खरी कुजबुज: भाजप नेते रणनीती बदलणार का?

Khari Kujbuj Political Satire: अन्यायाविरुद्ध म्हणा वा इतर गोष्टी विरुद्ध म्हणा, राज्यात सगळीकडे आवाज विरोधी पक्षांचा आवाज दिसतोय, आंदोलन सुरू आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप नेते रणनीती बदलणार का?

भाजपचे नेते मंडळी गोव्यात विरोधकांच्या संदर्भात जास्तच आक्रमक बनली आहे. त्यांचे मंत्री, आमदार आक्रमक भूमिका घेताना दिसतात. जे विरोध करतात, त्यांची हवा कशी काढून घ्यावी, यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करताना दिसतात. मडगाव उद्यानाबद्दल बोलायचे झाले, तर काही जणांनी बागेत इमारत आराखडा जनतेसाठी दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला. पण मुख्याधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना बंदी घालण्यात आली. पोलिस बंदोबस्त ठेवला, बागेचे दरवाजे बंद केले. शेवटी या लोकांनी आराखडा दाखवलाच. मात्र त्यांना रोखण्यासाठी जे जे केले, त्यामुळे जनतेची सहानुभूती या लोकांप्रती वाढली. ते जर कुठल्याही अडथळ्या विना आराखडा दाखवून गेले असते तर त्यांना कोणी विचारले सुद्धा नसते. पण सत्ताधारी भाजप नेत्यांच्या‌ सांगण्यानुसार मुख्याधिकारी, पोलिस वागले. त्यामुळे लोकांमध्ये जागृती झाली. नेत्यांबद्दल विरोधात भर पडली. काँग्रेस नेत्या मनीषा उसगावकर यांच्या घरावर दगडफेक करून काय साध्य झाले? तिच्याबद्दल सहानुभूती मात्र वाढली.

केतन भाटीकर कुठे?

अन्यायाविरुद्ध म्हणा वा इतर गोष्टी विरुद्ध म्हणा, राज्यात सगळीकडे आवाज विरोधी पक्षांचा आवाज दिसतोय, आंदोलन सुरू आहेत. पण या सर्व मोहिमेत रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर मात्र कोठेच दिसत नाही. परवा काँग्रेसच्या नेत्या मनीषा उसगावकर यांच्या घरावर दगडफेक झाली म्हणून फोंडा पोलिस स्टेशनवर तक्रार द्यायला गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळातही भाटीकर दिसले नाही. नंतर महिला आरक्षणाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेतही भाटीकरांचे दर्शन झाले नाही. आगामी निवडणुकीकरता काँग्रेसचे दुसरे इच्छुक उमेदवार राजेश वेरेकर मात्र हल्ली भलतेच सक्रिय झालेले दिसत आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत राजेश यांनी उमेदवारीवर केलेला दावा प्रत्यक्षात तर येत नाही ना? अशी जोरदार चर्चा सध्या फोंड्यात सुरू झाली आहे. आता ‘असली क्या है, और नकली क्या है!’ हे कळायला आणखी थोडे दिवस जाणार असले तरी काँग्रेस उमेदवारीचा ‘लोहा’ आत्तापासूनच गरम व्हायला सुरुवात झाली आहे, एवढे मात्र निश्चित.

Khari Kujbuj Political Satire
Goa Weather Update: निसर्गाचा दुहेरी खेळ: गोव्यात उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता, नागरिक हैराण

भाग्यवान शिक्षक!

सरकार शिक्षणावर खर्च करताना हात मागे घेते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र सरकारने सरकारी विद्यालयात शिकविण्यासाठी नव्वदच्या वर शिक्षकांची दोन महिन्यापूर्वी नेमणूक केली होती. या शिक्षकांचे सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. मात्र या शिक्षकांना नेमणूक पत्र दिले नव्हते. शिक्षण खात्याने त्या ९६ शिक्षकांना याच आठवड्यात नेमणूक पत्रे दिली. ७६ शाळांत या शिक्षकांना नेमले आहे. आता हे शिक्षक फक्त एकच आठवडा शाळेत जाणार व लगेच त्यांना एका महिन्याची सुट्टी मिळणार आहे. आठ दिवस अर्ध वेळ काम करून लगेच सुट्टीवर जाण्याची मजा काही वेगळीच असणार, हे सांगण्याची गरज नाही. यांना भाग्यवान शिक्षक म्हणावे लागेल!

काँग्रेस नेत्यांची मांदियाळी!

माजी मंत्री स्व. बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक यांचा वाढदिवस बुधवारी त्यांच्या निवासस्थानी घरगुती वातावरणात साजरा झाला. हा सोहळा घरगुती असला तरी या वाढदिवसाला कॉंग्रेस नेत्यांची मांदियाळी होती. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, नव्यानेच काँग्रेस पक्षात सामील झालेले अमित पालेकर मडगाव काँग्रेसचे सावियो कुतिन्हो यांनी उपस्थित राहून प्रभवला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ट नेते लुईझिन फालेरो यांनीही म्हणे प्रभवला आशिर्वाद दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचे समजते. मडगांवचो आवाजच्या बॅनरखाली विवीध विषयांवर बोलणारे प्रभव नायक आता कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा आज मडगावात रंगली होती.

कारापुरात पोचले विरोधीपक्षनेते!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना मराठी चांगलीच अवगत आहे, याचा अनुभव त्यांच्या विधानसभेतील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ कवितेने हे गोमंतकीयांनी जाणले. युरी आलेमाव म्हणे खरी कुजबूजवर आवर्जून लक्ष ठेवतात, असे परवा कुंकळ्ळीत केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी जाहीरपणे सांगितले. काल, कारापुर-सर्वण आंदोलनात विरोधी पक्षनेते अजून सहभागी झालेले नाहीत, अशी कुजबूज आली आणि बुधवारी युरी आलेमाव चक्क कारापूर- साखळीत पोहचले. ∙

प्रदेश भाजप केजरीवालांच्‍या मागे का?

आम आदमी पक्ष (आप) ही भाजपची ‘बी’ टीम असल्‍याचा आरोप राज्‍यातील सर्वच विरोधी पक्ष वारंवार करत असतात. गत जिल्‍हा पंचायत निवडणुकीत ‘आप’ने वेगळी चूल मांडल्‍याने प्रमुख विरोधी काँग्रेसने हा विषय अधिकच ताणून धरलेला होता. अशा स्‍थितीत दिल्लीतील कथित मद्य घोटाळा आणि त्‍याबाबत चर्चेत असलेल्‍या ''आप’चे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्‍यासंदर्भात दिल्ली उच्च न्‍यायालयात सुरू असलेला खटला आणि त्‍यावर सुनावणी घेत असलेल्‍या न्‍यायमूर्ती स्‍वर्णकांता शर्मा यांच्‍यावरून भाजप आणि आप आमने-सामने आले आहेत. स्‍वर्णकांता यांच्‍यावर काही आरोप करीत त्‍यांनी या खटल्‍यातून बाहेर पडावे, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केल्‍यानंतर आमदार तथा प्रदेश भाजपचे मुख्‍य प्रवक्ते दाजी साळकर यांनी आक्रमक होत ‘आप’ महिलांविरोधी असल्‍याचा दावा केला. ‘आप’नेही बुधवारी पत्रकार परिषद घेत साळकर यांना प्रत्‍युत्तर दिले. पण, या सर्व घडामोडींत भाजपने आताच केजरीवालांना रिंगणात का आणले? त्‍यांना नेमके काय दाखवून द्यायचे आहे? असे प्रश्‍‍न अनेकांना पडले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Illegal Fishing Goa: परराज्‍यांतील 13 ट्रॉलर्स जप्‍त, गोव्‍याच्‍या समुद्रात घुसखोरी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाखांपर्यंत दंड

तवडकरांची ‘लक्ष्यसिद्धी’ योजना!

श्रमधाम योजनेच्या सफलतेनंतर आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी आता लक्ष्यसिद्धी योजना सुरू केली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. या योजनेत विद्यार्थ्याला प्रशिक्षण काळात राहण्या-जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याने या योजनेकडे समाजातील विद्यार्थी जास्त आकर्षिले जाणार आहेत. फोंड्यातील एका कार्यक्रमात यासंबंधीची सविस्तर माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आली. रमेश तवडकर यांचे एक असते. ते जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवतात, ती करूनच दाखवतात. श्रमधाम योजना ही तशीच घडली, त्यामुळे निराधार आणि गरिबांना निवारा तरी मिळाला. शेवटी योग्य खाते योग्य व्यक्तीच्या हाती गेल्यावर चांगलेच होणार नाही का?

मुख्यमंत्र्याचा वाढदिन!

सर्वसामान्य कुटुंबीयांत जन्म झाला, पण कर्तृत्वाच्या बळावर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या आणि तरीही सर्वसामान्यांशी नाळ जुळवून असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस २४ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. पक्षीय पातळीवर आणि मतदारसंघातही वाढदिवसानिमित्त जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत आपल्या जन्मदिनानिमित्त आरोग्य केंद्रात जातात आणि काही काळ रुग्णसेवाही बजावतात, इतरही समाजपयोगी कार्य करतात, तसेच यंदाही ते करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा वाढदिवस सदोदित अंत्योदय आणि सर्वोदयाला समर्पितच असतो, तसा यंदाही असेल. मात्र यंदा नवे काय या विषयी उत्कंठा आहे.

फोंडावासीयांची चैन!

फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर आता इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिहेरी लढत फोंड्यात होऊ घातली होती, पण हाय रे दैवा... सगळा फियास्को झाला. ऐनवेळेला निवडणूक रद्द झाल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला. आता ही निवडणूक रद्द का झाली, कशी झाली, याचे चर्वितचर्वण सुरूच आहे, अनेक तर्कवितर्क काढले जातात. ते राहू द्या, पण आता येत्या वर्षी राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक असल्याने फोंडा मतदारसंघात पुन्हा एकदा तिकिटासाठी रस्सीखेच होणार हे नक्की. त्यामुळेच इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क साधणे, कार्यक्रम आखणे असे प्रकार सुरूच आहेत. बाकी फोंडावासीयांची चैन आहे बुवा. फुकट आरोग्य शिबिरांचे ढीगच पडले आहेत, फोंड्यात!

आधी आमदार नंतर नगरसेवक!

‘आधी लगीन कोंडण्याचे नंतर रायबाचे’ तानाजी मालुसरे यांचे हे ऐतिहासिक विधान आजही तेवढेच वास्तववादी आहे. राज्यात पालिका निवडणुका आधी होणार व नंतर विधानसभेच्या होणार, असा कयास होता. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका पालिका निवडणुकीच्या पूर्वी होणार असल्यामुळे नगरसेवक बनण्याच्या शर्यतीत असलेल्या स्थानिक इच्छुकांच्या मनसुब्यांना धक्का लागला आहे. काही इच्छुक आमदारांच्या समर्थनावर निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते. मात्र आमदार आता आपल्या निवडणुकीत कोण? किती काम करणार? ते पाहून आपला उमेदवार ठरविणार. विद्यमान आमदार निवडणूक जिंकणार की नाही, याची गॅरंटी नसल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावा, ही इच्छुक नगरसेवकांची पंचायत झाली आहे. एक मात्र खरे याचा फायदा आमदार व विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांना होणार.

आधी आमदार नंतर नगरसेवक!

‘आधी लगीन कोंडण्याचे नंतर रायबाचे’ तानाजी मालुसरे यांचे हे ऐतिहासिक विधान आजही तेवढेच वास्तववादी आहे. राज्यात पालिका निवडणुका आधी होणार व नंतर विधानसभेच्या होणार, असा कयास होता. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका पालिका निवडणुकीच्या पूर्वी होणार असल्यामुळे नगरसेवक बनण्याच्या शर्यतीत असलेल्या स्थानिक इच्छुकांच्या मनसुब्यांना धक्का लागला आहे. काही इच्छुक आमदारांच्या समर्थनावर निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते. मात्र आमदार आता आपल्या निवडणुकीत कोण? किती काम करणार? ते पाहून आपला उमेदवार ठरविणार. विद्यमान आमदार निवडणूक जिंकणार की नाही, याची गॅरंटी नसल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावा, ही इच्छुक नगरसेवकांची पंचायत झाली आहे. एक मात्र खरे याचा फायदा आमदार व विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांना होणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com