

पणजी: राज्यातील कुणबी, गावडा आणि वेळीप या तीन समाजांचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश होऊन २३ वर्षे उलटली, तरी या समाजांना विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. ही राजकीय प्रतिनिधित्वाची कोंडी दूर करण्यासाठी सरकारने केलेल्या कायद्याचे आता गोवा खंडपीठात जोरदार समर्थन केले आहे. प्रस्तावित आरक्षणामुळे विधानसभेच्या एकूण जागांमध्ये किंवा मतदारसंघांच्या भौगोलिक सीमांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
‘गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्रचना अधिनियम, २०२५’ या कायद्याच्या घटनात्मक वैधतेचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केले आहे. या कायद्याला आव्हान देणाऱ्या एडविन फर्नांडिस यांच्या याचिकेला विरोध करत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सरकारने आपली भूमिका मांडली. आदिवासी कल्याण संचालनालयाचे संचालक नीलेश धायगूडकर यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले असून, अनुसूचित जमातींना दीर्घकाळापासून नाकारलेले राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
२००२ च्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) कायद्यानुसार कुणबी, गावडा आणि वेळीप या तीन समाजांचा गोव्यातील अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यात आला. या कायद्याला ७ जानेवारी २००३ रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर झालेल्या २००७, २०१२, २०१७ आणि २०२२ या चार विधानसभा निवडणुकांमध्ये एसटी समाजासाठी एकही मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला नाही. परिणामी, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यापासून हा समाज वंचित राहिला. या दीर्घकालीन उपेक्षेमुळे संबंधित समाजात तीव्र नाराजी असल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
या कायद्याला आव्हान देताना याचिकाकर्त्याने तो संविधानाच्या कलम ३३२ आणि कलम ३३० मधील तरतुदींच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारने हा दावा फेटाळताना जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गोव्याची एकूण लोकसंख्या १४ लाख ५८ हजार ५४५ असून, त्यापैकी अनुसूचित जमातींची लोकसंख्या १ लाख ४९ हजार २७५ म्हणजेच १०.२ टक्के आहे. तर २००१ च्या जनगणनेनुसार राज्याची एकूण लोकसंख्या १३ लाख ४७ हजार ६६८ आणि एसटी लोकसंख्या १ लाख ३३ हजार १५६ म्हणजेच ९.९ टक्के होती.
या कायद्यामुळे गोवा विधानसभेच्या ४० जागांच्या संख्येत किंवा विद्यमान मतदारसंघांच्या भौगोलिक सीमांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. नव्याने मतदारसंघ पुनर्रचना करण्याऐवजी विद्यमान ४० मतदारसंघांपैकी एसटी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कोणते मतदारसंघ राखीव ठेवायचे, हे निश्चित करण्याची तरतूद या कायद्यात आहे. संविधानाच्या कलम १७० अंतर्गत असलेली स्थगिती ही विधानसभेच्या एकूण जागांची संख्या आणि मतदारसंघांच्या भौगोलिक सीमांमधील बदलांशी संबंधित आहे; आरक्षणाशी तिचा संबंध नसल्याचा युक्तिवाद सरकारने केला आहे.
या कायद्याला १३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असून, ६ सप्टेंबर २०२६ पासून तो लागू झाला आहे. असे असताना याचिकाकर्त्याने विलंबाने ऑक्टोबर २०२६ मध्ये याचिका दाखल केल्याचा आक्षेप सरकारने घेतला आहे. विद्यमान विधानसभेची मुदत १५ मार्च २०२७ रोजी संपणार असून, पुढील विधानसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या टप्प्यावर कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप झाल्यास एसटी समाजाला राजकीय आरक्षणापासून पुन्हा वंचित राहावे लागेल आणि आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, असा युक्तिवाद सरकारने केला आहे.
लोकसंख्येचे प्रमाण ९.९ टक्के
भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने १० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या पत्रातही २००१ च्या जनगणनेनुसार एसटी लोकसंख्येचे प्रमाण ९.९ टक्के असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय आरक्षणासाठी लोकसंख्येचे प्रमाण निश्चित करताना २००१ च्या जनगणनेची आकडेवारी हाच वैध घटनात्मक आधार असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.