मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?
राज्यात नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे युवक आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली सुरू आहे. गृहआधार योजनेच्या मासिक मानधनात वाढ करून महिलांना आर्थिक दिलासा देण्याचा सरकारचा विचार आहे याशिवाय, महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सेवा सुरू करून नवरात्रीची मोठी भेट दिली जाऊ शकते. तरूणाईला आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होऊ शकतात. पितृपक्ष संपून नवरात्रीचा उत्साह सुरू होताच या घोषणा होण्याची शक्यता असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य ‘नवरात्री गिफ्ट’कडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जुन्ता हाऊस आणि जनता
पणजीतील प्रतिष्ठित सहा मजली ‘जुन्ता हाऊस’ इमारत पाडण्याच्या गोवा सरकारच्या योजनेला व्यवस्थापकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कारण प्रशासनाचे प्रयत्न सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आहे. १८ जून रोडवरील वर्दळ लक्षात घेऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. याची दक्षता घ्यावी लागेल. दुकाने, कार्यालये, बँका, रेस्टॉरंट्स, हॉटेल फिदाल्गो आणि इतर व्यावसायिक आस्थापने आहेत. जुन्ता हाऊसने नुकतीच ६० वर्षे पूर्ण केली. म्हणजेच सीनियर सिटीझनप्रमाणे इमारत निवृत्त. एक काळ होता ही इमारत गोव्यातील सर्वोच्च उंच होती. पणजीची ती शान होती. प्रस्तावित १४ मजली संकुलामध्ये एक आलिशान हॉटेल, कॅसिनोचे मजले आणि छतावर जलतरण तलावाचा समावेश आहे असे समजते. यास विविध स्तरांवर विरोध होत आहे. मोठ्या कालखंडाच्या पटलावर ऐतिहासिक खुणा कोरलेल्या जुन्ता हाऊसचा डोलारा कोसळताना पाहताना जनतेला काळीज पिळवटून वेदना होत आहेत हे हृदयशून्यांना कसे कळणार?
पोलिसांच्या खाऊगिरीचा सुळसुळाट
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटक पोलिसांचीच दहशत पाहायला मिळतेय. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले काही ‘आयआरबी’ पोलिस खुलेआम सेटलमेंटच्या नावाखाली खिसे कापू लागले आहेत. कळंगुटमध्ये काही निष्पाप पर्यटकांना नाहक अडवून पैसे उकळल्याचा प्रकार नुकताच समोर आला. प्रकरण थेट हायलेवलपर्यंत पोहोचल्याने आता कुठे चौकशीचे सोपस्कार सुरू झालेत. निवडणूक ड्युटी सोडली तर वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या या पोलिसांचा जाच स्थानिक व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनाही नकोसा झाला आहे. एका फेरीवाल्याला मारहाणीचा इतका मानसिक धक्का बसला की हृदयविकाराने त्याचा जीव गेला. विशेष म्हणजे, पर्यटन खात्याचे अधिकारी बेकायदा प्रकारांचे फोटो काढतात म्हणून पोलिसांनी चक्क त्या अधिकाऱ्यांनाच अटकेची धमकी दिली. त्यामुळे पर्यटकांना लुटणाऱ्या या ‘खाऊ’ वृत्तीवरून सध्या पर्यटन खाते आणि पोलिस युनिटमध्ये जोरदार शीतयुद्ध रंगले आहे.
हुश्श! संपला बुवा ‘म्हाळ’
‘गावात म्हाळ आणि कुणाला तरी बोवाळ’ अशा आशयाची कोकणीत एक म्हण आहे. सध्या गोव्यातील राजकीय घडमोडी पाहता या ‘म्हाळा’चा राजकारण्यांनाच अधिक बोवाळ होता असे वाटते. आता सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई यांचे समजता येते. पण दत्तराज राऊत देसाई यांनीही या म्हाळ (पितृपक्ष) महिन्याचा धसका घेतला म्हणजे जरा अतीच झाले ना. कारण दत्तराजसुद्धा आपले राजकीय पत्ते म्हाळ महिन्यानंतरच उघडे करणार असे सांगत होता. हा बहुचर्चित म्हाळ महिना काल एकदाचा संपला बुवा! आता कोण कसले पत्ते खुले करतात आणि राजकीय बाजारात कुणाचा पत्ता चालणार, हे कळणारच म्हणा!
रेशनकार्ड हवे कोणाला?
पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड चालणार नाही हा सरकारचा आदेश आहे. तांदूळ व गहू वगळता रेशनकार्डवर अन्य काहीच मिळत नाही. सणासुदीलाही नाही. त्यामुळे रेशनकार्डवरील धान्य घेऊन ते दुसऱ्याला विकण्यापलीकडे रेशनकार्डधारकाच्या हाती काहीच राहत नाही. अशा या रेशनकार्डवर सध्या मिळते तरी काय, की सहा महिने धान्य उचलले नाही म्हणून कार्ड बंद करण्याची वेळ आली? महिन्याला मिळणारे धान्य पुरेसे आहे की नाही? त्याचा दर्जा काय? हे प्रश्न बाजूला ठेवून सरकारने आता सहा महिन्यांचा हिशेब मांडला आहे. स्मार्ट सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा हा स्मार्ट निर्णय! रेशनवर काही मिळो वा न मिळो, कार्ड मात्र सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी नियमित धान्य उचलावे. उद्या धान्यच मिळाले नाही, तर कार्ड बंद पडण्याची जबाबदारीही लाभार्थ्यांचीच ठरणार की काय!
पाणी मुरतच राहणार!
राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये असलेले पाणी पुढील आठ महिने गोमंतकीय जनतेला पुरेल का, असा प्रश्न सर्वांसमोरच ‘आ’ वासून उभा राहिला आहे. अशावेळी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राज्यात आहे, परंतु नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे संकेत यापूर्वी देण्यात आले होते. ‘पाणी नेमके मुरतेय कुठे?’ याचा लवकरच शोध घेणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. परंतु, आत्तापर्यंत सरकारला त्याचा शोध घेता आलेला नाही. त्यातच आता या कामासाठी स्वतंत्र ‘वॉटर इन्स्पेक्टर’ नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा पूर्ण केली जाईल की पाणी असेच मुरत राहील, याकडे जनतेचे लक्ष असेल हे नक्की.
धनगरांचा एल्गार
धनगर समाज हा गोव्यातील खरा तर सर्वांत मागास समाज. पण एसटी दर्जा देताना या समाजाला बाजूला ठेवले. त्यामुळे मागची २५ वर्षे या समाजावर अन्याय होत असून, या समाजाला कोण वालीच नाही अशी भावना अखिल गोवा धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कवळेकर यांनी वास्को येथील ‘गोंय राखण’ यात्रेदरम्यान व्यक्त केली. कवळेकर या यात्रेत अगदी धनगरी वेशात सहभागी झाले होते. भाजप सरकारनेही आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप त्यांनी केला. एका बाजूने धनगर समाजाचे सध्याचे अध्यक्ष बाबू कवळेकर हे भाजप सरकार धनगर समाजाला एसटी दर्जा देणार असल्याचे तुणतुणे वाजवत असताना दुसऱ्या बाजूने लक्ष्मण कवळेकर यांचे हे जळजळीत उद्गार धनगर समाजाची चालू असलेली घुसमट स्पष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत का?
त्या श्वानाचे काय चुकले?
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या पर्वरी उन्नत मार्गावर माणसांच्या सोयींचा विचार झाला; पण मुक्या जीवांच्या सुरक्षिततेचा विचार कुणाच्या डोक्यात का आला नाही? कुत्र्याने उन्नत मार्गावरून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत जीवाच्या आकांताने धडपड करावी आणि अखेर त्याच ठिकाणी उडी मारून प्राण सोडावेत, यापेक्षा दुर्दैव ते काय? त्या मुक्या प्राण्याचा दोष तरी काय? त्याने ना विकासकामाची मागणी केली, ना वाहतुकीत अडथळा आणला! विकासाच्या नावाखाली माणुसकीचाच बळी जात असेल, तर अशा विकासाचा अभिमान कशासाठी? ∙∙∙
चौकशी करणार तरी कोण?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘तोतया आयुक्त’ प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. संशयिताचा एका पोलिस अधीक्षकासोबत फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे. बनावट नियुक्तीपत्र तयार करणाऱ्यांची चौकशी होणार हे ठीक; पण त्या फोटोमागचे वास्तवही तपासले जाणार का? आणि चौकशी झालीच, तर ती कोण करणार? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या चौकशीची माहिती जनतेला मिळणार की ती गोपनीय फाईलमध्येच बंद राहणार? आता जनतेला आश्वासनापेक्षा उत्तरांची प्रतीक्षा आहे.
आंदोनलकर्ते जास्त की पोलिस?
दिल्लीत आंदोलन रोखण्याचे प्रयत्न झाले, तरी युवक मागे हटले नाहीत. आता गोव्यातही आझाद मैदानावरील आंदोलनामुळे वातावरण तापू लागले आहे. शनिवारी आंदोलनस्थळी पोलिसांच्या तीन मोठ्या बसगाड्या होत्या. रविवारी येथे युवक एकत्र येणार असल्याची चर्चा असल्याने पोलिसांचा फौजफाटा किती असेल, याचीच उत्सुकता आहे. रविवारी पोलिसांच्या बसगाड्या वाढणार की आंदोलनकर्त्यांची गर्दी? पोलिसांच्या बंदोबस्तात युवकांचा आवाज दबणार की त्यांच्या मागण्या मांडल्या जाणार? आझाद मैदानावर पोलिसांची संख्या मोजली जाणार की आंदोलनाची ताकद? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रवाशांच्या संयमाची परीक्षा
करमळी रेल्वेस्थानकावर एकच तिकीट खिडकी असल्याने प्रवाशांना रेल्वे पकडण्याआधी संयमाची परीक्षा द्यावी लागते. रेल्वेचा प्रवास काही तासांचा, पण तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा प्रवास किती लांबेल, याची शाश्वती नाही. रेल्वेने वेग वाढवला, गाड्या वाढवल्या; पण तिकीट खिडक्यांची संख्या मात्र जागेवरच आहे. डिजिटल भारताच्या घोषणा सुरू असताना करमळीतील प्रवाशांना मात्र जुन्याच रांगेत उभे राहण्याचे भाग्य लाभले आहे. गाडी चुकली तर प्रवाशांची चूक; खिडकी एकच असेल तर ती कुणाची?
नवरात्रीतील कीर्तने
नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. फोंडा तालुक्यातील काही मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. एक काळ होता, ९ रात्री कीर्तनकार रंगवत. भक्तीचा रस ओसंडून वाहायचा. ७० व ८० च्या दशकात कीर्तनांचा प्रभाव जनमानसावर असायचा. महाराष्ट्रातून कीर्तनकार यायचे. फर्ड्या भाषेत सादरीकरण करून ते लोकांना मंत्रमुग्ध करून सोडायचे. त्यांना संगीत कला अवगत असायची. हातात चिपळ्या घेऊन ते रागधारी संगीतात यमन, भूप व इतर रागात सुंदर अभंग सादर करायचे. गजर म्हणायचे. बुवांनी काल रात्री पूर्वरंग-उत्तररंग कसा रंगवला याची चर्चा लोक आठवडाभर चवीने करायचे. बाजारांत, दुकानांत, घराघरांत. कीर्तन हा नवविधा भक्तीतील एक प्रकार होय. कीर्तनामुळे भक्ती दृढ होते, आत्मशुद्धी होते हे संतांचे बोल आहेत. अस्थिर, चंचल, भरकटलेल्या मनाला आवर घालण्यास चित्तशुध्दीसाठी खास करून युवकांनी व इतरांनी काही क्षण दिले तर मनाचे गिरगिरे चक्र संथ होईल.
रघुपती राघव राजाराम
पणजीतील आझाद मैदानावर आयोजित ‘व्होट चोरी’विरोधातील आंदोलनात ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाचे सूर घुमले. लोकशाही आणि मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत आंदोलकांनी आपला आवाज बुलंद केला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात गांधीजींच्या आवडत्या भजनातून सत्य आणि अहिंसेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हातात निषेधाचे फलक आणि ओठांवर भजन, अशा वातावरणात आझाद मैदानावर आंदोलन झाले. मतदानाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता.
असा अचानक बदल का?
काँग्रेस नेते आज गोव्यात येऊन ‘गोवा रक्षण’ यात्रेत सहभागी होणार आहेत. मात्र यात्रा कुडतरीहून कुंकळ्ळीला हलवली आहे. राहुल गांधी १२ रोजी गोव्यात येणार होते. त्यादिवशीही यात्रेचे ठिकाण मडगाव- नावेलीहून कुंकळ्ळीतच आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता प्रश्न असा की, राहुल गांधी यांचा सहभाग कुंकळ्ळीतच होण्याचे प्रयोजन काय? कुडतरी, मडगाव, नावेलीत काँग्रेस समर्थक नाहीत का? की विरोधी पक्ष नेत्यांचा मतदारसंघ म्हणून हा खटाटोप? या यात्रेच्या माध्यमातून कुणा एका नेत्याचे महत्त्व वाढवण्याचा तर काँग्रेसचा हा प्रयत्न नाही ना? असे अनेक प्रश्न काँग्रेसचेच कार्यकर्ते विचारत आहेत.
प्रियोळमध्ये ‘त्रिमूर्ती’
प्रियोळ मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून विद्यमान आमदार गोविंद गावडे आणि जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी यांच्यापाठोपाठ आता मच्छिंद्र शिरोडकर यांचेही नाव जोरकसपणे पुढे येत आहे. ‘सेवा’ संस्थेच्या माध्यमातून मच्छिंद्रबाबनी विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकसंपर्क वाढवला आहे. कार्यक्रमांचे आयोजन असो वा लोकांना एकत्र आणण्याची हातोटी, त्यांनी आपली छाप सोडली आहे. अलीकडेच माशेल येथे ज्येष्ठ नागरिकदिनाच्या कार्यक्रमात भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात त्यांनी यश मिळवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ सामाजिक एकोपा की आगामी निवडणुकीसाठीची राजकीय जुळवाजुळव, असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रियोळची जागा राखीव झाल्यास उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता वाढली आहे. सध्या तरी तीन नावांची चर्चा असली, तरी निवडणुकीचा बिगुल वाजेपर्यंत या आखाड्यात आणखी कोणकोण उतरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोंडीवरील उतारा
पर्वरीच्या चोगम रस्त्यावरील वाहतूक कोंडीला अखेर थोडा तरी उतारा मिळणार! आर्डी शाळेसमोरील रस्ता ‘थांबण्यास आणि पार्किंगसाठी मनाई’ क्षेत्र घोषित झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळण्याची आशा आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांना आता दुसरी जागा शोधावी लागेल. शाळा असो वा कार्यालय, रस्ता म्हणजे खासगी वाहनतळ नव्हे, हे समजायला अखेर प्रशासनाला उशिरा का होईना, जाग आली. आता फलक लावण्याबरोबरच नियमांची अंमलबजावणीही झाली, तरच या निर्णयाचे सार्थक होईल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.