Flat Scheme: गोमंतकीयांना सरकारकडून हक्काचा फ्लॅट! फक्त 5 हजार भरा, 30 वर्षे राहा

Goa Government Housing Scheme: गोव्यात स्वतःचे घर नसलेल्या मूळ गोमंतकीय कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Goa Government Housing Scheme
Flat SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यात स्वतःचे घर नसलेल्या मूळ गोमंतकीय कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा कुटुंबांना गोवा गृहनिर्माण मंडळामार्फत सदनिका (फ्‍लॅट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या सदनिका मालकीहक्काने नव्हे, तर भाडेपट्ट्याच्या (लीज) तत्त्वावर ३० वर्षांसाठी दिल्या जाणार आहेत, कारण भविष्‍यात त्‍या कोणी विकू नयेत. लाभार्थ्यांना अर्जासोबत केवळ पाच हजार रुपये भरावे लागतील. या सदनिकांसाठी सरकारकडून कोणतेही मासिक भाडे आकारले जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर उपस्थित होते. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या घरबांधणी कर्ज योजनेतही मंत्रिमंडळाने सुधारणा मंजूर केली आहे.

Goa Government Housing Scheme
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

सरकारी खात्यांतील कर्मचाऱ्यांसह महामंडळे आणि स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के व्याजदराने घरबांधणी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना कमाल ३५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. हे कर्ज सरकारने मान्यता दिलेल्या बँकांमार्फत वितरित केले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अन्य बँकांकडून घरबांधणीसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपले विद्यमान कर्ज या सुधारित योजनेत हस्तांतरित करता येईल. त्यामुळे कमी व्याजदराचा लाभ घेण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मुक्तीपूर्वी असावा वडील किंवा आजोबांचा जन्‍म

ज्या पारंपरिक गोमंतकीय कुटुंबांतील वडील किंवा आजोबा यांचा जन्म गोव्याच्या मुक्तीपूर्वी झाला आहे, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर कोणतेही घर किंवा सदनिका नसणे ही योजनेतील प्रमुख अट असेल. त्यामुळे स्वतःचे घर नसलेल्या मूळ गोमंतकीय कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

...तर सर्व तालुक्‍यांमध्‍ये बांधणार सदनिका

सध्या गोवा गृहनिर्माण मंडळाकडे राज्यातील विविध तालुक्यांमध्ये सुमारे १५० सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचा वापर करून सुरुवातीला पात्र कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली जातील. उपलब्ध सदनिकांची संख्या अपुरी पडल्यास राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये नव्याने सदनिका बांधण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही योजना केवळ काही तालुक्यांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार आहे.

सध्या १५० सदनिका उपलब्ध

गोवा गृहनिर्माण मंडळाकडे सध्या राज्यातील विविध तालुक्यांमध्ये सुमारे १५० सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांमधून योजनेची सुरुवात केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या आणि मागणी लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाईल. उपलब्ध सदनिका अपुऱ्या पडल्यास राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये नव्याने सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

Goa Government Housing Scheme
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

खासगी कर्मचाऱ्यांनाही भविष्‍यात मिळेल लाभ

सध्या सुधारित घरबांधणी कर्ज योजना सरकारी कर्मचारी, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र, भविष्यात या योजनेचा विस्तार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कमी व्याजदरात घरबांधणी कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सवलत

 ४ टक्के व्याजाने कर्ज

 कर्जमर्यादा कमाल ३५ लाख रुपये.

 किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण आवश्यक.

 महामंडळे, स्वायत्त संस्थांमधील कर्मचारीही पात्र.

 सरकारने मान्यता दिलेल्या बँकांमार्फत कर्ज वितरण.

 अन्य बँकांकडून यापूर्वी घेतलेले घरबांधणी कर्ज सुधारित योजनेत हस्तांतरित करता येईल.

योजनेसाठी प्रमुख अटी

अर्जदाराच्या वडिलांचा किंवा आजोबांचा जन्म गोव्याच्या मुक्तीपूर्वी झालेला असावा.

अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर घर किंवा सदनिका नसावी. तसेच गोव्यात किमान ३० वर्षे वास्तव्य असल्‍याचा दाखला आवश्‍‍यक.

अर्जासोबत केवळ पाच हजार रुपये भरावे लागतील.

सदनिका मालकी हक्काने नव्हे, तर भाडेपट्ट्याच्या तत्त्वावर दिल्या जातील.

सदनिकांसाठी सरकारकडून मासिक भाडे आकारले जाणार नाही.

Goa Government Housing Scheme
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

अन्‍य महत्त्‍वपूर्ण निर्णय

नव्याने सुरू झालेल्या गोवा मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी २० पदांची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच ‘नशामुक्त भारत’ मोहिमेसाठी खर्च केलेल्या ९८ लाख रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. आदिवासी कल्याण खात्यातही ६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.