

सासष्टी: काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’ यांच्यातील युती निश्चित झाली असून, जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. मडगावातील लोहिया मैदानावर काँग्रेसतर्फे आयोजित ‘संविधान बचाव’ सभेत ते बोलत होते.
येत्या आठ दिवसांत युतीची अधिकृत घोषणा करून प्रचाराला सुरुवात केली जाईल. सध्या केवळ जागावाटपाचा मुद्दा बाकी असून तो चर्चेद्वारे सोडवला जाईल. नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी युतीला हिरवा कंदील दाखवला आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
आगामी निवडणूक ही गोमंतकीयांसह विरोधी पक्षांसाठीही शेवटची संधी आहे. त्यामुळे युतीसाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
पक्षांतर रोखण्यासाठी विशेष योजना
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष योग्य उमेदवारांची छाननी करूनच उमेदवारी निश्चित करणार आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर कोणीही पक्षांतर करू नये, यासाठी विशेष योजना तयार करण्यात आल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. पक्षांतर करणाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
गद्दारांना अद्दल घडवा : माणिकराव ठाकरे
काँग्रेसमधील गद्दार पक्ष सोडून गेल्याने आता पक्ष स्वच्छ झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस नव्या धोरणासह मैदानात उतरेल, असे पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. पक्ष सोडून गेलेले काही नेते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना गोमंतकीयांनी योग्य धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.