आकारल्याचे ‘अभाविप’ ने शिक्षण खात्याच्या निदर्शनात आणले. शिक्षण क्षेत्रात काही उच्चभ्रू म्हणवणाऱ्या शाळा-कॉलेजांनी कशी लुबाडणूक-सतावणूक चालू केल्याचे त्यातून उघडकीस आले. गंमत म्हणजे ही बहुतांश महाविद्यालये सरकारकडून संपूर्ण निधी मिळवत असतात. त्याशिवाय विद्यार्थ्यांकडून ती शुल्कही आकारत असतात. नवे वर्ग सुरू करताना आम्ही विद्यादानाचे किती पवित्र कार्य करतोय, याचाही ते आव आणीत असतात. परंतु प्रत्यक्षात शिक्षणाच्या नावे त्यांनी धंदाच सुरू केला आहे. या शिक्षण संस्था समाजात प्रतिष्ठेने मिरवणारे काही उद्योगपतीच चालवत असतात. हे अलग सांगणे न लगे! ∙∙∙

फोंड्याचे मतदार अन् पोटनिवडणूक

फोंड्यात विधानसभा पोटनिवडणूक व्हायची होती. अगोदरच्या दिवशी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ती रद्द झाली. तदनंतर कॉंग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज केला. ८ मे रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टात काय होईल आणि काय नाही, याचे अंदाज वर्तवता येत नाहीत. फोंड्यातील मतदार नाराज झाले हे नक्की. कारण सगळी तयारी झाली होती. प्रचार उन्हातान्हातून झाला होता. परंतु ‘आले हायकोर्टाच्या मना, तेथे कुणाचेही चालेना’. आता देशाच्या मुख्य सर्वोच्च न्यायालयात ८ तारखेला काय होणार, याकडे फोंड्यातील मतदार उत्कंठेने नजर लावून आहेत. ∙∙∙

आठवण पहिल्‍या शालान्त परीक्षा निकालाची

१९७५ मध्‍ये गोवा शालान्त मंडळ स्‍थापन होऊन १९७६ मध्‍ये या मंडळाची पहिली दहावीची परीक्षा झाली. या पहिल्‍या परीक्षेचा एकूण निकाल ३४ टक्‍के लागला होता. सध्‍या गोव्‍यात दहावीच्‍या परीक्षेचा निकाल ९४.५१ टक्‍के लागलेला असताना हा पहिला निकाल पाहता त्‍यावेळच्‍या परीक्षांची माहिती कुणालाही मिळू शकेल. या पहिल्‍या परीक्षेत दोनापावलाची जस्‍मिना देसाई ही पहिली आली होती. ७ जून १९७६ या दिवशी ‘दै. गोमन्‍तक’ने पहिल्‍या पानावर ही ८ कॉलमची बातमी प्रसिद्ध केली होती. ५० वर्षांनी हा निकाल आता चर्चेचा विषय बनला असून ‘गोमन्‍तक’ची ही बातमी सध्‍या सर्वत्र व्‍हायरल होत आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची फोंड्यातही ‘क्रेझ’?

परवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस साखळीत थाटात साजरा झाला. वाढदिवस सोहळ्याला गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यात फोंड्याच्याही अनेक लोकांचा भरणा होता. रद्द झालेल्या फोंडा पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फोंडावासीयांबरोबर जी एक बांधिलकी निर्माण केली त्याचे हे फळ असल्याची चर्चा वाढदिवस सोहळ्याच्या ठिकाणी सुरू होती. नाही तरी सध्या मुख्यमंत्र्यांची ‘क्रेझ’ विस्तारत चालल्याचे अनुभवायला येत आहेच. खास करून इंडियन एक्सप्रेस समूहाने जनचाचणी करून निवडलेल्या देशाच्या ‘टॉप१००’ व्यक्तींमध्ये मुख्यमंत्र्यांचा ६३ वा क्रमांक लागल्यापासून तर त्यांच्या लोकप्रियतेचा वेलू गगनावेरी चढल्या सारखा वाटू लागला आहे. आता ही त्यांची लोकप्रियता किती ‘कॅश’ होते, हे २०२७ साली कळेलच. पण सध्या तरी मुख्यमंत्र्यांबाबत ‘जलने वाले जला करे, किस्मत हमारे साथ है’ अशीच स्थिती दिसत आहे एवढे खरे. ∙∙∙

कुंकळ्ळीत उपोषणाची आवई?

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच आमदार क्रुझ सिल्वा यांना पणजी पोलिसांनी समन्स पाठवून सोमवारी चौकशीला बोलावले होते. युरी आलेमाव यांना आलेल्या समन्सला प्रसिद्धी भरपूर मिळाली. दुपारी ४ वा. युरीबाब पोलिस स्थानकावर पोहोचले व पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘डरो मत’ या राहुल गांधींच्या घोषणेचा वापर केला. आपणास विधानसभा अधिवेशनाचे समन्स आले, असे वाटल्याचे युरी म्हणाले. यापूर्वी युरींनी प्रसंगी उपोषणाला बसणार, गोंयकारांसाठी विष घेणार, गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार, अशा घोषणा केल्यात. विरोधी पक्षनेते कलम ‘३९-अ’ रद्द साठी तसेच न्या. रिबेलो यांचे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी करून लवकरच उपोषणाला बसणार अशी आवई म्हणे पणजीतून कुंकळ्ळीत युरी पोहोचल्यानंतर उठली आहे. ∙∙∙

बिचारे फायर फायटर्स...

सुक्याबरोबर ओलेही जळते, अशी म्हण आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा-पुन्हा मडगाव अग्निशामक दलाचे जवान घेत आहेत. या दिवसांत खुल्या जागेत वाढलेल्या गवताला आगी लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कुणीतरी आग लावतो व नंतर ती आटोक्यात येत नसल्याने मागाहून अग्निशामक दलाच्या कार्यालयात कॉल करतो. दलाचे जवान लागलीच घटनास्थळी धावही घेतात अनेकदा ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग विझविली गेलेली असते. बिचारे जवान पुन्हा आपले कार्यालय गाठतात. हल्लीच्या दिवसांत अशा घटना नेहमीच घडू लागल्याने हे जवानही वैतागलेत. मात्र, सरकारी कर्मचारी असल्याने ते उघडपणे काही बोलत नाहीत. तरीही अनेकांकडे आपली व्यथा बोलूनही दाखवितात. ∙∙∙

विकासाची मशाल

झाडे जाळून विकासाची मशाल पेटवण्याचा नवा ‘उद्योग’ सुरू झालाय की काय, असा प्रश्न आता पडू लागलाय! पोंबुर्फा येथील खासगी जंगलात तब्बल ३५ हजार चौरस मीटर परिसर राख करून टाकल्यानंतर वन खात्याला अखेर ‘पुरवणी एफआयआर’ दाखल करावा लागला आहे. म्हणजे आधी काय झोप घेतली होती का? मालकांची नावंही समोर आलीत, गुन्हा ‘वृक्ष संवर्धन कायदा १९८४’ अंतर्गत नोंदवलाय, आणि म्हणे सगळं पडताळून आधीच्या २३ एप्रिलच्या प्रकरणाशी लिंकही लावलीय! कागदोपत्री चक्रे भन्नाट वेगाने फिरतायत, पण जळालेल्या झाडांना न्याय मिळायला अजून किती फेऱ्या माराव्या लागणार की, शेवटी फक्त फाइल्सच हिरव्यागार राहणार आणि जंगल राखेतच? ∙∙∙

अभिजात कलेचं भान

नृत्य, नाट्य, संगीत या सर्व कला एकमेकींशी घट्ट चिकटल्या आहेत. आतून जोडलेल्या आहेत. महाप्रतापी दिग्दर्शकांनी याची समज अंगिकारायला पाहिजे. गोव्यात हल्लीच ‘संभवामी युगे युगे’ ही नृत्य नाटिका नर्तिका व टीव्ही अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि साथी कलाकारांनी सादर केली. कृष्णचरित्राच्या कथेवर आधारीत ही कलाकृती उत्तम होती. संस्कृतीने अभिनयाची, नृत्याची चुणूक दाखवली. हे कलात्मक आयाम अनुभवल्याशिवाय कळणं कठीण. नाट्य कलाकार सोडा, नृत्य कलाकार सुध्दा मोठ्या प्रमाणात ही नाटिका पाहायला फिरकलेले दिसले नाहीत. कला जगतातील स्पंदनं जाणून घ्यायला आपण अद्ययावत असायला हवं, नवे सृजनाविष्कार विचारांना चालना देतात, मला सर्व कळतं हा खुळचटपणाचा अहंकार आपल्यालाच नडतो हे झापडबंद वृत्तीच्या कलाकारांना दिग्दर्शकांना कळेल व सुधारेल, तो सोनियाचा दिस ठरेल. ∙∙∙

‘लॉग टेबल’ अन् ‘प्रॉस्पेक्टस’

एका लेखकाच्या आत्मचरित्रातील प्रसंग. तो शहरात, वसतीगृहात राहून कॉलेजात विज्ञान शाखेत शिकत असतो. आईवडील गांवात. काही तरी निमित्त करून हे, ते खरेदी करायचे आहे, असे सांगून तो घरी कळवत असे. लगेच मनीऑर्डर येत असे. एकदा त्यानं पत्र लिहिलं – लॉग टेबल नांवाचं एक मोठ्ठं टेबल प्रत्येकाला खरेदी करायला सांगितलं आहे. शंभर रूपये पाठवा. लॉग टेबल म्हणजे गणितातील कोष्टकाची १२ पानांची पुस्तिका. किंमत तेव्हा दोन रूपये होती. वडिलांनी तात्काळ पैसे पाठवले. पठ्ठ्याने मित्रांना घेऊन ८ दिवस यथेच्छ मजा मारली. कॉलेज प्रवेशावेळी प्रॉस्पेक्टस (माहितीपुस्तिका) भरमसाठ किंमतीत विकतात त्याला विद्यार्थी संघटनांनी काल विरोध केला. तेव्हा लॉग टेबलची रणनीती आठवली. ऑनलाईन माहिती, फॉर्म सगळे देणं शक्य आहे. देणग्यांतून पैसे उकळून झालेच आता प्रॉस्पेक्टसवरून भरमसाठ शुल्क आकारून पालक विद्यार्थी यांना ठकवण्याच्या इराद्याला विरोध होत आहे, तो गैर नव्हे. ∙∙∙

मान्सूनपूर्व कामाचा त्रास

पणजीत ‘प्री-मान्सून’ कामांचा शुभारंभ म्हणजे नेहमीसारखंच—पहिले खड्डे खणायचे, मग तेच कचऱ्याने भरायचे आणि शेवटी त्याला ‘तयारी’ म्हणायची! ने पार्किंगची जागा लोकांसाठी नाही तर कचऱ्यासाठी राखीव ठेवण्याचा नवा शहरी विकास मॉडेलच आणलाय बहुतेक. नागरिक गाड्या कुठे लावायच्या हा प्रश्न विचारतायत, आणि प्रशासन ‘कचरा तरी व्यवस्थित साठतोय ना?’ यातच समाधान मानतंय. पावसाआधी नाले साफ करण्याऐवजी पार्किंग साफ केलं, तेही कचऱ्याने भरून, ही कल्पकता कुठल्या प्लॅनिंग स्कूलमध्ये शिकवतात, हेच कोडं! शेवटी पावसात रस्ते तुंबले, गाड्या अडकल्या की दोष मात्र निसर्गावर टाकायला तयार, कारण आपल्या नियोजनात काहीच चूक नसते, फक्त नागरिकच जरा जास्त प्रश्न विचारतात! ∙∙∙

काँग्रेसवाल्यांचा लवाजमा!

पणजी पोलिस स्थानकावर सोमवारी केवळ चौकशीसाठी हजर राहण्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना औपचारीक समन्स पोलिसांनी पाठवले, अन् युरी आलेमाव हे महिला कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खलप, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अर्चित नाईक व इतर काही ज्युनियर वकीलांचा ताफाच घेऊन पोलिस स्थानकावर आले. परंतु, काँग्रेसचे आमदार तसेच निष्णात वकील ॲड. कार्लुस फेरेरा त्यांच्यासोबत नव्हते. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख वगैरे मंडळीसुद्धा दिसली नाहीत. कदाचित पोलिस स्थानकात आलेलीच मंडळी हे प्रकरण हाताळू शकतात, असे दिसल्यानेच सगळे वरिष्ठ गैरहजर राहिल्याची चर्चा होती. त्यातच कुणीतरी यापूर्वी आम्हाला पक्षाचे आंदोलन केल्यावर अटक झाली, त्यावेळी युरी आलेमाव कुठे आले होते? असे सहज मार्मिक बोलून गेले. ∙∙∙

मतदारसंघातील कचरा इंदिरानगरात?

सांताक्रूझ मतदारसंघातील सांताक्रूझ, मेरशी आणि चिंबल या तीन पंचायत क्षेत्रातील कचरा म्हणे इंदिरानगरातील ‘एमआरएफ शेड’मध्ये आणून टाकला जातो, अशी तक्रार येथील ग्रामस्थांची आहे. त्यामुळे इंदिरानगरातील ‘एमआरएफ शेड’मधील कचरा वेळोवेळी उचलला जात नाही आणि पर्यायी शेडच्या बाहेर कचऱ्याच्या राशी लागतात. भटक्या गुरांमुळे हा कचरा रस्त्यापर्यंत येतो आणि येथील कचऱ्याची ही समस्या कायम आहे. सांताक्रूझ, मेरशी पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्या बिकट आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. पणजी शहराला लागून असलेल्या या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सुटला असता तो बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्प झाला असता, तर पण या प्रकल्पाची गरज या पंचायतींना का भासत नाही, याचा कदाचित इंदिरानगरात डंप केल्या जाणाऱ्या कचऱ्यावरून अंदाज बांधता येतो. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: सावधान गोमंतकीयांनो! तीन महिन्यांत 1030 जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात; मार्चपर्यंत तब्बल 25 कोटींचा गंडा

Goa Jail Administration Report: 'राज्यातील कारागृहांच्या स्थितीचा सविस्तर अहवाल द्या', गोवा खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश; ‘सर्वोच्च’ निकालाची दखल

Goa Politics: ‘आरजीपी’तील अंतर्गत वादाबाबत आमदार बोरकरांची अप्रत्यक्ष पुष्‍टी; आल्‍मेदांवर कारवाईवर चर्चा सुरु असल्‍याचेही केले स्‍पष्‍ट

Haath Kaatro Khamb History: "लोकांचे हात कापले जायचे, याचे पुरावे कुठे?" फेरेरांच्या सवालाने 'हात कातरो' खांबाचा वाद विकोपाला; पुराव्यांच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड?

Mandovi River Casino: मांडवीतील कॅसिनोंचे भवितव्य टांगणीला! 'इनफ इज इनफ'च्या याचिकेवर हायकोर्टात जोरदार खडाजंगी; सरकारचा आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT