

पणजी: जून २०२४ मध्ये गाजलेल्या आसगाव येथील घर पाडकाम प्रकरणाच्या आठवणी ताज्या असतानाच, २० नोव्हेंबर २०२६ रोजी आश्वे-मांद्रे येथेही तसाच धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. जमीनमालक आणि त्यांच्या कुटुंबाला जागा रिकामी करायला लावून पोलिस स्थानकात नेल्याच्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आसगाव प्रकरणात ज्याप्रमाणे तत्कालीन पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांचे निलंबन आणि थेट पोलिस महासंचालकांची (डीजीपी) बदली झाली होती, तशीच कठोर कारवाई आता मांद्रे प्रकरणातील अधिकाऱ्यांवर आणि विद्यमान पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्यावर होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२० नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रतीक गारूडी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आश्वे-मांद्रे येथील एका जागेवर छापा टाकला. यावेळी जागेच्या मूळ मालकाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्या जागेतून फरपटत बाहेर काढले आणि त्यांच्या मुलाला पोलिस स्थानकात नेले. यानंतर पीडित कुटुंबाचे वकील साईराज भजे आणि ॲड. अमित पालेकर यांनी पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्याशी संवाद साधला.
दडपशाही वाढण्याची भीती
या घटनेचे स्वरूपही आसगाव प्रकरणासारखेच असल्याचे दिसते. मात्र, ही घटना घडूनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोणाचा राजकीय किंवा वरिष्ठ पातळीवरील आशीर्वाद आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची आणि बदलीची कारवाई न झाल्यास पोलिसांची ही दडपशाही अशीच सुरू राहील, अशी भीती स्थानिक नागरिक आणि वकिलांकडून व्यक्त केली जात आहे.
उपनिरीक्षक गारूडीच्या उपस्थितीवरून वाद
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रतीक गारूडी यांच्या उपस्थितीवरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी ॲड. अंकुर कुमार मारहाण प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गारूडी यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून कोलवाळ पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.