Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: शिवसेना नेत्यांचे दिवास्वप्न!

Khari Kujbuj Political Satire: दामू नाईक हे फातोर्ड्याचे दोनवेळा आमदार राहिले असून तीनवेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

शिवसेना नेत्यांचे दिवास्वप्न!

गोव्यात यापूर्वी कधीही शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नाही. अनेकदा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे; परंतु येत्या निवडणुकीत शिवसेना तब्बल ३० जागा लढविणार असल्याची घोषण दस्तुरखुद्द शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केली आहे. या जागांवर कुणाचाही पाठींबा किंवा युती न करता लढणार असल्याचे छातीठोकपणे ते सांगत आहेत; परंतु आता निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना सध्याच्या घडीला एकही वजनदार उमेदवार हाताशी नसताना हवेत गोळीबार सुरू आहे. गोव्यातील भाजपशी दोन हात करण्याची भाषा बोलली जात असून शिवसेना नेते केवळ दिवास्वप्न पाहत आहे. जमीनस्तरावर मात्र याबाबत कोणतीच हालचाल नसल्याची खंत काही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि चाहते व्यक्त करत आहेत.

दामू आणि फातोर्डा

दामू नाईक हे फातोर्ड्याचे दोनवेळा आमदार राहिले असून तीनवेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही फातोर्ड्यात त्यांचा प्रभाव काही प्रमाणात कायम आहे. त्यामुळे मतदारसंघातील समस्या आणि प्रश्न त्यांनाच हक्काने विचारले जातात. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने प्रत्येक घडामोडीवर त्यांची प्रतिक्रिया घेतली जाते. मात्र, नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ते आगामी निवडणुकीत फातोर्ड्यातून उमेदवारीस इच्छुक नाहीत. त्यांना संपूर्ण गोव्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तरीही फातोर्ड्याशी संबंधित प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर सुरूच आहे. यामुळे राजकीय वर्तुळात ‘फातोर्ड्यात भाजपचा उमेदवार कोण?’ अशी चर्चा रंगली आहे. उमेदवार जाहीर झाल्यास स्थानिक प्रश्न थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि दामू नाईक यांच्यावरचा प्रश्नांचा भार काहीसा कमी होईल, असेही बोलले जात आहे.

गणेशभाऊंचीही जागृती!

सध्या गोव्यात अवयवदान करण्याबाबत ठिकठिकाणी जागृती शिबिरे घेतली जातात आणि तो एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनीही दोन दिवसापूर्वी आपल्या कार्यालयात असेच एक शिबिर आयोजित केले होते. आता गणेशभाऊंनी स्वतःहून पुढे येत हा उपक्रम राबवला की अन्य कुणाची कॉपी करण्याचा हा प्रयत्न होता? सध्या सावर्डे मतदारसंघात हीच चर्चा सुरू आहे. आज संकेत आर्सेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवयवदान जागृती शिबिर आयोजित केले आहे. संकेतने जे काम हाती घेतले ते काम आपण त्याच्या पूर्वीच करून दाखवले, असे दाखवून देण्याचा हा गणेशभाऊंचा प्रयत्न तर नव्हता ना?

पाणी आहे की नाही?

राज्यात पाण्याची कमतरता आहे, असे लोक म्हणत आहेत. तर दुसरीकडे सरकार ठामपणे सांगत आहे की काळजीचे काही कारण नाही, पाणीही आहे आणि पाऊसही येणार आहे. आता नेमके कोणाचे ऐकायचे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लोक म्हणतात, ‘नळाला पाणी कमी येते. विहिरींची पातळी खाली गेली आहे. टँकरची चौकशी करावी लागते; मग पाणी मुबलक आहे, हे आम्ही कसे मानायचे?’ तर सरकारचे म्हणणे, ‘साठा पुरेसा आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे.’ त्यामुळे सत्य नेमके कुठे आहे, हे शोधण्यासाठी लोकांनी आता हवामान खात्यापासून ते शेजाऱ्यांच्या विहिरीपर्यंत सर्वत्र माहिती गोळा करण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे. खरे काय आणि गैरसमज काय? हे येणारे दिवसच सांगतील.

अपघातांचीच चर्चा!

हल्ली सकाळचा चहा आणि अपघाताची बातमी, हे जणू काही रोजचेच समीकरण झाले आहे. कुठे दुचाकी घसरली, कुठे चारचाकी धडकली, तर कुठे एखाद्याचा जीवही गेला. त्यामुळे लोक आता विचारू लागले आहेत की रस्त्यांवर वाहने जास्त धावत आहेत की अपघातांच्या बातम्या? मात्र, यावर उपाय काय, हा प्रश्न विचारला की चर्चा थेट सरकारपर्यंत पोहोचते. सरकारचे समर्थक म्हणतात, ‘काम सुरू आहे.’ विरोधक म्हणतात, ‘काम दिसत नाही?’ आणि जनता म्हणते, ‘अपघात मात्र दिसत आहेत!’ काहीजण तर गंमत म्हणून म्हणतात, ‘रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत, हे समजण्याआधीच अपघात होतो!’ त्यामुळे अपघातांवर चर्चा वाढत आहे. मात्र, उपाययोजनांवर चर्चा नेमकी कुठे हरवते, हा प्रश्न कायम आहे. यात सत्य किती आणि अतिशयोक्ती किती, हे ज्याचे त्याने ठरवावे; पण अपघातांच्या बातम्या आणि त्यावरील चर्चा, दोन्हींचा वेग सध्या मात्र कमी होताना दिसत नाही, एवढे नक्की!

मौन व्रताची समाप्ती!

गोवा काँग्रेसला अखेर चार वर्षांनी ‘वाचा’ फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत पक्षाची भूमिका, प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरणे यांचा संपूर्ण भार एकहाती उचलणारे अमरनाथ पणजीकर हेच जणू पक्षाचे प्रवक्ते, माध्यम समिती आणि ध्वनिक्षेपक बनले होते. आता नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती झाल्याने काँग्रेसमध्ये केवळ पदांची नव्हे तर आवाजांचीही वाढ होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, चार वर्षे शांततेचा विक्रम केलेल्या पक्षाकडून आता नेमके सरकारवर हल्ले जास्त होणार की आपापसांतील सूर जुळवण्यातच वेळ जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इतके मात्र खरे की, आतापर्यंत ‘एकला चलो रे’ पद्धतीने सुरू असलेल्या काँग्रेसच्या माध्यम युद्धाला किमान समूहगानाची साथ मिळणार आहे.

‘सावरकरप्रेमी’ला काँग्रेसचे प्रवक्तेपद!

प्रदेश काँग्रेसने काहीच दिवसांपूर्वी आपल्‍या प्रवक्त्‍यांची यादी जाहीर केली. मुख्‍य प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्‍यासह दहाजणांचा यात समावेश असून, त्‍यात महेश म्‍हांबरे यांच्‍याही नावाचा समावेश आहे; पण याच महेश म्‍हांबरे यांनी स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्‍या जयंतीनिमित्त त्‍यांना अभिवादन केलेले पोस्‍टर कोणीतरी मुद्दाम समाजमाध्यमांवर टाकले आहे. कदाचित म्हांबरेंना अपशकून करण्याचा हा प्रकार असू शकतो. काँग्रेसमध्ये त्यामुळे खळबळ माजावी असा या विरोधकांचा कावा असावा.

लक्ष आजच्‍या रॅलीकडे!

रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी क्रांतिदिनी पणजीत शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. गोवा वाचवण्‍यासाठी सर्व गोमंतकीयांनी राजकारण, भेदभाव बाजूला सारून या रॅलीत सहभागी व्‍हावे, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. ‘आरजी’त गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्वभूमीवर आमदार बोरकर यांनी रॅलीला गर्दी जमवली, तर मनोज परब यांच्‍याशिवाय ते पक्षाचे मोठे नेते ठरतील; पण बोरकर त्‍यात अपयशी ठरले तर ‘आरजीती’ल ‘ती’ धमक वादामुळे संपल्‍याचे सिद्ध होईल. त्‍यामुळे ‘आरजी’च्‍या प्रत्‍येक पदाधिकाऱ्याचे लक्ष गुरुवारच्‍या रॅलीकडे आहे.

अभिजात अभिनय

फोंड्यातील नाट्यमहोत्सव गाजवला तो शेवटच्या दिवशी ‘बापू विरुध्द गांधी’ नाटकाने. या नाटकातील दुहेरी भूमिका रघुनाथ साकोर्डेकर या कसलेल्या मुरलेल्या मुरब्बी अभिनेत्याने गाजवली. मंचावरील वावर, वाचिक अभिनय, भावनांतील बदल त्यांनी पक्व व अनुभवी नटाची ताकद देत मंचीत केले. फार मोठा नट हा. कोकणी रंगमंच गगनचुंबी उंचीपर्यंत नेणारा; परंतु कोकणी संस्थेला या नटाविषयी माहीत नसावे. गावातील जत्रेवेळी चार भूमिका करणारे त्यांच्या मते नट. भाषेला मोठे करणाऱ्या नटाविषयी ते अनभिज्ञ. रघुनाथरावांची योग्यता अरसिकांच्या, विचारशून्यांच्या कौतुकाने काही सुजणार नाही. असो. कोकणी रंगमंचाला उत्तरोत्तर तेजस्वी करणाऱ्या या रंगसाधकाच्या अंगांगांत शनिवारी अभिनयगुणांचे दर्शन घडले, त्या प्रेक्षकांचे डोळे भाग्यवान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Himachal Pradesh Accident: आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला! चंबात बोलेरो दरीत कोसळून 7 जणांचा जागीच मृत्यू; रात्रीच्या अंधारात नियतीचा क्रूर डाव

Goa Health Services: राज्यात 'आयसीयू' सेवांना बळ, 'आयुर्वेद आरोग्य व्यवस्थापन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

जेव्हा मडगावच्या मैदानात घुमले 'भारत माता की जय'चे नारे: डॉ. ज्युलियांव आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या संघर्षातून उजळला क्रांतीचा मार्ग!

Cyber Fraud: अज्ञात लिंकवर क्लिक करणं पडलं महागात! फातोर्डा येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक, 10 लाख उकळले

Chapoli Dam: चापोली धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर, पाणीटंचाईचे संकट गडद; केवळ 400 हेक्टोमीटर पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT