

नीना नाईक
महागाईवर रान माजवले. पण यात क्रूड ऑईल, डॉलरचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, एक्साईज ड्युटी, कोरोना काळ, रशिया-युक्रेन युद्ध - यातून भारत कसा बचावला, याचा अभ्यास केला असता तर प्रसंग बाका आला नसता.
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा हा नुसता एक विभाग नाही, तो एक ‘ब्रँड’ आहे. या महिला संघर्षातून वर आलेल्या आहेत. त्या तळागाळातल्या महिलांशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधतात. त्यामुळे त्यांची धार वेगळी आहे, त्यांचा घाट वेगळा आहे. गोव्यात ५०% हून अधिक महिला मतदान करतात. त्यामुळे महिला मोर्चाकडे प्रचंड संघटन कौशल्य आहे. त्यांना घाबरवलं तर त्या घाबरतील असं नाही, उलट त्या आकाशाला गवसणी घालू शकतात. गरज आहे ती फक्त त्यांना योग्य दिशा आणि तयारी देण्याची.
माध्यमांचा भडिमार; पत्रकारांची चूक नाही
माध्यमं त्यांच्यावर तुटून पडतात, प्रश्नांचा भडिमार करतात. उत्तर अयोग्य वाटलं की पुढची सरबत्ती सुरू होते. यात पत्रकारांची चूक नाही. पत्रकार परिषद असो वा महिला पदाधिकारी असो, घटनांबद्दल माहिती विचारणं हे त्यांचं कामच आहे. पत्रकारांनी पाहिलं आहे, विरोधी पक्षात असताना हाच ब्रँड रस्त्यावर उतरून बाजू मांडायचा. सरकारवर बोट दाखवून जाब विचारायचा. आज सरकारात असताना तीच धार, तेच धाडस का दिसत नाही, हा खरा प्रश्न आहे.
बलात्कार आणि गुन्हेगारी - पान पुसणं बंद करा
बलात्काराचे आरोप सिद्ध करायला कायदा आहे. कायदा हातात घेणारे असतील तर तो विषय वेगळा. पण जेव्हा अशा प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात प्रवेश दिला, तेव्हा महिला मोर्चा गप्प का होता? की त्यांच्या मताला किंमतच नव्हती? ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो’, हे उत्तर पुरेसं नाही. बैठकीचं निमंत्रण पत्रकारांना मिळालं की नाही, ते पत्रकार जाणोत. पत्रकार बंधू ज्वलंत घटनेवर सामाजिक सुरक्षा, न्याय आणि संताप व्यक्त करतात. बलात्कार हे आता दर महिन्याला व्हायला लागले आहेत, हे अत्यंत वेदनादायक आहे. गुन्हा पुरुषाकडून होत आहे. इथे लिंगभेदाचा प्रश्न नाही; पण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पुरुषांनीच द्यायला हवं. त्यांची मूल्यं, स्वातंत्र्य, संयम, संधी - या वास्तव आणि कल्पनेचा मेळ बसत नाही. सत्ता आणि वर्चस्व कुणाचं आहे, त्यांना विचारा. ‘गुन्हेगारी वाढली, कठोर शिक्षा होईल’ हे फक्त ‘बोलाचा भात’ ठरला आहे. अपयशाचे भागीदार कोण? गुन्हेगार मोकाट सुटले, मग पीडितांनी काय करायचं?
जबाबदारीचं चित्र काढा
या दुर्दैवी घटना पूर्वीही होत होत्या. कौटुंबिक जवळीक, नातेवाईकांकडून हे घडत होतं. इज्जतीच्या नावावर मुलगा श्रेष्ठ ठरवला गेला. तिथेही तिचे धिंडवडे निघाले. हा अनादर अनादी काळापासून चालू आहे, कधी रील्समुळे तर कधी आई-बहिणीच्या शिव्यांत. समाज बदलावा यासाठी महिला आयोग आले, पण तिथे तिचं स्वतंत्र अस्तित्व दिसलं नाही. ते दात नसलेला साप झाले आहे. पीडितांच्या कुटुंबांना भेटा. पोलिसांना वेठीस धरा. महिला व बाल विकास विभाग आहे, हे निदान कळू द्या.
उपाय नाही, निदान जबाबदारीचं चित्र तरी काढा. कित्येक केसेस गुलदस्त्यात बंद आहेत, त्या उलगडायला ब्रह्मदेवाला अवतार घ्यावा लागेल. त्यांचे आकडे आणि सरासरी सरसर वर चढत आहे. साक्षीदार माघार घेतो, कारण या केसेस वर्षानुवर्षे चालतात. मग सीबीआय म्हणत ढिगाऱ्याखाली चेपतात. फास्टट्रॅक कोर्ट डोळ्यांवर पट्टी बांधून उभे आहेत. केस कोर्टात घ्या आणि जाहीर करा की पोलिसांना अडथळा येतो. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी वरदहस्त कुठून आला? एका तरी पोलिस अधिकाऱ्याने हे सांगावं, त्याचा सत्कार करू.
महागाईवर अभ्यास हवा
महागाईवर रान माजवलं. पण यात क्रूड ऑईल, डॉलरचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, एक्साईज ड्यूटी, कोरोना काळ, रशिया-युक्रेन युद्ध - यातून भारत कसा बचावला, याचा अभ्यास केला असता तर प्रसंग बाका आला नसता. ही तयारी प्रदेशाध्यक्ष करून घेऊ शकतात. अथवा अर्थव्यवस्था जाणणारे तज्ज्ञ गोव्यात आहेत, त्यांची मदत घेता येते. उदा. निर्मला सीतारामन, त्या विशिष्ट विषयावर अभ्यासपूर्ण बोलतात. अशा विदुषी भाजपात आहेत. पण ‘चढ शहाणे’ ही पदवी मिळाल्यानंतर तिला मागे ठेवलं जातं. गर्दी करण्यापेक्षा सांभाळण्याचं भान हवं. ३३% महिला राखीव जागा मागण्यापेक्षा ‘बोल्ड स्टेटमेंट’ द्या. माध्यमं आपली टीआरपी वाढवणारच. तुम्ही त्यांना ‘कंटेंट’ देऊ नका. तटस्थ भूमिका सोडा. महिला मोर्चाने ठाम भूमिका घेतली तरच हा ‘ब्रँड’ टिकेल, वाढेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.