‘जेन झी’ला गृहीत धरू नका!
‘जेन झी’ पिढी आक्रमक आहे, ती कोणाचे ऐकत नाही आणि आपल्या मनाप्रमाणेच वागते, असा समज अनेकांनी करून घेतला आहे. काही विद्यार्थी संघटनांनी तर ही पिढी आपल्याच बाजूने मतदान करेल, असे गृहीत धरले होते. मात्र, गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीच्या निकालाने हा समज खोटा ठरवला. तरुण मतदारांना आपल्या बाजूने असल्याचे गृहीत धरणे किती चुकीचे ठरू शकते, याचा धडा या निकालाने दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘जेन झी’ अनेकांचे राजकीय गणित बिघडवू शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
प्रभाकर गावकरही शर्यतीत!
‘एसटी’ समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणे तसे कठीणच! मात्र, सर्वाधिक एसटी बांधव असलेल्या केपे तालुक्यात यावेळी भाजप एसटी उमेदवार देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. यासंबंधीचे सर्वाधिकार म्हणे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. एसटी आरक्षणाचा प्रश्न आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपचे कुशावती जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर यांनीही हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. प्रभाकर हे रमेश तवडकर यांच्या गोटातील मानले जातात. त्यामुळे उमेदवारीची लॉटरी प्रभाकर पंतांना लागली तर आश्चर्य वाटायला नको! अर्थात, राजकारणात शेवटच्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नाही. सध्या तरी इच्छुकांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विद्यार्थी निवडणूक की मिनी विधानसभा?
मोठ्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो, हे आपण आतापर्यंत पाहिले आहे. मात्र, आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीतही दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करण्यात आली. विशेष म्हणजे, ही निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी झाल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे गोवा विद्यापीठाची ही विद्यार्थी निवडणूक चर्चेचा विषय ठरली.
अनेकांची इच्छा, पण!
पेडणे मतदारसंघातून लढण्यासाठी सरकारला जवळच्या असलेल्या अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. काहींना जनसंपर्क सुरु केला आहे. त्यातच पेडण्यात भाजपची उमेदवारी मिळेल, तोच आमदार असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याने स्पर्धा सुरू झाली आहे. यानिमित्ताने कोण सरकारचा जवळचा यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पेडण्यात सध्या प्रवीण आर्लेकर हे भाजपचे आमदार असूनही हे सारे सुरू आहे. काहींनी तर आपल्याला भाजपची उमेदवारी पक्की झाल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे. सरकारी सेवेत अधिकारपदावर असताना आपण सरकारला किती मदत केली त्याची परतफेड उमेदवारीच्या रुपाने मिळेल असे वाटणारेही काही कमी नाहीत. त्यामुळे पेडण्यात भाजपची उमेदवारी एक आणि दावेदार अनेक असे चित्र तयार झाले आहे. अलीकडे पंचायत संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले दशरथ रेडकर यांचेही नाव या यादीत आता जोडले गेले आहे. त्यामुळे रंगत वाढली आहे. येणाऱ्या दिवसात पेडण्यात किती जणांचे फलक लागतील याचा अंदाज लोक घेऊ लागले आहेत. एकालाच उमेदवारी मिळेल हे ठाऊक असूनही प्रत्येकाने नेटाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत हे विशेष...
मेरे अंगने में, तुम्हारा क्या काम है!
केपेच्या माजी उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली होऊन ते दुसरीकडे गेले. कुशावती जिल्ह्याच्या प्रशासनाशीही आता त्यांचा काही संबंध नाही. सध्या केपेचे उपजिल्हाधिकारी म्हणून अमितेश शिरवईकर काम पाहत आहेत. पण म्हणून काय झाले? कुडचडेच्या रवींद्र भवनात होणाऱ्या अनेक सरकारी कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती मात्र हमखास दिसते म्हणे! ज्या जिल्ह्याशी आता संबंधच नाही, तिथल्या सरकारी कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती कशासाठी, असा सवाल खुद्द काही सरकारी अधिकारीच करू लागले आहेत. त्यामुळे सरकारी वर्तुळात सध्या एकच गाणे ऐकू येत आहे, ‘मेरे अंगने में, तुम्हारा क्या काम है!’
विरियातोबाब दाबोळीत उतरणार?
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आगामी विधानसभा निवडणुकीत दाबोळीतून लढणार काय? काँग्रेसच्या दहा संभाव्य उमेदवारांचा एक चार्ट सध्या व्हायरल होत असून त्यात विरियातो बाबांचे नाव आहे. चार्ट खरा की खोटा, हे देव जाणे! २०२२ मध्ये माविन गुदिन्हो यांनी विरियातो यांचा १,५७० मतांनी पराभव केला होता. आता पाच वर्षांत दाबोळीचे राजकीय गणित बदलल्याची चर्चा आहे. विरियातो आमदार झाले, तर दक्षिण गोव्याच्या खासदारकीसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार. विरोधक सत्तेवर आले, तर विरियोतो बाबाचे नाव मुख्यमंत्रीपदासाठीही चर्चेत येईल काय? की काँग्रेसनेच राजकीय चाचपणीसाठी हा चार्ट व्हायरल केला? सध्या याच प्रश्नांचीच चर्चा!
बाबांचे मोतीडोंगरवासीयांना रेशन!
मोतीडोंगर म्हणजे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचा अभेद्य किल्ला! काँग्रेस असो वा भाजप, पक्ष बदलला तरी डोंगरवासीयांची बाबांवरील निष्ठा काही कमी झालेली नाही. ‘जेथे बाबा, तेथे आम्ही’ हा त्यांचा ठाम नारा! पण हल्ली चिराग नायक आणि ‘आप’वाल्यांनीही मोतीडोंगरकडे विशेष लक्ष वळवले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणे स्वाभाविकच! अशातच दोन दिवसांपूर्वी बाबांनी मोतीडोंगरवासीयांना रेशनचे वाटप केले. बासमती तांदूळ आणि अन्य वस्तूंचा त्यात समावेश होता. आता याला प्रेमाची भेट म्हणायची की राजकीय सावधगिरीचा भाग, हे ज्याचे त्याने ठरवावे! मात्र, राजकारणात गाफील राहून चालत नाही, हे बाबांना आम्ही सांगायची गरज आहे काय? राजकारण कोळून प्यायलेल्या बाबांनी कृतीतूनच आपला संदेश दिल्याची चर्चा समर्थकांमध्ये रंगली आहे. बालेकिल्ला सांभाळायचा तर अधूनमधून डोंगराची खबरबात घ्यावीच लागते, नाही का?
मंत्र्यांची धावपळ!
कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांनी सध्या पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे राज्यभर दौरे सुरू केले आहेत. कृषिमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील शेतीची सद्यस्थिती जाणून घेणे, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातही आता कृषिमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे सर्व ठीकच आहे; पण पाळी परिसरातील खाण कंपन्यांमुळे स्थानिकांचे झालेले नुकसान, शेतजमिनीची झालेली नासधूस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शेवटी किती काळ मंत्रिपद भूषवले यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून आपल्या खात्याला किती न्याय दिला, हेच महत्त्वाचे! संकल्प आमोणकर यांच्या सध्याच्या दौऱ्यांमागे हाच विचार आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे.
प्रशासन काही शिकेल का?
म्हापसा बाजारपेठेत शुक्रवारी पुन्हा एकदा स्लॅब कोसळल्याने पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, त्यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. व्यापाऱ्यांकडून नियमित भाडे आणि घरपट्टी वसूल करण्यासाठी तत्पर असलेले पालिका प्रशासन त्यांच्या दुकानांच्या सुरक्षिततेबाबत मात्र उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रत्येक निवडणुकीत बाजारपेठेच्या पुनर्विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांची जबाबदारी कधी स्वीकारणार? केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याऐवजी बाजारपेठेच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कधी करणार? की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
भ्रमाचा भोपळा फुटला!
गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित ठरला. मागील निवडणुकीत एनएसयूआय आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी बाजी मारली होती, तर अभाविपला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे बदलले. एनएसयूआयला खातेही उघडता आले नाही. विद्यार्थी आपल्यालाच विजयी करतील, हा त्यांचा आत्मविश्वास निकालाने फोल ठरवला. विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने असताना अभाविपने मिळवलेला हा विजय सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायकच आहे. विद्यापीठातील निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होणार, याची चर्चा आताच सुरू झाली आहे. तसे झाल्यास अनेकांचा भ्रमाचा भोपळा फुटेल, यात शंका नाही!
रेजिनाल्ड सक्रिय झाले!
कुडतरी मतदारसंघाचे आमदार ॲलेक्स रेजिनाल्ड जेव्हा सरकारच्या विरोधात होते, तेव्हा विधानसभेत त्यांचा आवाज घुमत होता. यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा देऊन औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. तेव्हापासून कालपर्यंत रेजिनाल्ड बाब शांत होते. ‘नरो वा कुंजरो वा’ वृत्तीने चालणारे रेजिनाल्ड आता अचानक सक्रिय झाले आहेत. त्यांना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याची व शेतीची आणि जुन्या घरांची आठवण व्हायला लागली आहे. एवढेच नव्हे जॅक सिक्वेराही त्यांना आता आठवायला लागले आहेत, याचे कारण येणारी निवडणूक.
‘आप’ची महागाई मुक्ती यात्रा !
निवडणुका जवळ आल्या की यात, मोर्चे, आंदोलनांना जोर चढतो. या काळात अनेक आंदोलनजिवी सक्रिय व्हायला लागतात. भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या दारात पोचविण्यासाठी त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपची यात्रा सुरू केली होती. ज्यामुळे भाजपा सत्तेवर आला. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘गोंय राखण यात्रा’ काढून पक्षाची गेलेली पत परत मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केले. आता काँग्रेस यात्रा काढल्यावर सत्तेत असलेला भाजपही रस्त्यावर उतरला. आता आम आदमी पक्षाने ‘महागाई मुक्ती यात्रा’ सुरू करून आपलेही अस्तित्व दाखवून दिले आहे. महागाईच्या विरोधात ‘आप’ आवाज उठवीत असून महागाईवर मात करण्यासाठी प्रति महिना पंधरा हजार रुपये अर्थ साहाय्य करण्याचे वचन ‘आप’ देत आहे. आता पाहूया ‘आप’ सगळ्यांचा बाप होतो, की नाही.
कार्यकर्त्यांची पळवापळवी!
फोंड्यात सध्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू आहे. कोण कुणाबरोबर आहे, हेच समजेनासे झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका नेत्याचे तब्बल तीनशे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने पळवल्याची आवई उठली होती. मात्र, प्रत्यक्षात पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनीच एका नेत्याची साथ सोडून दुसऱ्याचा हात धरल्याचे स्पष्ट झाले. आता विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने अशी आकड्यांची फुगवणूक आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरूच राहणार. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी कोण कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होणारच आहे. त्यामुळे आताच्या या राजकीय हालचालींना फारसा अर्थ नाही, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मासळी मार्केटात ‘जी-पे’ने विक्रेत्यांना टोपी!
मडगावच्या एसजीपीडीए मासळी मार्केटमध्ये एक महाशय गरीब विक्रेत्या महिलांकडून मासळी खरेदी करून ‘जी-पे’ने पैसे देत असल्याचे भासवायचे. पाचशे किंवा हजार रुपयांची मासळी घेऊन खात्यावर मात्र ५० किंवा १०० रुपयेच पाठवायचे म्हणे! अनेक महिलांना गंडा घातल्यानंतर अखेर त्यांचा हा डिजिटल खेळ महिलांनीच उघड केला. रंगेहात पकडताच महाशयांनी माफी मागण्यास सुरुवात केली. पोलिसांना बोलावण्याची भाषा होताच त्यांनी तेथून पळ काढला. डिजिटल इंडियाच्या युगातही गरीबांना टोपी घालणाऱ्यांकडून नवनवे मार्ग शोधले जात आहेत. तंत्रज्ञान स्मार्ट झाले, पण फसवणूक करणारेही काही कमी नाहीत!
न्यायालयाचे आभार
करापूरवासीयांचा १०० दिवसांहून अधिक काळ चाललेला संघर्ष अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फळाला आला. प्रकल्पाला दिलेल्या परवानगीला स्थगिती मिळाल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरे तर लोकशाहीत लोकांच्या आवाजाला किती किंमत आहे, याचा प्रत्यय या आंदोलनातून आला. इतके दिवस रस्त्यावर उतरून, घोषणाबाजी करूनही ज्यांना गावकऱ्यांचे म्हणणे ऐकू आले नाही, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मात्र दखल घ्यावी लागली. त्यामुळे आता करापूरमध्ये आंदोलनाच्या घोषणांपेक्षा न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक अधिक ऐकू येत आहे. एक मात्र खरे, लोकांच्या आक्रोशापेक्षा न्यायालयाचा आदेश अधिक प्रभावी ठरतो, असेच म्हणावे लागेल. आता संबंधित यंत्रणा या आदेशाची किती तत्परतेने अंमलबजावणी करते, याकडे कारापूरवासीयांचे लक्ष लागले आहे. की त्यासाठीही न्यायालयाचे दरवाजे पुन्हा ठोठावावे लागणार?
काणकोणात चोरांची शिरजोरी
काणकोणात सध्या गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसही ते मान्य करतात. काणकोण हे आघाडीवरील पर्यटन क्षेत्र बनल्यानंतर काही चांगल्या गोष्टींसह अनिष्ट बाबींनीही या तालुक्यात शिरकाव केला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी आता पोलिसांनी येथील व्यावसायिकांनी आस्थापनासमोरील भागात किमान एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, असे आवाहन केले आहे. काल पत्रकार परिषदेत काणकोणचे उपअधीक्षक नीलेश राणे यांनी ‘नागरिकांनी याकामी सहकार्य करावे’ अशी मागणी केली. काणकोणकर हे कायदाप्रिय असल्याने ते नक्कीच या चांगल्या कामासाठी सहकार्य करतील, असा विश्वास राणे साहेबांना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.