Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: गाेव्‍यातील शहाजहान पुन्‍हा चर्चेत

Khari Kujbuj Political Satire: गेल्या काही दशकात ताळगाव मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत. हा विकास ‘व्हर्टीकल’ होत गेला मात्र ‘हॉरिझेंटल’ झाला नाही.

Sameer Amunekar

गाेव्‍यातील शहाजहान पुन्‍हा चर्चेत

काणकोण येथे नव्‍याने बांधलेल्‍या रवींद्र भवनात काल पहिल्‍याच पावसात गळती सुरू झाल्‍याने सध्‍या सगळीकडे तो एक चर्चेचा विषय बनला आहे. सभापती रमेश तवडकर यांनीही या प्रकारावर आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे. काल या संदर्भात फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एक खाेचक प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. आग्‍य्रातील शहाजहानने एकच ताजमहाल उभा केला होता. गोव्‍यातील शहाजहानने, असे किती ताजमहाल उभे केले आहेत हे आता लवकरच कळणार, असेही ते म्‍हणाले. विजय सरदेसाईंचा रोख कुणाकडे होता, हे वेगळे सांगण्‍याची गरज आहे का?

जेनिफरबाई अखेर दिसल्या!

गेल्या काही दशकात ताळगाव मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत. हा विकास ‘व्हर्टीकल’ होत गेला मात्र ‘हॉरिझेंटल’ झाला नाही. त्यामुळेच तर अनेक वर्षे ताळगावात राहणाऱ्यांना वीज व पाणी या मूलभूत गरजांच्या अडचणी भासू लागल्या आहेत. स्थानिक आमदारांनी तर ताळगाव मतदारसंघाकडे लक्ष नसल्यानेच या समस्या त्या करू शकलेल्या नाहीत. काल रात्री ओडशेल येथे डोंगराच्या माथ्यावरील ढीग करून ठेवलेली माती पाण्याबरोबर खाली आल्याने तेथील रहिवाशांमध्ये घबराट उडाली. ही भीती स्थानिकांनी यापूर्वीही आमदारांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कधी भेटल्याच नाहीत. मात्र कालच्या घटनेवेळी काही समाजकार्यकर्ते तेथे पोहचल्यावर आमदार रात्री उशिरा पोहचल्या. या घटनेची माहिती व्हायरल झाली तेव्हा त्यांचे नियंत्रण सुटले व सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास विसरल्या नाहीत. एरव्ही कोणालाही न भेटणाऱ्या आमदार अचानक घटनास्थळी पोहचल्याने तेथील रहिवाशांनाही धक्का बसला. लोकांना मदतीचा हात देण्याऐवजी बांधकाम मालकाची बाजू घेऊन बोलताना दिसल्या. त्यामुळे त्या समस्या सोडवण्यास ती अधिक बिकट करण्यास आल्या, अशी तेथील रहिवाशांमध्ये चर्चा सुरू होती.

भाईंचा चहा

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चहा प्रेम सर्वांनाच ठाऊक होते. त्यांचा दौरा जाहीर असला की त्यांना लागणारा चहा कोण देणार हे ठरून गेलेले असे. ते अचानकपणे कुठे पोचले तरी आनंदाने त्यांना लागणारा चहा देण्यासाठी तिथे असणाऱ्यांत चढाओढ लागत असे. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने चहाचा कप हाती घेतलेले छायाचित्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी ‘एक्स’वर शेअर केले आणि या आठवणींना उजाळा मिळाला.

नारळीकरांचा संबंध

आपले राजकीय नेते वायफळ बडबड करण्यात पटाईत, परंतु गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर हे मनाने सच्चे होते. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची एक गोष्ट बांदोडकरांशी निगडित आहे. मडगावचे अभियंते विकास देसाई यांना ती आठवली. आपल्या व्याख्यान मालिकेचा भाग म्हणून नारळीकर फिरत होते व त्याचा भाग म्हणून गोव्यात त्यांचा कार्यक्रम निश्‍चित झाला होता. ती संधी साधून बांदोडकरांनी त्यांचा सत्कार आयोजित केला होता. परंतु काही कारणांमुळे नारळीकर यांनी गोव्याचा कार्यक्रम रद्द करून कोल्हापूर येथे जाणे पसंत केले. त्यावेळी बांदेडकरांनी आपले एक मंत्री विसू करमली यांना कोल्हापूर येथे पाठवून त्यांना शाल व सन्मानपत्र बहाल केले. ही बाब नारळीकरांना भावली, त्यांनी योग्य संधी साधून गोव्याचा दौरा केला, भाषण केले व गोव्याचा पाहुणचारही घेतला.

विमानतळावर पोचण्याची कहाणी

उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या स्वागताला खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा राजशिष्टाचाराचा भाग असेल, असे वाटणे साहजिक आहे. मात्र तसे प्रत्यक्षात झालेले नाही. विमानतळावर कोण कोण स्वागताला येणार याची यादी सोमवारी उपराष्ट्रपतींकडे दिल्लीत पोचली होती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पीठासीन अधिकारी असल्याने ते तानावडे यांना व्यक्तीशः ओळखतात. तानावडेंचे नाव विमानतळावर येणाऱ्या महनीय यादीत नसल्याने सोमवारी धनकड यांनी तानावडेंना फोन केला. ते गोव्याबाहेर आहेत का, अशी विचारणा केली. त्यावेळी नाही, असे उत्तर दिले तर मग स्वागतासाठी का नाही, असे त्यांनी विचारले. मग तानावडे मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्यांचे नाव यादीत आले.

काब्राल साहेब, किती वर्षे?

‘इफ यू फेल टू प्लॅन, इट्स शुअर यू प्लॅन टू फेल’ असे इंग्रजीत एक बोध वाक्य आहे. एकच विकासकाम जर तीन तीन वर्षे लांबले व जनतेला त्रास सहन करावे लागले तर जनता लोकप्रतिनिधीला व सरकारला दोष देणारच. कुडचडेत तीन वर्षांपासून भूमिगत वीज वाहिन्या व मलनिःसारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्ते वारंवार खोदले जातात. अशा वारंवारच्या खोदकामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. आता पावसाळ्यात तर भर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे व चरी खोदल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता काब्राल विरोधक काब्राल यांच्या विकासकामांचा काब्राल यांच्याच विरोधात उपयोग करू लागलेत. म्हणतात ना, करायला गेलो एक आणि झाले भलतेच!

नेत्यांना खुर्चीहून जनता प्रिय हवी ना!

पहिल्याच पावसात रस्त्यांची जी काही ''धुलाई'' झाली ती पाहून लोकांनी अक्षरशः सरकारवर आरोपांची बरसात केली. लोकांनी खासदार, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य आणि अगदी पंचायत सदस्यांनाही यासाठी जबाबदार धरले. लोकं म्हणतात, या नेत्यांना आपली खुर्ची जेवढी प्रिय आहे, तेवढी जर जनता प्रिय असती, तर आज हे रस्ते असे ‘ओल्या’ दुष्काळात गेले नसते. नेतेमंडळींना खरंच जनता प्रिय असती, तर आपल्याला सक्षम आणि दर्जेदार विकास मिळाला असता, नुसते ‘खड्डे’ नाही! अशी चर्चा सध्‍या राज्‍यभर सुरू आहे. म्हणजे आता नेत्यांच्या प्रेमाची व्याख्या त्यांच्या पदावरून नव्हे तर त्यांनी बांधलेल्या रस्त्यांवरून ठरते, अशी चर्चा सध्या रंगलीय.

कभी खुशी कभी गम!

मान्सूनपूर्व पावसाने म्हापसा शहराला अक्षरशः झोडपले. परिणामी बाजारपेठ तसेच सखल भागात पूरस्थिती पाहायला मिळाली. मागील काही वर्षात अशी भयंकर स्थिती दिसली नाही! मात्र यावेळी म्हापसा पालिकेला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल. पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आल्याने ही समस्या उद्भवली हे सत्ताधारी पालिका मंडळातील अनेकांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. पण गमंत म्हणजे, काहींना समाधान आहे की, आपण नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान नाही, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असते! यालाच म्हणतात कभी खुशी कभी गम! या संपूर्ण प्रकारावरून सत्ताधारी नगरसेवकांनी या त्रुटीला पालिका अधिकाऱ्यांना दोषी धरलेय. काहींनी तसे सोशल मीडिया ग्रुप्सवर आपली प्रतिक्रिया देत, तसे आरोप व आक्रोश व्यक्त केला आहे. परंतु, जबाबदारी काही एकट्याची नसते, सामूहिक प्रयत्न केल्यानेच कामे मार्गी लागतात! पण हे लक्षात कोण घेणार?

रस्त्याची वाताहत; हपापाचा माल गपापा!

राज्यातील चौपदरी रस्त्याची कामे विविध ठिकाणी केली आहेत, मात्र घिसाडघाईने केलेल्या या कामामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः चौपदरी रस्त्याला जोडरस्ते उभारताना कोणतेच नियोजन केलेले नाही, त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खचून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. केरये - खांडेपार भागात आठ दिवसांपूर्वी घातलेल्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा रस्ता खचला असून हा रस्ता वाहतुकीला धोकादायक ठरला आहे. या रस्त्यांची कामे बड्या कंत्राटदारांकडून केली जातात, पण त्यांच्यावर ‘वॉच'' ठेवण्यात आपले राज्यातील बांधकाम खाते अपयशी ठरते की काय, अशी स्थिती असून जाब विचारायला गेला तर कुणीच कुणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. त्यामुळे हपापाचा माल गपापा...!

पुण्यतिथी की जयंती?

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आज कॉंग्रेस पक्षाने बांबोळी येथील राजीव गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाळली. कार्यक्रमाला गोवा प्रभारी माणिकराव, प्रदेशाध्यक्ष अमितराव, विरोधी पक्षनेते युरीबाब, कॅप्टन विरियातो वगैरे नेते हजर होते. सार्दिनबाबही आवर्जुन उपस्थित राहिले. एल्टन व कार्लुसबाब मात्र दिसले नाहीत. एरवी राजीव गांधींची पुण्यतिथी ‘दहशतवाद विरोधी दिन’ म्हणून पाळली जाते. आज मात्र कॉंग्रेसवाल्यांनी चक्क ‘सद्भावना दिनाची’ शपथ घेतली. राजीव गांधीच्या पुण्यतिथीला एकाअर्थी नवीन कॉंग्रेसवाल्यांनी जयंती म्हणूनच साजरी केली, अशी चर्चा जाणत्या कॉंग्रेसवाल्यांमध्ये दिवसभर सुरू होती.

‘आप’मध्‍ये फूट?

एकाबाजूने आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या दोघांनी एकत्र येऊन गाेव्‍यातील येणारी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी हाेत असतानाच काँग्रेसकडून गोव्‍यातील ‘आप’ पक्ष खिळखिळा करण्‍याचे कारस्‍थान चालू असल्‍याचे सांगितले जात आहे. आपच्‍या कित्‍येक स्‍थानिक नेत्‍यांना काँग्रेसकडे वळविण्‍याचा सध्‍या प्रयत्‍न म्‍हणे चालू झाला आहे. असे म्‍हणतात, यासाठी दक्षिण गोव्‍याचे काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस यांनी पुढाकार घेतला आहे. एकाबाजूने ‘आप’चे आमदार आम्‍ही पाठिंबा दिल्‍यामुळेच विरियातो लोकसभा जिंकले, असे म्‍हणत असतानाचा विरियातो त्‍यांचाच पक्ष फाेडण्‍यासाठी तयारी करत आहेत, असे म्‍हणायचे का?

पुन्हा रस्त्यांसाठी टेंडर ?

सरकार ‘विकास’ करते, कार्यकर्ते तो ‘लोकांसाठी’ आहे म्हणून सांगत फिरतात... पण झालं काय? काही महिन्यांपूर्वीच बांधलेला चकचकीत रस्ता, आता पहिल्याच पावसात गायब झाला; म्हणजे अक्षरशः पाण्यात गेला. हे कसले विकासकाम? सरकारी अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यायला हवे होते पण ‘कुणीतरी’ लक्ष दिले नाही. काहीजण तर चक्क ‘मंत्र्यांचं लक्ष नाही’ म्हणून हे असं होतं, असंही म्हणतात. या रस्त्यासाठी काय वापरलं होतं? माती की पावडर? असा प्रश्न आता जनतेलाच पडला आहे. काही महिन्यांपूर्वीच बनवलेले रस्ते पाण्यात गेल्याने ते कंत्राटदाराला पुन्हा बनवायला सांगणार, की नव्यानं टेंडर काढून पुन्हा एकदा ‘विकास’ करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. विकास व्हायलाच हवा नाही का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT