

गोव्याला मिळणार १५ महिला आमदार?
माणसाने आशावादी असायला हवे. देशात महिलांना राजकीय आरक्षण लागू झाल्यास वर्षे संपली. मात्र, हे आरक्षण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतेच मर्यादित होते. आता महिलांना लोकसभेत व राज्य विधानसभेत ३३ टक्के आरक्षण लागू होण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभेच्या जागा ५४३ वरून साडे आठशे होण्याचे संकेत मिळताहेत. गोवा विधानसभेच्या पाच जागा वाढवून ४५ होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. गोवा विधानसभेच्या जागा ४५ झाल्या आणि ३३ टक्के आरक्षण लागू झाले तर गोव्याला १५ महिला आमदार मिळतील. कदाचित कै. शशिकला काकोडकर नंतर आपल्याला दुसरी महिला मुख्यमंत्रीही मिळू शकते. मुख्यमंत्र्यांनी आपली जागाही महिलांसाठी सोडण्याची तयारी असल्याचे संकेत दिलेत. असे झाले तर स्वतःच्या हिमतीवर राजकारणात स्थान मिळविलेल्या महिलाच आमदार बनायला हव्यात. जर घराणेशाहीने पतीच्या कामावर महिला आमदार बनल्या तर त्या आरक्षणाला अर्थ राहणार नाही!
पालेकरांचा ‘प्रॅंक’
कॉंग्रेस पक्षात नव्यानेच दाखल झालेले ‘आप’चे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचा कॉंग्रेसचे संघटन सचिव के.सी.वेणूगोपाल व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा एक फोटो आज डिजिटल मीडियात प्रसिद्ध झाला अन् बहुतेकांचा समज झाला की अमित पालेकर काल परवाच दिल्लीत जाऊन हायकमांडला भेटले. परंतु, कॉंग्रेस भवनात आज सदर फोटोवरून एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली. सदर फोटो म्हणे अमित पालेकरांचा कॉंग्रेस प्रवेश होण्यापूर्वीचा होता. आता, अमित पालेकरही प्रॅंक करायला लागलेत, अशी चर्चा आज कॉंग्रेस भवनात ऐकायला मिळाली.
नवे धोरण पण शिक्षण?
तीव्र उष्ण तापमानात राज्यात शाळांचे काही वर्ग सद्या सुरू आहेत. हे सर्व नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे. गोव्याबाहेरील पीटी सर किंवा विज्ञान पदवीधर शिक्षकांना कोंकणी विषय शिकवण्याची अतिरीक्त जबाबदारी दिली जाते. काही भाषा शिक्षक वाक्प्रचार उच्चारायचे सोडून ‘वाक्यप्रचार’ म्हणतात, तसेच लिहितात शिकवतात. संपूर्ण गणित विषयांची पदवी नसलेले केमिस्ट्री पदवीधर गणित शिकवतात. त्यांना जरा कठीण प्रमेये मुलांनी विचारली तर ते गडबडतात. हिंदीचे काही नैमित्तिक शिक्षक शांति हा शब्द शांती असा लिहितात, तसाच शिकवतात. अवांतर सोडा, आपल्याच विषयाचं ज्ञान व सामान्य ज्ञान काही शिक्षक अद्ययावत ठेवत नाहीत. राज्यांतील ४०० शाळांत प्रयोगशाळा नाही. काही शाळांकडे डिजिटल वर्ग नाही. बर्ट्रांड रसेल यांचे शिक्षण विषयीचे विचार ‘ऑन एज्युकेशन’ या जगप्रसिध्द पुस्तकात आहेत. धोरणकर्ते, शिक्षक, पालक यांनी ते वाचले पाहिजेत. मणभर नसली तरी कणभर सुधारणा होईल.
गिरीशराव मतदारसंघ कोणता?
गिरीश चोडणकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत जो संकेत दिला आहे, त्यामुळे त्यांचे गोव्यातील चाहते नक्कीच खुश होणार आहेत. कारण गेली अनेक दशके गिरीशराव गोव्यातील राजकारणात सक्रिय आहेत, पण पक्ष संघटना सोडली तर कुठेच ते निवडून येऊ शकलेले नाहीत. पंचायतीवर किवा नगरपालिकेवरही त्यांना प्रतिनिधित्व करता आलेले नाही व त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांची ते कुठेतरी निवडून यावेत, अशी दुर्दम्य अशी अपेक्षा आहे, त्यामुळेच येत्या निवडणुकीत उतरण्याच्या त्यांच्या संकेतामुळे त्यांना आता आपली आशा फळाला येणार, असे वाटते आहे. नाही म्हणायला यापूर्वी गिरीशरावांनी एक दोनदा विधानसभा निवडणूक लढवूनही पाहिलीय, पण त्यांत ते विजयी होऊ शकलेले नाहीत. म्हणूनच आता त्यांना चांगली संधी असल्याचे ते म्हणतात. पण ते ठीक आहे, हो पण कोणत्या मतदारसंघात ते उभे राहतील, असा सवाल त्यांचे विरोधक मात्र विचारताना दिसताहेत.
मांद्रेच्या राजकारणात मैत्रीचा नवा अंक
मांद्रेच्या राजकारणात सध्या कलियुग संपून प्रेमयुग अवतरल्याचा भास होतोय. कालपर्यंत एकमेकांचे तोंडही न पाहणारे पार्सेकर सर अन् सोपटे साहेब आता एकाच व्यासपीठावर, वाढदिवसाच्या निमित्ताने गळाभेट घेताना दिसताहेत. पार्सेकर सरांनी आता मोठ्या मनाने जाहीर केले की, ‘अनिष्ट प्रवृत्तीला गाढायचे असेल, तर आम्हा दोघांपैकी एकानेच निवडणूक लढवायला हवी. पण पेच इथेच आहे, हा त्याग करणार कोण? ‘पहले आप,पहले आप’ म्हणता म्हणता निवडणुका जवळ येतील; पण सध्या तरी जो-तो स्वतःच्या खिशात भाजपचे तिकीट असल्यासारखाच मिरवतोय. एकीकडे सोपटे शर्यतीत आहेत, तर दुसरीकडे आरोलकर आपली वेगळीच ‘फिल्डिंग’ लावून बसलेत. अशात पार्सेकर सरांचे हे मैत्रीचे विधान म्हणजे खरोखरच हृदयपरिवर्तन आहे, की प्रतिस्पर्ध्याला प्रेमाने निवृत्त करण्याची एखादी राजकीय चाल? राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो. मात्र, मांद्रेत तर कट्टर शत्रूच आता एकमेकांचे ‘तारणहार’ बनू पाहताहेत. त्यांच्यातील कटूता खरोखरच ओसरलीय की, सत्तेसाठी ही जुनी भांडी घासून-पुसून स्वच्छ केली जाताहेत, हे उमेदवारी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल. तोवर जनतेने टाळ्या पिटायच्या अन् पाहायचे की, या मैत्रीच्या नाटकात शेवटच्या अंकात किंग कोण ठरतो अन् कोणाचा बळी दिला जातो!
धक्का नेमका कशाप्रकारचा?
फोंडा पोट निवडणूक रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजपच्या अन्य नेत्यांनी हा निकाल ऐकून आपल्याला धक्का बसला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. असे जरी असले तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व्यक्त केली आहे. यावर राजकीय विश्लेषक असलेले ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हाे यांनी भाजपला धक्का बसून सुद्धा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या निवाड्याला अजून आव्हान का दिले नाही, असा सवाल केला आहे. कदाचित ॲड. कुतिन्हो यांनी विचारलेल्या या प्रश्नातच उत्तर सामावलेले तर नाही ना?
खरेच अधिवेशन होणार?
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याने सगळेच त्या वेळी मध्येच तहकूब केलेले अधिवेशन पुन्हा बोलावण्याची मागणी सगळेच करताना दिसताहेत. दुसरीकडे सरकार म्हणजेच भाजपवाले, मात्र ते शक्य नसल्याचे सांगतात. त्यामुळे पुन्हा विधानसभा अधिवेशन बोलावून अपूर्ण राहिलेल्या विषयांवरील चर्चा होणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे व राज्यपालांची भूमिका सकारात्मक असल्याचे ते सांगताहेत. पण सरकारच्या शिफारशीखेरीज राज्यपाल असे अधिवेशन बोलावू शकतात का, असा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चिला जात असून त्यामुळे या विषयाला फाटे फुटू लागलेत. पण अर्थसंकल्प मंजूर झालेला असल्याने सरकार मात्र निर्धास्त आहे खरे.
फोंड्याचे घोंगडे भिजतच?
फोंड्याची पोट निवडणूक रद्द झाली अन् फोंडा गोव्यातच नव्हे तर देशात चर्चेत आला. पण फोंडावासीयांचे दुखणे वेगळेच आहे. त्यांनी गेले सहा महिने आमदाराविना काढलेले आहेत. पुढचे आठ महिनेही आमदाराविना काढावे लागणार हे जवळजवळ निश्चित आहे. रद्द झालेल्या पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर हे जरी सुप्रीम कोर्टात गेले तरी हाती काही लागेल, अशी अपेक्षा कोणाचीच नाही. त्यामुळे फोंड्याचे ‘घोंगडे भिजतच पडणार’ असे एकंदर चित्र सध्या तरी दिसतेय. हे पाहता फोंड्याच्या नागरिकांची अवस्था सध्या ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाल्यागत वाटतेय. तसा सूरही फोंड्यात ऐकू येतोय.ज्याचे जळते त्यालाच कळते, हेच शेवटी खरे. यामुळे रद्द झालेल्या पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री ‘औट घटकेचा का होईना, पण फोंड्याला ‘नायक’ मिळवून देतात का, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.
कॅप्टनची सायकल सवारी
एकेकाळी जहाजावर कॅप्टन असलेले आणि कित्येकदा वादळी वाऱ्यातही जहाजाचे सुकाणू व्यवस्थित ठेवण्याचे कसब दाखवणारे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस हे काल चक्क सायकल सवारी करताना दिसून आले. वेंझी व्हिएगस यांनी कालपासून बाणावली मतदारसंघात गावचे साकव ही मोहीम सुरू केली असून त्यानिमित्त त्यांचा संपूर्ण मतदारसंघात संचार सुरू झाला आहे. त्यावेळी त्यांनी ही सायकल रपेटही केली. जहाज चालविणारा कॅप्टन सायकल चालवत असल्याचे कित्येकांनी कुतूहलाने पाहिले देखील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.