पणजी: राज्याच्या किनारी भागातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिस प्रशासन आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले आहे.
गेल्या सहा महिन्यांत पोलिस नियंत्रण कक्षाकडे (पीसीआर) प्राप्त झालेल्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश उत्तर आणि दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना न्यायालयाने दिले आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्यास पोलिस अधीक्षकांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले जाईल, असा इशाराही खंडपीठाने दिला.
पर्यावरण संरक्षण कायदा, वायुप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा तसेच ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० यांच्या अंमलबजावणीतील उदासीनतेबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमांची अंमलबजावणी करणे ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची वैधानिक जबाबदारी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अधिकारी नियमांची अंमलबजावणी करणार नसतील, तर मग नियम तरी कशाला ठेवायचे, असा सवाल करत न्यायालयाने प्रशासनाला सुनावले.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याबरोबरच त्यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाची कारवाईही केली जाईल, असा इशारा खंडपीठाने दिला. उत्तर आणि दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलिस स्थानकात गेल्या सहा महिन्यांत पीसीआरद्वारे प्राप्त झालेल्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती तारीखनिहाय आणि तक्त्याच्या स्वरूपात सोमवारपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.
हणजूणमधील दुर्लक्षित तक्रारींचाही मागवला तपशील
यासंदर्भातील एका प्रकरणातील याचिकाकर्ते डेस्मंड अाल्वारीस यांनाही सोमवारपर्यंत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची नावे तसेच स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलेल्या तक्रारींचा तपशील जोडण्यास सांगण्यात आले आहे. विशेषतः हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील अशा तक्रारींची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.