खाकी वर्दीचा धाक आता संपला?
‘वेताक चुकल्यार वांवाक चुकता आणि वांवाक चुकल्यार गांवाक चुकता,’ अशी कोकणीत म्हण आहे. एक काळ असा होता की मोठमोठे गुंडही खाकी वर्दीला घाबरत होते. पोलिसांचा एक वेगळाच धाक होता. मात्र, आता ही भीती आणि धाक संपत चालल्याची शंका येते. पोलिस गुन्हे दाखल करायलाही कचरू लागले आहेत की काय, असा प्रश्न पडतो. प्राणघातक मारहाण झाली तरी नॉन-कॉग्निझेबल (एनसी) गुन्हा दाखल करून तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला जातो आणि आरोपीला मोकळे सोडले जाते. पोलिसांच्या अशाच निष्काळजीपणामुळे काणकोणात एका चिकन कापणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना घडली होती. आता कुंकळ्ळी पोलिसांकडूनही अशीच चूक होत असल्याचा आरोप आहे. एका महिलेच्या दिराने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला, तसेच तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांकडून न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे. डायगो साहेब, असेच असेल तर मग पोलिसांची गरज काय?
वेळ्ळीत क्रुझ सिल्वा सेफ?
मतदारराजा आता शहाणा झाला आहे. कोणाला मत द्यायचे, हे इतरांना सांगायचे नसते, याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार आणि कोण हरणार, हे केवळ मतदारच ठरवणार. आपण फक्त अंदाजपंचे दाहोदसे म्हणायचे! वेळळी मतदारसंघाचे आमदार क्रुझ सिल्वा यांना काँग्रेसतर्फे कोण आव्हान देणार, हा सध्या चर्चेचा विषय आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सावियो यांच्यावर पक्ष डाव लावणार की नवा चेहरा मैदानात उतरवणार? माजी आमदार फिलिप नेरी रॉड्रीग्स पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की शेजारच्या मतदारसंघातून उमेदवार आयात करून काँग्रेस कुंकळ्ळीत युरीची जागा सुरक्षित ठेवणार? अशा विविध शक्यतांवर मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे. या सगळ्या चर्चेत क्रुझ सिल्वा खरोखरच ‘सेफ’ आहेत का, याचे उत्तर मात्र मतदारराजाच देणार!
भावी नगरसेवकांची निष्ठा पणाला!
राजकारणात प्रगती साधण्यासाठी एखाद्या ‘गॉड फादर’ची गरज लागते. विधानसभेचा निवडणुकीनंतर लगेच राज्यातील पालिकांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. नगरसेवक बनण्यास इच्छुक असलेले स्थानिक छोटे नेते भावी आमदारांना आपली निष्ठा दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. भावी नगरसेवक भावी आमदारांचा कार्यक्रमात व प्रचारात हिरारीने भाग घेताना दिसतात. या भावी नगरसेवकांची निष्ठा पणाला लागली आहे. मात्र हे भावी नगरसेवक ज्यांना पाठिंबा देतात तो उमेदवार विधानसभेची निवडणूक हरला तर मात्र बिचाऱ्या स्थानिक छोट्या नेत्यांची पंचायत आहे. शिवाय निवडून आल्यावर आमदार महाशय या भावी नगरसेवकांना पाठिंबा देणार याची शाश्वती नाही.
निरोप समारंभात ‘खरी कुजबुज’चीच चर्चा!
बंदर कप्तान खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला नुकतीच अन्य खात्यात वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळाली. त्यानिमित्त दोन दिवसांपूर्वी त्याचा कार्यालयात खास निरोपसमारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात निरोपापेक्षा ‘गोमन्तक’च्या ‘खरी कुजबुज’ या सदराचीच अधिक चर्चा रंगली. सदरातील कुजबुजचा परिणाम म्हणून आपल्याला बदलीच्या ठिकाणी जावे लागल्याची भावना संबंधित कर्मचाऱ्याने व्यक्त केली. दिवाळीत घेतलेल्या छोट्या-मोठ्या ‘गिफ्ट’ची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचलीच कशी, असा सवाल करीत त्याने मनातील खदखदही बोलून दाखवली. त्यामुळे निरोपसमारंभातही ‘खरी कुजबुज’ चर्चेचा विषय ठरली, हे मात्र निश्चित!
महिला पोलिस ठाण्याला ‘स्टाफ’ची प्रतीक्षा!
मडगावच्या महिला पोलिस ठाण्याची अवस्था सध्या ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी झाली आहे. आधीच अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यात ठाण्याचे कार्यक्षेत्रही वाढविल्याने उपलब्ध पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत आहे. एक महिला पीआय, दोन उपनिरीक्षक आणि अवघे पाच पोलिस कर्मचारी, असे या ठाण्याचे संख्याबळ! वाढत्या कामाचा ताण सांभाळताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे ठाण्याला आता अतिरिक्त पोलिसांची प्रतीक्षा लागली आहे. ही प्रतीक्षा संपणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे!
रोषणाईचा झगमगाट!
इफ्फीच्या निमित्ताने पणजीत सध्या रोषणाईचा झगमगाट पसरला आहे. सजावट इतकी आकर्षक केली आहे की चित्रपट पाहायला आलेले रसिक आता चित्रपटापेक्षा सजावटीसमोर फोटो काढण्यातच अधिक रमलेले दिसतात. रात्रीच्या रोषणाईत गोव्याची जैवविविधताही अशी खुलून दिसते की फोटो काढणाऱ्यांच्या माध्यमातून ती आता देशभरच नव्हे, तर जगभर पोहोचत आहे. त्यामुळे इफ्फीमध्ये चित्रपटांची चर्चा सुरू असतानाच, गोव्याच्या सौंदर्याचा फोटो शो मात्र वेगळ्याच पडद्यावर सुरू आहे. आता एवढी सुंदर रोषणाई केली आहे, तर सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी होणारच… बाकी चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही कदाचित आधी स्वतःचा फोटो काढून मगच सिनेमाकडे वळत असतील!
यंदा ओल्ड मार्केटमध्ये फेस्त फेरी कुठे?
वर्षपद्धतीप्रमाणे आठ डिसेंबर रोजी मडगावात इमॅक्युलेट कन्सेप्शन फेस्त साजरे केले जाणार आहे. या फेस्तनिमित्त ओल्ड मार्केटमध्ये मोठी फेरी भरते. ही फेरी जरी तीन दिवसांसाठी मर्यादित असली, तरी या फेरीत सहभागी होणारे विक्रेते आपले स्टॉल्स दहा ते पंधरा दिवस तरी चालू ठेवतात. फेस्त म्हटले की जळीमळी, कचरा, दुर्गंधी, पाणी साचणे हे आलेच. मात्र, यंदा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘पीपल्स पाथ’ केला असून या भागाचे सुशोभीकरण केले. एसजीपीडीए मैदानाच्या सभोवतालीसुद्धा दगडाचे कुंपण बांधले आहे. पार्किंगची जागा व परिसरही सुशोभित केला आहे. अशा परिस्थितीत या सुशोभित जागेत फेस्त फेरीसाठी परवानगी देणे योग्य ठरेल का, असा प्रश्न आता कित्येकांना पडला आहे. आठ दिवसांचे फेस्त; पण या परिसरातील सुशोभित जागेचे विद्रूपीकरण व्हायला वेळ लागणार नाही, असे लोक बोलत आहेत. त्यामुळे नगरपालिका व एसजीपीडीए यांना यंदा फेस्त फेरी दुसरीकडे हलवावी लागेल, अशीच शक्यता व्यक्त होत आहे.
म्हापशात राजकीय खलबते!
म्हापशात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून पडद्यामागे नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. एकेकाळी स्व. फ्रान्सिस उर्फ बाबूश डिसोझा यांचे खंदे समर्थक असलेले सुधीर कांदोळकर उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गोटातील काहीजण विद्यमान आमदार जोशुआ यांच्यासमोरील संभाव्य आव्हान कमी करण्यासाठी कांदोळकर यांनाच पक्षात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. जोशुआ यांना टक्कर देऊ शकणारा चेहरा म्हणून कांदोळकर यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांना एखादे पद देऊन शांत केले जाणार की उमेदवारीवरून पक्षातच नवा पेच निर्माण होणार, याची उत्सुकता आहे. आता कांदोळकर या गळाला लागतात की काँग्रेसमध्येच राहून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात, हे येणारा काळच ठरवेल!
उल्हासराव सुखावले!
नावेली मतदारसंघात नुकत्याच झालेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला बाबू नायक सभागृहात मोठी गर्दी जमली होती. लोकांची ही उपस्थिती पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार उल्हास तुयेकर यांच्याकडे पाहत स्मितहास्य केले. मुख्यमंत्र्यांचे हे स्मित पाहून उल्हासरावही सुखावले! अर्थात, आगामी विधानसभा निवडणुकीत नावेलीत पुन्हा कमळ फुलेल, याची आजच्या घडीला कुणीही खात्री देऊ शकत नाही. मात्र, तुयेकर यांनी मतदारसंघात भेदभाव न करता विकासकामे केली आहेत, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या स्मितहास्याचा अर्थ उल्हासरावांनी नक्कीच सकारात्मक घेतला असावा!
प्रभवच्या पोस्टरवर वक्रदृष्टी
मडगाव पालिकेला शुल्क न भरलेल्यांचे शुभेच्छा फलक जर पालिकेने काढून टाकले, तर त्यात काही नवल नाही. मात्र, सगळे पैसे भरूनही जर फलक काढले, तर त्याला काय म्हणायचे? हा प्रश्न सध्या मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांना पडला आहे. कारण मडगाव पालिकेत महिन्याभराचे शुल्क भरूनही त्यांनी मडगावात लावलेले पोस्टर पालिकेने काढले. याचे कारण काय, तर प्रभवने म्हणे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शुल्क भरले होते. मात्र, सध्या मडगावात दिंडी असल्याने त्यांनी आपल्या या पोस्टरवर दिंडीच्या शुभेच्छा देणारे पोस्टर चढविले. त्यामुळेच पालिकेने ते हटविले, असे सांगितले जाते. मात्र, एकदा शुल्क भरल्यावर कुणीही दिवाळीच्या शुभेच्छा देवो किंवा दिंडीच्या! याच्याशी पालिकेला काय बरे देणेघेणे?
कायतूंना फुटला कंठ
बाणावलीचे माजी आमदार कायतू सिल्वा हे मागची काही वर्षे राजकारणापासून दूर होते. त्यामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेतला तर नाही ना, अशी वाटण्याजोगी एकंदर स्थिती होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे कित्येकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कायतू सिल्वा यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, हा दावा करताना काँग्रेस भ्रष्टाचारी असल्याचाही आरोप केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार, यावर कुणी विश्वास ठेवला तर त्यांच्याएवढा जगात वेडा दुसरा कुणी नसेल. त्यामुळे कायतूना खरेच काँग्रेसची उमेदवारी पाहिजे की काँग्रेसला अपशकुन करण्यासाठीच ते रिंगणात उतरणार, याचे उत्तर कोण देऊ शकेल?
नगरसेवक ते ‘रुद्रेश्वर’चे अध्यक्ष
हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी यशवंत माडकर यांची बिनविरोध निवड झाली. राज्यातील तमाम भंडारी समाजाचे श्री देव रुद्रेश्वर हे आराध्य दैवत असल्याने या देवस्थानच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरवळे येथेच वास्तव्यास असलेले माडकर हे साखळी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. होंडा येथील सरपंच शिवदास माडकर यांचे ते ज्येष्ठ बंधू. माडकर समाजकारणात अनेक वर्षे सक्रिय आहेत. वाहतूक व्यवसायाबरोबरच ते मालमत्ता व्यवहारातही कार्यरत होते. राज्यभरातील भंडारी समाजात त्यांचे व्यक्तिमत्त्व सुपरिचित आहे. मंदिर परिसरात पालखी उत्सवावरून वाद निर्माण झाला होता, त्यावेळी राज्यभरातील भंडारी समाजातील शेकडो जणांना संघटित करून मंदिर परिसरात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक क्रियाशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दीपकेंमुळे अनेकजण अस्वस्थ!
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत छेडलेल्या आंदोलनामुळे देशभर चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके गोव्यात दाखल झाले आहेत. रविवारी पणजीतील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘गोवा कुठे चाललाय?’ या कार्यक्रमात ते तरुणाईशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच दीपके यांनी गोव्यातील तरुणाईला केंद्रस्थानी ठेवल्याने अनेक विद्यमान आमदारांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोठडीचा अनुभव, जामिनाचा दिलासा!
पोलिस कोठडीतून पसार होण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या सुलेमान सिद्दीकीला अखेर जामीन मिळाला. बेकायदेशीररीत्या बळकावलेल्या जमिनींच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या अफरातफरीचा आरोप असलेल्या सिद्दीकीला ईडीने १६ जुलै रोजी अटक केली होती. आता न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. अर्थात, जामीन म्हणजे आरोपांतून मुक्तता नव्हे, हे वेगळे सांगायला नको. मात्र, कोठडीचा अनुभव असलेल्या या महाशयांसमोर आता जामिनाच्या अटींचे पालन करण्याचे आव्हान असेल. तपास यंत्रणांनाही त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल. कारण कोठडीच्या आठवणी जामिनाच्या दिलाशात विरून जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा!
इफ्फी आणि वाहतूक कोंडी
इफ्फीच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचा अंदाज घेण्यासाठी अनेकांचे लक्ष पणजीतील रस्त्यांकडे लागले होते. कारण इफ्फी म्हटले की चित्रपटांची मेजवानी असतेच, पण त्यासोबत वाहतूक कोंडीचा ‘शो’ही दरवर्षी हमखास पाहायला मिळतो! मात्र, यंदा पहिल्या दिवशी शनिवारी वाहतूक व्यवस्थापन बऱ्यापैकी सुरळीत दिसल्याने वाहतूक पोलिसांची वाहवा करावी लागेल. नियमांचे पालन आणि नियोजन यांचा चांगला मेळ दिसून आला. त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. पहिल्या दिवशी दाखवलेला हा ट्रेलर पुढील आठ दिवसही असाच सुरू राहिला, तर इफ्फीच्या चित्रपटांइतकीच वाहतूक पोलिसांची कामगिरीही चर्चेत राहील… फक्त शेवटच्या दिवशी हा चित्रपट ‘कोंडीचा सिक्वेल’ ठरू नये, एवढीच अपेक्षा!
कुणाला मिळणार यश?
मे महिन्यात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेतलेले मनोज परब रविवारी पुन्हा एकदा आरजीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात आरजीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परब यांचे समर्थक अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांच्याप्रमाणेच आरजीच्या शेकडो कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर विश्वास असल्याने सभागृह खचाखच भरेल, असा त्यांचा अंदाज आहे. परब यांच्या प्रवेशावेळी होणारी गर्दी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीची दिशा ठरविणारी ठरू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे, यासाठी खोलकर आणि नाईक यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, आमदार वीरेश बोरकर यांनीही आपली बाजू प्रभावीपणे मांडत गर्दी जमू नये, यासाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे. आता या दोन्ही गटांपैकी कुणाचे प्रयत्न यशस्वी होतात, हे रविवारी सायंकाळीच स्पष्ट होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.