Goa Politician Scandal: काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ‘ट्विटर’द्वारे गोव्यातील एका मंत्र्याचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा शनिवारी दावा केल्यानंतर सोशल मीडियावर आगळीक सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर चिखली येथील ऐश्वर्या कोरगावकर या महिलेने आज वास्को पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘आपला फोटो समाज माध्यमांवर अपलोड करून बदनामी केली जात आहे’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे; तर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयातूनही ‘गुदिन्हो यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत आहे’, अशी तक्रार वास्को पालिसांत देण्यात आली आहे.
उपरोक्त विषयावर वास्कोतील महिला लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन महिलांची बदनामी रोखा, अशी मागणी केली आहे.
गिरीश चोडणकर यांनी ‘सेक्स स्कँडल’चा काल ट्विटद्वारे दावा करताना कुणाचाही नामोल्लेख केला नव्हता.
परंतु, आज वास्को पोलिसांत बदनामीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. भाजप आणि सरकारला जाहीर विचारणा करणाऱ्या गिरीश चोडणकर यांना पोलिसांनी किमान एक दिवसासाठी तरी कोठडीत पाठवावे, यासाठी काही घटकांनी जंग जंग पछाडणे सुरू केले आहे.
चोडणकर यांच्या ट्विटनंतर अनेक समाज माध्यमांवर काही छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करण्यात आले असले तरी त्यात आक्षेपार्ह असे काही नसल्यामुळे पोलिसांसमोर चोडणकर यांच्या विरोधात कारवाई तरी कशी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
मंत्र्याबाबत तक्रार नाही
यापूर्वीच्या प्रकरणात संबंधित महिलेने मंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. काही ध्वनिमुद्रण व चित्रफिती होत्या. या प्रकरणात मंत्र्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणतीही महिला पुढे आलेली नाही.
अन्य पुराव्यांविषयी काहीच माहिती समोर न आल्याने हे प्रकरण पुढे कसे सरकणार, याविषयी तर्क व्यक्त होत आहेत.
बदनामीसाठी कृत्य, दोषींवर कारवाई करा!
1.मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयातून त्यांच्या साहाय्यक सचिव नेहल केणी यांनी एक तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘चोडणकर यांच्या त्या ट्विटनंतर मंत्री गुदिन्हो यांचा फोटो एका स्थानिक राजकारणी महिलेसोबत जोडून त्यांची बदनामी करणारा मजकूर समाज माध्यमावर फिरत आहे.
2. या आरोपात तथ्य नसून मंत्र्यांची बदनामी करण्याच्या इराद्याने हे सर्व कृत्य केले आहे. यासंबंधी काही आक्षेपार्ह व्हिडिओही प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंत्र्यांची हेतूपुरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी.’
...तर राहुल गांधींची दिल्लीत पत्रपरिषद
चोडणकर यांनी आपली झाकली मूठ ठेवली आहे. आपल्याकडे आणखीन कोणते पुरावे आहेत हे त्यांनी अद्याप उघड केलेले नाही. यापूर्वी अन्य एका प्रकरणात ते वारंवार पत्रकार परिषदा घेऊन सरकारला इशारे देत होते.
तसे न वागायचे त्यांनी या खेपेला ठरवल्याचे दिसते. पोलिसांनी साधे चौकशीसाठी बोलावले तरी दिल्लीत खुद्द काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय पातळीवर हा विषय नेतील, असे नियोजन त्यांनी करून ठेवले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
...अन्यथा ‘त्या’ मंत्र्याचा राजीनामा मागणार
भाजपचे राष्ट्रीय संघटन सहसचिव व्ही. सतीश हे 30 रोजी गोव्यात येणार आहेत. तत्पूर्वी या प्रकरणातील हवा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने प्रकरण विरोधकांकडून लावून धरल्यास 30 ऑगस्टपूर्वी त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.