

विरोधी आमदार आहेत कुठे?
गोव्यात सध्या विविध विषयांवरून धरणे-आंदोलने सुरू आहेत. स्मार्ट मीटर, जमीन विक्री, डोंगर कापणी, रेल्वे दुपदरीकरण आणि अगदी महत्त्वाचे म्हणजे नगर नियोजन खात्याचे कलम ‘३९ ए’ रद्द करण्याची मागणी. मागच्या विधानसभा अधिवेशनात विधेयके दाखल झाली नाहीत, म्हणून विरोधी पक्षनेत्यासह इतर सहा आमदारांनी आकडतांडव केले. परंतु, फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर अर्ध्यावर तहकूब केलेले विधानसभा अधिवेशनाचे सत्र परत बोलवा, अशी मागणी निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी केल्यानंतरच विरोधी आमदारांना जाग आली. आता एकही विरोधी आमदार कुठे धरणे-आंदोलनात दिसत नाही. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिरविणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र आमदारांच्या एकंदर वागणुकीबद्दल जनतेचा प्रश्नांचा भडीमार सोसावा लागतो, याची फिकीर आमदारांना अजिबात नाही. आम आदमी पक्षातही तशीच परिस्थिती आहे, असा एक ‘आप’वाला सांगत होता. ∙∙∙
मुख्यमंत्र्यांचा फुटबॉलवर किक!
हल्लीच्या काळात सत्ताधारी व विरोधी पक्षांचे आमदार किंवा नेते एकमेकांच्या कार्यक्रमाला सुद्धा जाताना दिसत नाही, त्यातून भलतेच काही निष्पन्न होईल, असे त्यांना वाटत असावे. मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते युरीबाबच्या कुंकळ्ळी मतदारसंघात गेले. तिथे त्यांनी फुटसाल मैदानाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसमवेत युरीबाब व आमदार एल्टन डिकॉस्ता सुद्धा होते. एरव्ही विधानसभेत एकमेकावर तावातावाने आरोप-प्रत्यारोप करणारे हे तिघेही व्यासपीठावर जणू घनिष्ठ मित्र असल्यासारखे वावरताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांनी फुटबॉलवर किक मारून गोल करून फुटसाल मैदानाचे उद्घाटन केले. हा मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधी पक्ष नेत्यावर मारलेला तर गोल नसावा ना? अशी चर्चा लगेच सुरु झाली.
बाबा नेमके काय म्हणाले?
दिगंबर कामत हे भाजपमध्ये आल्यापासून सगळ्यांच्याच नजरा त्यांच्या वागण्यावर खिळून असतात. ते जे काय बोलतात, त्यांनाही भडक प्रसिध्दी मिळते, पण त्यात सत्य किती असते, त्याची शहानिशा केली जात नाही, असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. परवा त्यांनी फातोर्डा मतदारसंघात सक्रिय होण्याबद्दल जे काय विधान केले, त्याचेही असेच तर झालेले नाही ना? असेही ते म्हणत आहेत. पत्रकारांनी त्यांना विचारले होते, ते नगरपालिका निवडणुकीसंदर्भात पण त्यांनी जे काय सांगितले, ते विधानसभानिवडणुकीसंदर्भात अशी प्रसिध्दी दिली गेली असून त्यामुळे केवळ फातोर्ड्यातच नव्हे, तर मडगावातही जबरदस्त चर्चा सुरु झाली आहे. खरेच कामत पालिका निवडणुकीसाठी फातोर्डातील प्रभागात लक्ष घालतील का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.
...तोंडचा घास गेला ना!
''मेल्या म्हशीला बारा शेर दूध’ अशी एक म्हण आहे. फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली आणि अफवांचे पीक आले. कोण म्हणाले, हे सत्ताधारी भाजपाने केले. कोण म्हणाले, भाजप उमेदवार पडणार म्हणून हे कटकारस्थान. जेवढी तोंडे तेवढ्या उवाच. पण एक मात्र खरे हं. फोंड्यात भाजपला अनुकूल वातावरण होते, असे राजकीय निरीक्षकच म्हणतात. कारण निवडणूक रद्द झाल्यानंतर त्यासंबंधी बोलताना भाजप नेत्यांचे चेहरे पडले होते. तोंडचा घास गेला ना!
पण लक्षात कोण घेतो?
अहो, वाहतूक पोलिस म्हणजे कोण? रस्त्यावर उभा असलेला सजग प्रहरी की मोबाईलवर बोटं चालवणारा निरीक्षक? हा प्रश्न आता अनेकांच्या मनात डोकावतो आहे. नाकाबंदी असते, पण तपासणी नाही. मग दुसऱ्या राज्यात गेल्यावरच अवैध गोष्टी उघड होतात. मग या नाक्यांचा उपयोग काय? फक्त उभं राहण्यासाठी का? वाहतूक पोलिसांचे काम रस्ता सुरळीत ठेवणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे हे आहे. पण काही ठिकाणी ते नियंत्रणाऐवजी दंड वसुलीत किंवा मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रश्न उभा राहतो. यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? सर्वच पोलिस असे नसले तरी, जिथे त्रुटी आहेत, तिथे सुधारणा करायला हवी, पण लक्षात कोण घेतो?
दिगंबर फातोर्ड्यात जाणार?
जस जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे राजकारणी एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न करीत असतात. हल्लीच आमदार विजय सरदेसाई यांनी आपण यावेळी नगरपालिका निवडणुकीत मडगावमध्येसुद्धा लक्ष घालणार असे जाहीर केले होते. आता दिगंबर कामत यांनी एका मुलाखतीत पक्षाने आदेश दिला तर फातोर्डातही लक्ष घालणार असे सांगितले. फातोर्डात एरव्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आहेतच की, मग भाजपला तिथे दिगंबरची गरज भासणार का? असा प्रश्न कोणाच्याही मनात आला तर त्यात गैर ते काय? शिवाय विजयला शह देण्यासाठी दिगंबरबाबांनी असे विधान केले असावे, अशी चर्चा सुद्धा सुरु झाली आहे. विजयने मडगावमध्ये आपले उमेदवार ठेवले, तर दिगंबरना फातोर्डात जायला वेळ तरी मिळेल का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोच की, निवडणुका जाहीर झाल्याशिवाय कोण कुठे जाईल? हे आताच सांगणे कठीण आहे.
युरी समर्थक माजी नगरसेवक गायब?
राजकारणात रुसवे फुगवे ठेवणे योग्य नाही. राजकारणात टिकून राहायचे असेल तर सातत्याने सक्रिय असायलाच लागते. कुंकळ्ळी नगरपालिकेच्या विद्यमान मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. परवा कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांच्या विकासकामांचा मोठा धडाकेबाज बाज कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. मतदारसंघातील सर्व पंचायतीचे सरपंच, पाच सदस्य व हल्लीच कार्यकाळ संपलेल्या नगरसेवकांना व नगराध्यक्षांना आमंत्रित केले होते. सर्वांना व्यासपीठावरून पुकारण्यात ही आले होते. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवक या कार्यक्रमाला दिसले नाही. भाजपचे दोन नगरसेवक सोडल्यास इतर नगराध्यक्षांसह इतर अकरा नगरसेवक एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. महत्वाचे म्हणजे युरी समर्थक नगरसेवकांची अनुपस्थिती डोळ्यांत भरण्यासारखी होती.
मंत्र्याच्या अनुपस्थितीचे कारण काय?
परवा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्र्याच्या हस्ते आठ मोठ्या विकास कामांचा शुभारंभ करून मोठा धमाका केला. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत व गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो उपस्थित राहणार होते. निमंत्रण पत्रिकेवर त्यांची नावेही होती. मात्र मुख्यमंत्री सोडल्यास कामत, राणे व लोबो या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. आता त्यांच्या अनुपस्थितीवरून या भागात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. एल्विस गोम्स, सॅमी तावारीस व जॉर्सन फर्नांडिस यांनी या कार्यक्रमापूर्वी राणे यांनी ३९ अ कलम रद्द करूनच कुंकळ्ळीत पाय ठेवावा, असा इशारा दिला होता. त्यामुळे राणे उपस्थित राहिले नाहीत का? दिगंबर व मायकल यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात उपस्थित राहण्यात कदाचित अपराधिक वाटले म्हणून ते उपस्थित राहिले नसावे, अशी चर्चा काँग्रेस समर्थकात सुरू आहे.
एल्टन खरी कुजबुजवर फिदा!
गोव्यात आजही मराठी-कोकणी, रोमी कोकणी वाद तेवढ्याच जिद्दीने व आक्रमकपणे चालू आहे. रोमी कोकणी समर्थक मराठी वर्तमान पत्रे अभावानेच वाचत असणार. मात्र येथील राजकारण्यांना खरी कुजबुज वाचल्याशिवाय चैन पडत नाही, हे सत्य आहे. सगळे आमदार व मंत्री खरी कुजबुज आवडीने वाचतात किंवा वाचून घेतात आणि कुजबुजची दाखलही घेतात. परवा कुंकळ्ळीत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात बोलताना आमदार युरी आलेमाव यांनी आपल्या भाषणात खरी कुजबुजचा उल्लेख केला. ‘युरी व एल्टनवर मुख्यमंत्री फिदा’ ही कुजबुज छापून आली होती. आपल्यावर व युरी आलेमाव यांच्यावर मुख्यमंत्री फिदा आहेत, याची याबाबत चर्चेला ऊत आला आहे, हे सांगण्यात एल्टन विसरले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.