

Fanie De Villiers Slams Usman Khawaja: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने आपल्या 'सब्र' या आत्मचरित्रात 2018 मधील बहुचर्चित 'सँडपेपरगेट' प्रकरणाबाबत नवे खुलासे केल्यापासून क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्सलाही स्पष्टीकरण द्यावे लागले असतानाच, आता दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज फॅनी डिव्हिलियर्सने ख्वाजावर अत्यंत बोचरी टीका केली. डिव्हिलियर्सने ख्वाजावर संताप व्यक्त करत त्याने आपल्याच सहकारी खेळाडूंना संकटात टाकल्याचा आणि विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला.
'91.3 स्पोर्ट्सएफएम'शी संवाद साधताना फॅनी डिव्हिलियर्स म्हणाला की, गेल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात त्याने पाहिलेल्या आणि वाचलेल्या घटनांनुसार उस्मान ख्वाजा हा कदाचित सर्वात मोठा गद्दार आहे. ख्वाजाने खेळातील सर्व आचारसंहिता मोडल्या असून आपल्याच सहकाऱ्यांचा सौदा केला, अशा कठोर शब्दांत त्याने हल्लाबोल केला.
2018 मध्ये जी चूक घडली होती ती अत्यंत दुर्देवी होती, मात्र त्यावर तेव्हाच कारवाई होऊन प्रकरण हाताळले गेले होते; तरीही ख्वाजाने जुन्या जखमा पुन्हा उकरुन काढत ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पुन्हा एकदा बदनामी केल्याचे डिव्हिलियर्सने म्हटले.
दुसरीकडे, ख्वाजाच्या आत्मचरित्रामुळे सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही (Australia) आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले की, 2018च्या प्रकरणाची चौकशी पुन्हा होणार नाही आणि गोपनीयतेच्या कारणास्तव त्याचा अहवालही सार्वजनिक केला जाणार नाही. या विषयावर संवाद साधण्यासाठी लवकरच एका स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.