Khari Kujbuj Political Satire Dainik Gomanak
गोवा

खरी कुजबुज: चहापेक्षा किटली गरम!

Khari Kujbuj Political Satire: गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणून गोव्यात एकाची नेमणूक राष्ट्रीय पातळीवरून झाली आहे. एरव्ही प्रभारींचे काम हे अधून-मधून राज्यात भेट देवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेणे व पक्षाची ध्येय-धोरणे युवकांपर्यंत पोचवणे हेच असते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पशुसंवर्धन कॉलेज!

गोव्यात पशुसंवर्धन कॉलेज सुरू करायला केंद्र सरकाराने मंजुरी दिली. जूनपासून ४० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल, अशा प्रकारचे महाविद्यालये आपल्या राज्यात असल्यावर राज्याचा कणा आत्मनिर्भर होत अधिकाधिक बळकट होतो. एक काळ होता, गोव्यात ‘गोरवां दोतोर’ म्हणून अशा डॉक्टरची हेटाळणी, थट्टा मस्करी होत असे. परंतु आज या व्यवसायाला बरकत व भरभराट आली आहे. कारण कुत्र्या-मांजरांना कावीळ झाली आहे, असे निदान करून पशुसंवर्धन डॉक्टर ड्रीप्स वगैरे लावून ठेवतात. कुत्र्यांची नखे कापायला, त्यांना पशु-ओपीडीत घेऊन जातात. घरी पोसलेल्या पर्शियन बोक्यांना सोयरीक कशी येणार? त्यांच्यासाठी खास वधू-वर कार्यक्रम पणजीत होतात. चार गाड्या व दहा कुत्रे पोसणाऱ्या आजच्या काळात, व्हेटेरीनरी डॉक्टरांच्या कॉलेजाची नितांत गरज होती. ∙∙∙

क्राईम ब्रँच तोंडघशी!

लोकांकडून दबाव आला, की कोणालाही पकडून ती वेळ मारून नेणे, हा गोव्यातील पोलिसांचा नेहमीचा प्रकार असला तरी या घाई गडबडीत केलेल्या कारवाईत पोलिस कोर्टात कसे तोंडघशी पडतात, हे एकाच आठवड्यात दोनवेळा दिसून आले. दोन्ही वेळा तोंडघशी पडणारे पोलिस क्राईम ब्रॅंचचेच आहेत. यापूर्वी मोठा गाजावाजा करून पकडलेल्या सोहम नाईकची आम्हांला कोठडी नको? असे कोर्टाला सांगायची नामुष्की आलेल्या क्राईम ब्रॅंचला काल वास्को न्यायालयात सेंट फ्रान्सिस झेवियर विरोधातील ते भाषण माधव खट्टर याने लिहिले नव्हते, हे मान्य करायची पाळी आली. म्हणजे क्राईम ब्रॅंचने दोनवेळा कोर्टात आपले थोबाड रंगवून घेतले. कुठलाही होमवर्क न करता गोव्यातील क्राईम ब्रॅंच तपास करते, असे लोकांनी आता मानायचे का? ∙∙∙

केवळ देखावा!

पर्यटन खात्‍याकडे नोंदणी केलेल्‍या सर्वच हॉटेल्‍स तसेच निवासी आस्‍थापनांना पर्यटन व्‍यापार कायद्याअंतर्गत पर्यटकांच्‍या चेक इनची माहिती ‘टाईम’ ॲप्‍लिकेशनवर सादर करण्‍याच्‍या सूचना पर्यटन खाते वारंवार करते. परंतु, अनेक हॉटेल्‍स तसेच निवासी आस्‍थापनांकडून या सूचना पाळल्‍या जात नाहीत. असे घडते, तेव्‍हा या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्‍याचा केवळ इशाराच खात्‍याकडून दिला जातो. पण, गेल्‍या दोन वर्षांत एकाही आस्‍थापनावर कारवाई झालेली नाही. यातून पर्यटन खाते ‘टाईम’बाबत केवळ देखावा करीत असल्‍याच्‍या चर्चा खात्‍यातील कर्मचाऱ्यांतच सुरू आहेत. ∙∙∙

आंदोलन, कायदा आणि ‘रिटर्न गिफ्ट’!

सांत आंद्रे मतदारसंघात ३९-अ कलम रद्द झालं आणि आता काही जण थेट उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले. न्यायालयानेही “ठीक आहे, आधी नगर नियोजन विभागाचं उत्तर ऐकू” म्हणत काही आठवड्यांची उसंत दिली आणि इथूनच खरी चर्चा सुरू झाली! कारण लोक आता हळूच विचारू लागलेत, ज्या मुद्द्यावर मोठमोठी आंदोलने झाली, आमरण उपोषणे झाली, त्याच मुद्द्याचे प्रकरण आता न्यायालयात गेले तर पुढे नेमके काय होणार? जर शेवटी कायद्याच्या चौकटीत परवानगी मिळालीच, तर मग ते आंदोलन, तो आक्रोश, सगळं नेमकं कशासाठी? आमदार वीरेश बोरकर यांनी उभे केलेले आंदोलन आता ‘पुढचा अध्याय’ काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण एकीकडे सरकारने कलम रद्द केल्याचा डंका वाजवला, तर दुसरीकडे न्यायालयीन मार्गाने पुन्हा दरवाजे उघडले जातील का? अशी चर्चा रंगतेय. आता लोक मिश्किलपणे म्हणतात, हे आंदोलन म्हणजे सुरुवातीला “ब्रेकिंग न्यूज” आणि शेवटी “रिटर्न गिफ्ट” ठरणार का? उत्तर कोण देणार? आमदार स्वतः, की नगर नियोजन विभाग, की थेट न्यायालयच, याचीच उत्सुकता सध्या सगळ्यांना लागली आहे! ∙∙∙

आल्‍मेदांनी तोंड उघडल्‍यास!

आगशीचे पंच असलेल्‍या ज्‍युलियस आल्‍मेदा यांच्‍यावर रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षाने (आरजीपी) केलेल्‍या कारवाईमुळे पक्षांतर्गत वादंग माजले आहे. पक्षाच्‍या या भूमिकेवरून सांतआंद्रेतील कार्यकर्त्यांत पक्षाध्‍यक्ष मनोज परब यांच्‍याबाबत कमालीची निराशा पसरली आहे. आल्‍मेदा हे निकटचे असल्‍याने आमदार वीरेश बोरकर यांनी त्‍यांनाच साथ दिली आहे. पण, आल्‍मेदा यांनी सोशल मीडियावर केलेल्‍या एका पोस्‍टमुळे पक्षातील वातावरण किती गरम झाले आहे? याचा प्रत्‍यय येतो. ‘‘हे दिवसेंदिवस आवाक्याबाहेरचे आणि मर्यादेपलीकडचे होत चालले आहे. मी तोंड उघडावे का?’’ असा प्रश्‍‍न त्‍यांनी आमदार बोरकर यांना विचारला आहे. त्‍यामुळे आल्‍मेदांनी तोंड उघडले तर उघडे कोण पडणार? हे वेगळे सांगायची गरज नाही. ∙∙∙

शिक्षण संस्था की शॉपिंग मॉल!

आजकाल शाळांमध्ये पाऊल ठेवले की आपण ज्ञान मंदिरात आलोय की एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये, असा प्रश्न पडावा इतकी प्रगती झाली आहे! वह्या, पुस्तकं, गणवेश आणि आता तर चक्क ८०० ते १००० रुपयांचे ‘प्रॉस्पेक्टस’ नावाचे सोन्याचे कागद विकण्याचा जोरात धंदा सुरू आहे. गंमत बघा, शाळेत सगळे काही विकत मिळते, फक्त शिक्षण सोडून; कारण त्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी ट्युशनच्याच दारात उभे राहावे लागते. आता शिक्षण खात्याला जाग आलीय खरी, पण त्यांना कारवाई करायला प्रत्येक वेळी पालकांच्या लेखी तक्रारीचा मुहूर्त का लागतो, हाच मोठा प्रश्न आहे. आपल्या मुलाचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून पालक बिचारे मुकाट्याने खिसा रिकामा करतात, पण सरकार हे लुटलेले पैसे कधी परत मिळवून देणार की केवळ आदेशांचे कागद नाचवून पालकांच्या जखमेवर मीठ चोळणार, शेवटी काय, शिक्षण संस्थांची ही दुकानदारी अशीच चालणार असेल, तर `शिकलेला समाज....` ही फक्त म्हण उरेल आणि लुटला जाणारा पालक हीच खरी शोकांतिका ठरेल! ∙∙∙

मिमिक्री आणि कॉमेडी

गोव्यात मिमिक्री सादरीकरणाची लाट आली आहे. नक्कल करणारे कलाकार, फक्त राजकीय नेत्यांची नक्कल करतात. हुबेहूब अंगविक्षेप करणे, शारीरिक हालचाली करणे ही कसली नक्कल? ही झाली थट्टा. दोन चार नेत्यांची ही नक्कल किती वर्षे म्हणून ऐकायची? हसू येत नाही, पण आसू येते. कॉमेडी हा विषयच वेगळा. त्यात घडलेले काही प्रसंग कलात्मक अभिनयाने मांडून लोकांना हसवणे ही कॉमेडी. त्याला संहिता लागते, त्याला समजही हवी. गोव्यात एक कॉमेडी किंग होता. त्याच्याकडे विविधता, नवता होती. त्याचे उदाहरण- शोलेतील गब्बर सिंगचा डायलॉग. “झुग्गीमें बच्चा रोता है न, तो मां कहती थी, बेटा रो मत, गब्बर आयेगा.” हा डायलॉग वेगवेगळे कलाकार कसे सादर करतील, ते दाखवत तो शेवटी तियात्रीस्त पेश करायचा. “मांय सांगताली त्येका, चेड्या रोडो नाका, ‘गोबोर’ येतोलो.” हसून मुरकुंड्या व्हायच्या. ही कॉमेडी. ∙∙∙

ज्ञानपीठ आणि गोवा

हल्लीच एका सरकारी पदाच्या मुलाखतीत एक सदस्य उमेदवाराला प्रश्न विचारत होता, भारत सरकारद्वारे देतात, तो साहित्यातील श्रेष्ठ पुरस्कार कोणता? विचारणाऱ्याच्या समजाप्रमाणे त्याचे उत्तर ज्ञानपीठ. पण उमेदवाराने आपली हुशारी दाखवत उत्तर दिले, जैन कुटुंबीयांच्या ज्ञानपीठ ट्रस्टद्वारे जो सर्वोच्च साहित्य पुरस्कार दिला जातो, तो ज्ञानपीठ. त्यात सरकारचे देणेघेणे नाही, असे हे मुलाखतकार, ज्यांना युपीएससी मुलाखत घ्यायला पाठवायला हवे. असो. गोव्यात तिसरा ज्ञानपीठ आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे समजते. त्यासाठी एका लेखकाच्या पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद मोठ्या प्रमाणावर चालू होते, ते काम पूर्ण होत आले आहे. कसलेही पुरस्कार लेखकाला मोठे करत नाहीत. लोक जर त्याचा तिरस्कार करत असतील तर चिमूटभर साहित्यातून पाजळलेल्या कथीत ज्ञानरसाला अर्थ काय राहतो? ∙∙∙

पेट्रोलची ‘कवच-कुंडले’ कथा!

पणजीत सध्या एक भन्नाट चर्चा रंगली आहे. पणजीत मासेमारी करणाऱ्या बोटी किनारी पोलिसांनी पकडल्या, हे तर खरंच, पण खरी गंमत पुढे आहे. म्हणे, सागर कवच ऑपरेशन सुरू असल्यामुळेच त्या बोटीत पेट्रोल-डिझेल सापडलं! हे समजल्यावर लोक म्हणू लागले, की या बोटी जणू काही “उपवासावर” चालतात, चर्चा अशी की, जर कवच सुरू नसते तर बोटीमध्ये इंधनच नसते का? मग या बोटी समुद्रात चालतात कशावर, वाऱ्यावर की आशिर्वादावर? आणि जर कवच सुरू असताना अचानक इंधन “प्रकट” होत असेल, तर ही काही साधी गोष्ट नाही, हे मात्र नक्की! त्यामुळे आता राजधानीत हळूच हसत-हसत एक प्रश्न फिरतो, किनारी पोलिसांच्या स्वतःच्या बोटीत नेहमी पेट्रोल असतं का? की तेही ‘कवच’ लागल्यावरच भरलं जातं? एकंदर काय, सागर कवचने केवळ सुरक्षा वाढवली नाही, तर इंधनाच्या गूढ कहाणीचंही ‘उलगडणं’ सुरू केलंय, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

मोबाईल पार्किंगची चर्चा!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना काळात भिवपाची गरज ना, हा नारा दिला होता. हा नारा अतिशय गाजला आणि अनेकांना दिलासा देणाराही ठरला, यात शंका नाही. आता मुख्यमंत्र्यांची ‘मोबाईल पार्किंग’ ही संकल्पना राज्यभर चर्चिली जात आहे. काही डॉक्टरही काळाची गरज मानत या संकल्पनेचे समर्थन करत आहेत. अशा उपक्रमात डॉ. शेखर साळकर अग्रेसर असून आजपासून एक तास ते मोबाईलपासून दूर राहणार आहेत. आता मोबाईल पार्किंग संकल्पना किती गांभीर्याने राज्यभर पसरते, शाळा महाविद्यालयांमधून याबाबत कितपत जागृती होते, की ‘बे चे पाढे पंचावन्न’ म्हणत काळाच्या ओघात विरून जाते हे, पाहण्याजोगे आहे. ∙∙∙

एनएसयूआय कुठे आहे?

सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये माहिती पुस्तिकेच्या अव्वाच्या सव्वा दर आकारणी विरोधात शिक्षण संचालनालय आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यांच्या या निवेदनामुळे सरकारने परिपत्रक काढत केवळ शंभर रूपये आकारणीचे बंधन घातले, परंतु अशावेळी एनएसयुआयने पुढाकार घेत हे विषय मांडायला हवे होते.. सध्या एनएसयूआयचे नेतृत्त्वच अधांतरी आहे... अभाविपने त्यांची संधी घेत सोने केले. सध्या अभाविपने विरोधी जागाही व्यापली आहे. एनएसयूआयला याची खंत असायला हवी. ∙∙∙

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? हे गाणे अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची शक्यता वर्तविली जातेय, ते पाहता वेधशाळेची भविष्यवाणी चुकत असून नेमके यंत्र बदलले आहे, की त्यात काही तांत्रिक बिघाड घडला आहे. याची तरी तपासणी करावी, अशी टर उडविली जात आहे. ऐन उष्म्याच्या काळात दरदिवशी पावसाची शक्यता असूनही चुकूनही पाऊस फिरकत नाही. याचा नेमका अर्थ काय काढायचा ? आता असा प्रश्‍न पडलाय की आता किती वेळा पावसाची शक्यता... पावसाची शक्यता असे छापत बसायचे? ∙∙∙

आसगावातील नवनाट्य

आसगाव पंचायत क्षेत्रात सध्या नवे नाट्य उदयाला येत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वाढदिन सोहळ्यात त्याची चाहूल अनेकांना लागली. समर्थक मानले गेलेले सहा जण वाढदिवसाच्या सोहळ्यात केवळ हस्तांदोलनापुरते सहभागी झाले होते. ते नंतर कुठे दिसले नाहीत. यावरून नाराजी नाट्य रंगत असल्याचे जाणवले. यामुळे विधानसभेच्या येत्या निवडणुकीत ते दगाफटका करतील, हे ठरून गेले आहे. आता ते सहा जण कुणाकडे वळतील याकडे अर्थात साथ सोडलेल्यांची नजर आहे.

चहापेक्षा किटली गरम!

गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणून गोव्यात एकाची नेमणूक राष्ट्रीय पातळीवरून झाली आहे. एरव्ही प्रभारींचे काम हे अधून-मधून राज्यात भेट देवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेणे व पक्षाची ध्येय-धोरणे युवकांपर्यंत पोचवणे हेच असते. परंतु, विद्यमान प्रभारी म्हणे मागील कित्येक महिने गोव्यातच ठाण मांडून बसले आहेत. मंगळवारी मडगावात युवक काँग्रेसच्या धरणे आंदोलनावेळी ते उपस्थित होते, अशी चर्चा आज काँग्रेस भवनात चालली होती. त्यातच कुणीतरी सदर पदाधिकाऱ्याचा खर्च सध्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डोईजड झाल्याचे कुजबुजले आणि त्यावर बराचवेळ खमंग चर्चा रंगली. कुठल्या पंचतारांकित हॉटेलात ते कधी असतात, काय करतात यावर तर्क-वितर्क सुरू झाले. तसे पाहिले तर युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात युवकांपेक्षा ज्येष्ठ कॉंग्रेसवाल्यांचीच उपस्थिती अधिक असते असेही कुणीतरी पुटपूटलाच. एकंदर सदर प्रभारी म्हणजे "चहापेक्षा किटली गरम" ठरल्याचे बहुतेकांचे मत बनलेय, असे कळते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: वीरेश यांची पुन्हा चर्चेकडे पाठ! गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण, कार्यकर्त्यांत संभ्रम

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Viral News: चहा-कॉफी नाही, ही तरुणी रोज सकाळी उठून पिते 'पेट्रोल'; कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले!

SCROLL FOR NEXT