

पणजी: गोव्यातील लघु व्यावसायिक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच पारंपरिक व्यवसायांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाजात वापर करता यावा, यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय), ग्राउंड फ्लोअर लॅब्स आणि नोमडगाव यांनी संयुक्त पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत मांद्रे येथे १३ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विनामूल्य एआय निवासी कार्यक्रम आयोजिला आहे. राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण खात्याच्या स्टार्टअप ॲण्ड आयटी प्रमोशन सेलच्या (एसआयटीपीसी) सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, तो ‘एज सिटी इंडिया’ या कार्यक्रमाचा भाग आहे.
जीसीसीआयच्या अंबिका धाकणेकर, नोहा व्हाईट, मारिएला तोरीस आणि मयूर सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत आज याची माहिती दिली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश उदयोन्मुख कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाज यांच्यातील दरी कमी करणे हा आहे. अनेक लघु व्यावसायिकांना एआय तंत्रज्ञानाची माहिती असली, तरी त्याचा आपल्या व्यवसायात नेमका कसा उपयोग करता येईल, याबाबत स्पष्टता नसते. ही अडचण दूर करून तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष कामकाजात उपयोग करण्यास व्यावसायिकांना सक्षम बनविण्यावर या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे.
या तीन आठवड्यांच्या उपक्रमात एआय क्षेत्रातील १० ते १५ तज्ज्ञ, तंत्रज्ञान विकसित करणारे आणि संशोधक सहभागी होतील. त्यांच्यासोबत गोव्यातील ५० ते १०० व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळणार आहे. व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी ओळखून त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने व्यवहार्य उपाय विकसित करण्याचे काम या काळात केले जाईल.
व्यवसायातील कार्यपद्धती सुधारणे, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे, विपणन, समाजमाध्यमांचा वापर, ग्राहकांशी संवाद साधणे आणि इतर व्यावसायिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, अशा विविध बाबींमध्ये ‘एआय’चा उपयोग कसा करता येईल, यावर काम केले जाईल.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी...
1. या कार्यक्रमांतर्गत मंगळवार आणि गुरुवारी प्रत्येकी दोन तासांची अशी सहा प्रात्यक्षिक सत्रे आयोजित केली जातील.
2. शिवाय सहभागी व्यावसायिकांना स्वतःच्या व्यवसायाशी संबंधित उपाय विकसित करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्याची संधी आणि एआय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल.
3. तीन आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक सहभागी व्यवसायाला एआय तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या एका तज्ज्ञाचे समर्पित साहाय्य मिळेल.
4. या प्रक्रियेत विकसित केलेल्या उपायांची मालकी संबंधित व्यवसायाकडेच राहणार आहे. तसेच विकसित उपायांचा पुढेही वापर करता यावा, यासाठी लेखी मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.
5. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतरही व्यवसायांना या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल.
व्यावसायिकांना संधी
प्रत्येक व्यवसायाच्या गरजा वेगळ्या असल्याने सर्वांसाठी एकच उपाय लागू करण्याऐवजी संबंधित व्यवसायाच्या विशिष्ट समस्येनुसार तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याचा प्रयत्न असेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.